जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम स्थगित करा


निलेश देव यांची महावितरणकडे मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  23 May 2024, 11:51 AM
   

अकोला - जिल्ह्यात लवकरच वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर दिले जाणार असून सर्व वीज ग्राहकांचे आधीचे जुने मीटर काढून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर लावल्या जाणार आहेत. याबाबत लवकरच काम सुरू होणार असल्याचे समजते. मात्र महावितरण कंपनीचे आतापर्यंतचे अनुभव आणि सध्याच्या परिस्थितीत महावितरणच्या सेवेची अत्यंत दयनीय आणि नागरिकांना त्रस्त करून सोडणारी, वैताग आणणारी सेवा लक्षात घेता जिल्ह्यात स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय स्थगित करण्यात यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे संघटक निलेश देव यांनी महावितरणच्या मुख्य अभियंता दिला आहे.
        अकोला जिल्ह्यातील महावितरणची सध्याची अत्यंत दर्जाहीन व नागरिकांना वेठीस धरून मन:स्ताप देणारी सेवा लक्षात घेता स्मार्ट मीटर बसविण्याची योजना ग्राहकांसाठी कितपत फायद्याचे ठरेल याबाबत नागरिकांच्या मनात शंका आहे. एवढे सर्व मीटर बदलण्यासाठी आणि ते यशस्वीपणे पुढे कार्यान्वित ठेवण्यासाठी महावितरण एवढी सक्षम आहे का? असे प्रश्न निलेश देव यांनी उपस्थित केले आहेत. 1 एप्रिल पासून वीज नियमक आयोगाने विजेची दरवाढ केलेली असतांना सोबतच स्थिर आकार रकमेत वाढ करून एप्रिल महिन्याच्या बिलासोबत सुरक्षा ठेव रक्कम वाढ करून सर्वसामान्य नागरिकांकडून ही रक्कम भरून घेतलेली असतांना या सर्व विषयांचा विचार करता लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे खाजगीकरण झाल्यापासून आतापर्यंत जीवाची पर्वा न करता जे अनेक कामगार काम करीत आहेत त्यांचे काय? असा प्रश्नही निलेश देव यांनी उपस्थित केला आहे.
        लोकांना विविध प्रकारचे आमिषे देण्यात येऊन सहा ते आठ महिने प्रीपेड राहणार नाही असे बोलले जात आहे. तसेच मीटर स्टेटस रिपोर्ट अद्याप पर्यंत महाराष्ट्रात योग्य प्रकारे उपलब्ध नसल्याची माहिती आपल्याकडे असल्याचेही निलेश देव यांनी म्हटले आहे. वीज चोरी आणि महानगरपालिकेच्या पथदिव्यांचा भुर्दंड सर्वसामान्यांनी का भरावा? तसेच या खाजगी कंपन्यांचे सर्विस चार्जचा भुर्दंड कोण भरणार, याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. तरी आतापर्यंतचे कंपनीचे अनुभव पाहता व वरील सर्व बाबींचा विचार करता ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून ग्राहकांचा मन:स्ताप वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे अकोला जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम स्थगित करण्यात यावे, अन्यथा कायदेशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा निलेश देव यांनी दिला आहे. तसे झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला महावितरण जबाबदार असेल असेही त्यांनी मुख्य अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

    Post Views:  195


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व