अॅड. पदमराव देशमुख देऊळघाटकर यांचे निधन... मरणोत्तर नेत्रदान!
प्रबोधन आणि परिवर्तनाच्या क्षेत्रातील विचारवंत, अभ्यासू व्यक्तिमत्व हरवले
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
06 Nov 2023, 5:39 PM
अकोला : अकोल्याच्या सामाजिक ,सांस्कृतिक,राजकीय आणि कायदेविषयक क्षेत्रात अग्रेसर आणि सुपरिचित व्यक्तिमत्व,अकोला बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. .राजेश जाधव,व श्री संजय उर्फ बाळासाहेब जाधव ( देशमुख,देऊळघाटकर) यांचे वडील अॅड. पदमराव देशमुख यांचे दि०४ नोव्हेंबरच्या रात्री दु:खद निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ९२ वर्षाचे होते.निधनानंतर त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले.
स्व.पदमराव देशमुख हे शिक्षकी पेशातून सामाजिक संवेदना बाळगत सामाजिक विकास आणि प्रबोधनाच्या क्षेत्रात सतत कार्यरत होते. ते मुळात एक प्रयोगशील आदर्श शेतकरी होते.
शेतकरी आणि आर्थिक दुर्बल घटकांना कायदेविषयक मार्गदर्शन आणि सेवा प्रदान करून त्यांना न्याय देता यावा हू त्यांचे संकल्प होते. म्हणून शिक्षकी सेवा देतांनाच कायद्यांचे शिक्षण घेत त्यांनी त्या काळात गिरगाव ते अकोला असा सतत सायकलच्या प्रवास करून कायद्याची पदवी मिळवली होती. त्यांनी त्या काळात अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील न्यायालयातून ग्रामीण जनतेला न्याय क्षेत्रात मिळवून दिलेले सहकार्य फार मौलिक होते. पायजमा,नेहरू शर्ट अशी साधी राहणी आणि अकोलाभर फक्त सायकलवरून भ्रमंती हा त्यांचा नेहमीचा नित्यक्रम होता. शिस्तीची कठोर जीवनशैली त्यांनी अंगीकारली होती.संत वाड:मयाचे ते गाढे अभ्यासक होते.जीवनमुल्ल्यांच्या जागृतीसाठी अनेक धार्मिक कार्यक्रमातून संत साहित्यावर प्रवचने करण्याचेही सेवाकार्य ते वेळ मिळेल त्याप्रमाणे करीत राहत.
सध्याची प्रस्थापित शासनव्यवस्था,अनाचार भ्रष्टाचार याविरूध्द त्यांची मते ही आक्रमक आणि परखड होती.या परिवर्तनाच्या समाजातील तरूणांना पुढे आलं पाहिजे ही त्यांची तळमळ होती.या परिवर्तनवादी विचारांच्या चिंतनातूनच एक स्वतंत्र पक्ष स्थापन गरज त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात बोलून दाखविली होती.त्यासाठी पक्षाची घटना तयार करण्याचं कामही त्यांनी हाती घेतलेलं होतं.परंतू पुढे वार्धक्यातील शारिरिक अडचणींमुळे त्यांच्या इच्छांना त्यांना आवर घालावा लागला.२-३ वर्षाचे आजारपण बिछान्यात घातल्यानंतर शेवटी दि०४ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांचे निधन झाले.काल त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले.दि.१६ नोव्हेंबरला त्यांचा तेरवीचा कार्यक्रम राहणार आहे. त्यांचे मागे पत्नी,त्यांच्या १०५ वर्षाच्या सासूबाई,व दोन भावांसोबतच,सौ.जयश्री कृष्णराव देशमुख( निंबेकर) तथा सौ.जयमाला शशिकांत राव देशमुख(अंत्रीकर ) ह्या मुली आणि सुना आणि नातवंडं असे कूटूंब आणि फार मोठा आप्त परिवार आहे.
Post Views: 269