भाडोत्रींची गर्दी, सत्तेची मस्ती, भोजनभाऊ, खोकेवाल्यांचा प्रश्न, सामनातून शिंदेंच्या भाषणाची पिसं काढली


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  07 Oct 2022, 10:05 AM
   

मुंबई : दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा शिवतीर्थवर तर शिंदेगटाचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा झाला. यात एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमनातून शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. याला आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उत्तर देण्यात आलं आहे. शिवाय एकनाथ शिंदे आणि त्यांच्या भाषणाचा ठाकरी शैलीत समाचार घेण्यात आला आहे. एकीकडं विचारांचं सीमोल्लंघन, तर दुसरीकडे भोजनभाऊंची गर्दी!, असं म्हणत एकनाथ शिंदेवर टीका करण्यात आली आहे.

शिवतीर्थावरील गर्दी भाडोत्री आणि पोटार्थी नव्हती हे एव्हाना तमाम महाराष्ट्राला समजले आहे. मिंधे गटाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बीकेसी मैदानावरील मेळाव्यात स्पष्टच सांगितले, मी मनात आणले असते तर शिवाजी पार्क त्यांना मिळू दिले नसते. ही धमकी समजावी की सत्तेची मस्ती?, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

लोकांचे डोके ठिकाणावर आहे. त्यांनी दसऱ्याच्या दिवशी विचारांचेच सीमोल्लंघन केले. बीकेसीवर भोजनभाऊंची गर्दी झाली असेल तर तो खोकेवाल्यांचा प्रश्न!, असं म्हणत सामनातून शिंदेगटावर टीका करण्यात आली आहे. शिवसेनेचा ऐतिहासिक, पारंपरिक दसरा मेळावा नेहमीप्रमाणे त्याच उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या वेळचा जोश, गर्दी, उत्साह नेहमीपेक्षा जरा जास्तच होता. शिवतीर्थ भरून, ओसंडून वाहत होते. त्यामुळे डॉक्टरांची वाकण्याची परवानगी नसतानाही आम्ही निष्ठावान शिवसैनिकांपुढे वाकून नतमस्तक झालो. शिवसैनिकांच्या निष्ठा आणि जनतेचे हे असे प्रेम हेच आमचे बळ. त्या बळावरच पाठीत खुपसलेले खंजीर पचवून आम्ही उभे आहोत. शिवतीर्थावरील गर्दी भाडोत्री आणि पोटार्थी नव्हती हे एव्हाना तमाम महाराष्ट्राला समजले आहे, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे.

    Post Views:  270


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व