आयुष्मान भारत, जनआरोग्य योजनेचा नियोजनभवनात आढावा
आयुष्मान भारत मिशन समितीप्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे
अकोला : आयु्ष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत शासकीय व खाजगी अंगीकृत रुग्णालयांमार्फत पात्र नागरिकांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत. आरोग्य विमा योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आयुष्मान कार्ड वितरणात अकोला जिल्हा आघाडीवर आहे. तथापि, एकही गरजू रूग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी कार्ड वितरणाची प्रक्रिया गतीने राबवावी, असे निर्देश आयुष्मान भारत मिशन समितीचे महाराष्ट्र प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी आज येथे दिले.
आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी नियोजनभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी नीलेश खेमनार, महापालिका उपायुक्त मेघना वासनकर, डॉ. अभय पाटील, विजय अग्रवाल, डॉ. दीपक केळकर तसेच विविध रूग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. शेटे म्हणाले की, जिल्ह्यात आयुष्मान कार्डचे 35 टक्के वितरण झाले आहे. ते गतीने पूर्ण करावे. योजनेतील तरतुदींचा गरजूंना लाभ मिळण्यासाठी व्यापक दृष्टिकोन ठेवून कार्यवाही करावी. ऑर्थोपेडिक पॅकेजेसबाबत प्राप्त सूचनांचा विचार करून ते वाढविण्याचा निश्चित प्रयत्न करू. आरोग्यमित्रांनी व्यापक व संवेदनशील दृष्टी बाळगून गरजूंना उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचा रूग्णांना लाभ मिळवून द्यावा. कुठलीही अडचण आल्यास टोल फ्री क्र. 1800 233 2200 वर संपर्क साधावा. या क्रमांकाची अधिकाधिक प्रसिद्धी करावी , असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रूग्णालय, डॉक्टर व आरोग्य मित्रांशीही त्यांनी चर्चा केली. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत 4 लश्र 58 हजार 451 शिधापत्रिकाधारक कुटुंब पात्र आहेत. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत 17 लक्ष 28 हजार 987 लाभार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात 4 शासकीय व 19 खासगी अशी 23 रूग्णालये अंगीकृत आहेत, अशी माहिती योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. शीतल गावंडे यांनी दिली. जिल्ह्यात अकोला, मूर्तिजापूर, अकोटप्रमाणे इतर तालुक्यांतही एक तरी मल्टिस्पेशालिटी रूग्णालय योजनेत वर्गीकृत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. डॉ. शीतल गावंडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अश्विनी खडसे यांनी आभार मानले.
Post Views: 20