गॅस सिलिंडरचा विस्फोट ; पाच घरातील साहित्य जळून खाक
अकोला : शहरातील रामदासपेठ पोलीस ठाणे हद्दीतील विजय नगर बजरंग चौक येथील दाट वस्तीतील एक घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे.गॅस गळती झाल्याने काही वेळातच गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागून आजूबाजूच्या पाच घरांनाही या आगीची झळ बसली.दरम्यान परिसरातील नागरिकांनी आगीवर नियंत्रणाचा प्रयत्न केला. मात्र, आग नियंत्रणात येऊ शकले नाही.याची माहिती नागरिकांनी अग्निशमन विभागाला देताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर पाण्याचा मारा करून ती आग नियंत्रणात आणली,सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र घरातील संसारपयोगी साहित्य व किंमती वस्तू जळून खाक झालेत.
आग नियंत्रणात आणतांना महानगरपालिकेचा एक कर्मचारी जखमी झाला आहे. या आगीची झळ परिसरातील पाच घरांना बसली. आग लागल्याच्या घटनेमध्ये राजेश घामोडे, रवी गायकवाड, संजय ढवळे, अक्षय अरुणकर, निंबे, यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घरातील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सिलिंडर स्फोट होऊन घडलेल्या आगीच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.या घटनेची माहिती मिळताच अकोला पश्चिमचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय अग्रवाल यांनी घटनास्थळाला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.यावेळी खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल यांनी गॅस विस्फोट प्रकरणाची सविस्तर माहिती घेत नुकसानग्रस्तांना शासनाने त्वरित मदत देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची सूचना केली. दरम्यान, गॅस गळती व सिलिंडर विस्फोट प्रकरणाची सविस्तर चौकशी करून गॅस कंपनीने नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय अग्रवाल यांनी केली आहे. तर भाजपाच्यावतीने दहा हजार रुपये प्रत्येकी देण्याचे आश्वासन यावेळी अग्रवाल यांनी नुकसानग्रस्तांना दिले.
Post Views: 98