जुने शहर येथील द हेवन कॅफे येथे YOLO स्टुडिओच्या वतीने प्रमाणपत्र वितरण समारंभ
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
28 Apr 2026, 8:23 AM
अकोला : दि. १७-०४-२०२६ रोजी जुने शहर येथील द हेवन कॅफे येथे YOLO स्टुडिओच्या वतीने प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर तसेच प्रभाग १० च्या विद्यमान नगरसेविका सौ. वैषाली शेळके व नगरसेवक श्री नितीन ताकवाले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकोल्यातील ख्यातनाम निवेदिका जया भारती यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सौ. आरती देशपांडे यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग अंतर्गत १८ वर्षांखालील व त्यावरील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन केले. तसेच सौ. आरती नंदनवार यांनी स्वयम् प्ले स्कूल विषयी माहिती दिली.
YOLO स्टुडिओचे संस्थापक व मालक तेजरूप कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी YOLO स्टुडिओच्या संपूर्ण प्रवासाची माहिती दिली. यामध्ये संस्थेच्या ३ शाखा तसेच जवळपास १००० विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रशिक्षणाचा हा एक खडतर प्रवास पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.
ऑडिओ-व्हिज्युअल प्रोडक्शन (Content Creation) तसेच म्युझिकल प्रोडक्शन (Live Performance & Recordings) ह्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे त्यांनी नमूद केले. तसेच या कौशल्यांमुळे नव्या युगात नवीन करिअरच्या संधी देखील निर्माण झाल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रमुख पाहुणे सौ. वैषाली शेळके यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले व विशेषतः मुलींना योग्य मार्गदर्शन केले. श्री नितीन ताकवाले यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांचे मनोरंजन करत सर्वांना प्रेरणा दिली.
या प्रसंगी जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान पियानो व गिटार (लेव्हल १ व २) पूर्ण केलेल्या सुमारे ३० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमानंतर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती, ज्याचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. नुकतेच सुरू झालेले द हेवन कॅफे हे रूफटॉप रेस्टॉरंट असल्यामुळे येथील सुंदर वातावरण सर्वांना भावले. अशा प्रकारचे उपक्रम दर तीन महिन्यांनी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती तेजरूप कुळकर्णी यांनी दिली. तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या सेवांचा लाभ घ्यावा व आनंदाचा प्रसार करावा, असे आवाहन करण्यात आले.
Post Views: 18