कोकण पर्यटन- मालवणी मुलूख...
कोकण लेख : मराठी भाषा ही दर बारा कोसांवर बदलते, जसा प्रांत बदलतो तसा भाषेचा बाजही बदलतो. लबक, वाक्यप्रचार, शैली या सर्वातच कमी अधिक प्रमाणात वैविध्य आढळून येतं. माणूस आणि बोलीभाषा यांचं नातं अनादी काळापासून आहे. आपण जितक्या निरनिराळ्या प्रांतातून प्रवास करू तितक्याच विविध बोलीभाषा आपल्याला सापडत जातात. प्रत्येक भाषेचं आपलं एक वैशिष्ट्य व डौल असते. त्यातलीच एक भाषा म्हणजे "मालवणी भाषा". सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील दक्षिणेकडचा शेवटचा जिल्हा. हा जिल्हा "मालवणी मुलूख" म्हणून ओळखला जातो. मालवणी मुलूखाच्या वैशिष्ट्यांबरोबरच "मालवणी माणूस" हा अनेकांच्या कुतूहलाचा विषय. कला, क्रिडा, शिक्षण, साहित्य, संस्कृती बरोबरच निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेला हा जिल्हा.
हिशोबीपणा, तोलून मापून घेण्याची वृत्ती, स्वत:बद्दलची ठाम मतं, गप्पांमध्ये रंगत जाणारे विनोद, खवचटपणा, तिरकसपणा, बेरकीपण असे सारे गुण मालवणी माणसात आढळून येतात.
मालवणी माणूस जसा उत्सवप्रेमी आहे तितकाच तो खाद्यप्रेमीही आहे. काळ्या वाटाण्याची उसळ आणि घावणे, वडे सागोती, पिटी-भात व चमचमीत बांगड्याचं तिखलं हे त्याचे आवडीचे पदार्थ पण पावसाळ्यात ताजे मासे नाही मिळाले तर सुक्या माशांच्या वासाने तरी चार घास जातातच. मालवणी जत्रोत्सवातील वडे सागोतीची चव तर अनेकांनी चाखलीच असेल. कोकणातील पाहुणचार म्हणजे लज्जतदार, चटकदार आणि चमचमीत मेजवानीच असते. जेवण शाकाहारी असो वा मांसाहारी इथले गरमागरम वडे, आंबोळी, घावणे तसंच जेवणाच्या अंती सोलकडी हे पदार्थ जेवणाची लज्जत अधिक वाढवतात.
निसर्गरम्य कोकणात हिरवीगर्द झाडी, लाल माती, अथांग सुंदर समुद्र किनारे आणि रुपेरी वाळू याचं लेण लेवून ही किनारपट्टी जणू सादच घालत असते.
मालवणी माणसाशी गप्पा मारणं हा विलक्षण अनुभव असतो, तो एकदा गप्पा मारायला बसला की कुणाचीही भिडभाड ठेवत नाही. आपली रोखठोक मतं स्पष्टपणे मांडण्यात मालवणी माणसाला विलक्षण आनंद मिळत असतो. मालवणी माणसांशी अवांतर गप्पा ही ज्ञानाला धार लावणारी गंमत असते. अशा गप्पा मारताना मालवणी माणूस समोर कोण आहे याची कधीच तमा बाळगत नाही, त्याची मते ठाम आणि जाम असतात. स्पष्टवक्तेपणा फक्त मालवणी माणसातच दिसून येतो. आपलं बोलणं तो समोरच्या व्यक्तीला ठासून सांगतो. "आले मालवणी माणसाच्या मना, तेथे कोणाचे चालेना" असं गमतीनं म्हटलं जातं ते उगीच नाही. चर्चा आणि वादविवाद करताना त्याची बुद्धी तलवारीच्या धारेसारखी तळपत असते. तो भांडतो तेही अगदी तर्कशुद्ध आणि मुद्देसूदपणे.
मालवणी माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वत: उपाशी असला तरी घरात आलेल्या पाहुण्याला पोटभर प्रेमानं खाऊ घालणारच. तसंच गणपतीत भजणे करणारा, शिमग्यात सोंग नाचवणारा, दशावतारात रमणारा आणि रडणा-याला हसवणारा अशी त्याची ख्याती आहे.
आपल्या हक्कांशी नेहमीच जागरुक असणारा, गावाकडच्या दोन गुंठे जमीनीच्या हक्कासाठी आपलं संपूर्ण आयुष्य कोर्ट कचेरीत लढवणारा माणूस जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेच सापडणार नाही.
मालवणी माणूस हा श्रध्दाळू, ग्रामदेवतेचा कौल घेतल्याशिवाय तो एक पाऊलही पुढे टाकत नाही. एक वेळ घरात जेवणाची मारामारी असेल परंतु दुस-याकडे हात न पसरणारा, सभा, समारंभात मात्र सर्वात पुढे असलेला आढळतो. मराठी रंगभूमीवर नाटककार, नेपथ्थकार, दिग्दर्शक, कलाकार यात सर्वात जास्त मंडळी ही मालवणी मुलूखातलीच दिसून येतात. क्रिडा क्षेत्र असो वा पत्रकारिता प्रत्येक क्षेत्रात मालवणी माणसाची छाप पडलेली दिसून येते. ही स्वभाव वैशिष्ट्ये असणारा "मालवणी माणूस" हा महाराष्ट्राच्या संस्कृतीची दुसरी ओळख आहे एवढं मात्र निश्चित.
स्मिता दळवी
खारघर, नवी मुंबई
९८३३८६४८८४
Post Views: 247