जिल्ह्यात आजपासून ‘सेवा संकल्प अभियान’ उपक्रमाची अंमलबजावणी
विविध उपक्रमांतून अधिकाधिक नागरिकांना सेवांचा लाभ मिळवून द्यावा-जिल्हाधिकारी वर्षा मीना
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
17 Sep 2026, 8:33 AM
सेवा सेतू अभियानातून नागरिकांना मिळणार विविध सेवांचा लाभ
अकोला : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांतून नागरिकांना सेवांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले.
सेवा संकल्प अभियानाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, समाजकल्याण अधिकारी गोपाळ वाघमारे, कृषी उपसंचालक हरिष देशमुख, कौशल्य विकास सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, नप प्रशासन सहआयुक्त विश्वनाथ वडजे, सदस्य सचिव हर्षवर्धन पवार, महिला व बालविकास अधिकारी राजश्री कोलखेडे, डॉ. पंकज बोरकर, प्रमोद टेकाडे, मिलिंद जंजाळ, डॉ. शीतल गावंडे, अशोक बांगर, माहितीविज्ञान अधिकारी श्रीनिधी वाजपेयी आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ‘सेवा परमो धर्मः’ या भावनेतून सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याच्या प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध सेवा उपक्रम राबविले जात आहेत. याच भावनेतून राज्य शासनाने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
महसूल व वन विभागाकडून ‘सेवा सेतू अभियान’ राबविण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यात शिबिर घेण्यात येणार आहे. विविध योजनांचे थेट लाभ नागरिकांना मिळवून देणे, तसेच विविध दाखले वितरण, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आदी उपक्रम होतील. कौशल्य रोजगार, उच्च व तंत्र शिक्षण, उद्योग विभाग, माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे इनोवेशन चॅलेंजचे आयोजन करून सर्वोत्कृष्ट इनोव्हेरची निवड केली जाईल.
‘सेवा माझे योगदान’ उपक्रमात प्रत्येक गाव, वॉर्डात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, प्लास्टिकमुक्ती, स्वच्छता आदी विविध कामे होतील. गटविकास अधिकारी हे ग्रामीण भागात, तर शहरात मुख्याधिकारी, वॉर्ड अधिकारी नोडल अधिकारी आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेत महत्वाच्या प्रकल्पांची व सुविधांत झालेल्या बदलांची माहिती संकलित व प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रत्येक गावात सेवा ज्योत यात्रा काढण्यात येणार असून, शहरात बाईक रॅली, तसेच ‘विकसित भारत २०४७’ बाबत जागृती व जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रम होईल. शिक्षण विभागातर्फे शाळांमध्ये विकसित भारत या विषयावर चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा होतील. महिला व बालविकास विभागातर्फे सर्व अंगणवाडी केंद्रांवर ‘अंगणवाडी उत्सव’ होणार असून, बालविकास प्रकल्प अधिकारी हे तालुक्याचे नोडल व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास अधिकारी) असतील.
‘आशीर्वादाचा दिवा’ या उपक्रमात योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आशीर्वादाचा दिवा प्रज्ज्वलित करण्यात येईल. ’बदलाची गोष्ट’ उपक्रमात सकारात्मक बदलाच्या यशोगाथा तयार करण्यात येतील. ‘आभार आणि संकल्पाची रांगोळी’ उपक्रमात दि. १७ सप्टेंबर रोजी मानवी रांगोळीचे आयोजन करण्यात आले आहे. नैसर्गिक सामुग्रीचा वापर करून कला परंपरा, निसर्ग संस्कृतीवर रांगोळीही रेखाटण्यात येईल.
‘नमो सेवागाथा’ या उपक्रमात शालेय शिक्षण विभागातर्फे पथनाट्यांच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायत स्तरावर योजनांची माहिती देणारे कार्यक्रम होतील. ‘जल, जन व सेवा संकल्प यात्रा’ या उपक्रमात विकासकामांबाबत संवाद कार्यक्रम होईल. ‘जनसेवक महाकुंभ’ कार्यक्रमात विविध लोकप्रतिनिधींचे विकसित भारताबाबत मनोगत व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. सर्व विभाग, तसेच उपविभागीय अधिकारी, तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांनी ही कामे समन्वयाने पूर्ण करून अभियान यशस्वी करण्याचे निर्देश श्रीमती मीना यांनी दिले.
Post Views: 1