आहारशास्त्राविषयीचे डॉ. नानासाहेब चौधरींचे लिखाण समाजाला प्रेरणा देणारे ः डॉ. संजय ओक


लयभारी पुस्तकाचा प्रकाशन समारंभ थाटात
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  31 Oct 2023, 6:26 PM
   

अकोला ः चांगले आरोग्य राखण्यासाठी आहारशास्त्र आणि व्यायामशास्त्र अत्यंत महत्त्वाचे आहे. औषधांशिवाय मधुमेह मुक्तीसाठी आणि लठ्ठपणा व स्थूलपणा घालविण्यासाठी डॉ .नानासाहेब चौधरी यांचे लय भारी लठ्ठपणा समस्या व उपचार हे पुस्तक अत्यंत उपयुक्त असल्याचे मत महाराष्ट्र कोवीड-19 तासचे माजी प्रमुख डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केले ते स्थानिक तोष्णीवाल लेआउट स्थित प्रभात किड्स स्कूलच्या सभागृहात विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला व डॉ. रा. ना.चौधरी ट्रस्ट, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभाप्रसंगी बोलत होते. डॉ. संजय ओक यांनी आभासी पद्धतीद्वारे या अमूल्य पुस्तकाबद्दल उहापोह केला.
यावेळी व्यासपीठावर 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे लेखक डॉ. नानासाहेब चौधरी, सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ व साहित्यिक डॉ.अमोल अन्नदाते, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य डॉ. गजानन नारे, विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोलाचे अध्यक्ष विजय कौसल व कार्याध्यक्ष सीमा शेटे-रोठे, डॉ. रा.ना.चौधरी ट्रस्टचे डॉ. मिलींद चौधरी  उपस्थित होते.  
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. अमोल अन्नदाते म्हणाले की, वजन नियंत्रण डायबिटीस स्थूलपणा नियंत्रित करण्यासाठी व्यावहारिक पद्धतीने जीवनशैलीत करावयाचा बदल या संदर्भात अनुभवसिद्ध मार्गदर्शन करणारे डॉ. नानासाहेब चौधरी यांचे पुस्तक हा मोलाचा ठेवा आहे. समृद्धीच्या वाटा विनाशाकडे जाणार्‍या नसतील तर उत्कृष्ट जीवनशैली जगण्यासाठी सदर पुस्तक वाटाड्या म्हणून अत्यंत महत्त्वाचे आहे, असे ते पुढे म्हणाले. कार्यक्रम प्रारंभी डॉ. रा. ना. चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. ट्रस्टची शैक्षणिक वैद्यकीय तसेच सामाजिक भूमिका ट्रस्टचे विश्वस्त डॉ.मिलिंद चौधरी यांनी मांडली. पाहुण्यांचा परिचय डॉ. भूपेश पराडकर आणि डॉ.पार्थसारथी शुक्ला यांनी दिला. स्थूलपणा आणि लठ्ठपणा ही जागतिक समस्या असून त्यावर योग्य आहार व नियमित व्यायामाद्वारे आपण नियंत्रण राखू शकतो, असे मत व्यक्त करून पुस्तकाबाबतची भूमिका डॉ. नानासाहेब चौधरी यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. रविन्द्र शोभणे यांनी डॉ. नानासाहेबांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांचे लिखाण समाजाला रोगमुक्त करणारे असल्याचे प्रतिपादन यावेळी केले. यावेळी 95 व्या वाढदिवस प्रित्यर्थ विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला तर्फे डॉ.नानासाहेब चौधरी व डॉ. देवयानी चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गजानन नारे यांनी तर संचालन  ज्येष्ठ रंगकर्मी अशोक ढेरे आणि आभार प्रदर्शन डॉ. विनय दांदळे यांनी केले.


    Post Views:  88


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व