नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबतच्या एका उच्चस्तरीय बैठकीत गुरुवारी जम्मू आणि काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी घटनांचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी शून्य सहिष्णूतेच्या धोरणासह दहशतवादाविरुद्ध ‘आरपार’ची मोहीम पूर्ण ताकदीने सुरू करण्याचे निर्देश दिले. पंतप्रधानांच्या या कठोर पावित्र्यानंतर दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी गृहमंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर सुरक्षा दल आता संयुक्तरित्या मोहीम राबविणार आहेत.
शपथविधीच्या दिवशी ९ जूनला दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला. त्यामुळे हा हल्ला एखाद्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग तर नव्हता ना, याबद्दलही पंतप्रधान मोदी यावेळी चिंतेत होते. आता हिंदू यात्रेकरूंना लक्ष्य केले जातेय
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशवादी हल्ले वाढले आहेत. यापूर्वी ‘टार्गेट किलिंग’च्या घटना घडत होत्या. कधी मजुराला मारले जात होते तर कधी कर्मचाऱ्याला. परंतु आता हिंदू यात्रेकरूंना लक्ष्य केले जात आहे. अलीकडेच लष्करी गणवेशात आलेल्या अतिरेक्यांनी भाविकांच्या बसवर गोळीबार केला, त्यात १० जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी बोलून वैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या सुरक्षेबाबत विचारपूस केली. एकही घटना घडू नये यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी आणि हवाई निगराणीही ठेवली जावी, अशा कडक सूचना पंतप्रधानांनी बैठकीत दिल्या.
दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन
जम्मू : झालेल्या विविध हल्ल्यांमध्ये सहभाग असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या जंगल भागात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दलांकडून शोधमोहीम राबविली जात असल्याची माहिती, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिली. गेल्या चार दिवसांत, दहशतवाद्यांनी राज्यातील रियासी, कठुआ आणि डोडा जिल्ह्यात चार ठिकाणी हल्ले केले, ज्यात ९ भाविक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) १ जवान ठार झाला, तर ७ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह अनेक यात्रेकरू या हल्ल्यांमध्ये जखमी झाले.
दहशतवाद्यांना मदत; व्यक्तीचे घर जप्त
श्रीनगर : राज्यातील अनंतनाग जिल्ह्यात पोलिसांनी गुरुवारी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एका व्यक्तीचे दुमजली घर जप्त केले आहे. पोलिसांनी बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत विभागीय आयुक्त काश्मीर यांच्या आदेशानुसार अनंतनाग जिल्ह्यातील गडोले भागातील लोहार सेंजी येथील रियाझ अहमद भट याच्या घरावर ही कारवाई केली.
Post Views: 53
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay