जिल्ह्यात १५ मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित


आक्षेप, हरकती कळविण्याचे निवडणूक कार्यालयाचे आवाहन
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  25 Sep 2023, 6:46 PM
   


अकोला : निवडणूक आयोगाकडून छायाचित्र मतदार यादीचा दि. १.१.२०२४ या अर्हता दिनांकावर संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात  येत असून, जिल्ह्यात १५ मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित आहे. या केंद्रांच्या मतदान यादीबद्दल आपेक्ष असल्यास दाखल करण्याचे आवाहन निवडणूक कार्यालयाने केले आहे.

 पुनरीक्षण पूर्व उपक्रमाचा भाग म्हणून २२.०८.२०२३ ते २९.९.२०२३ या कालावधीत मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण व पुनर्रचना करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात सध्या एकूण १ हजार ७०४ मतदान केंद्रे आहेत. मतदार नोंदणी अधिका-यांकडून मतदान केंद्राच्या नावातील बदलाचे १२, मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे ६९, विलीन (मर्ज) करण्यात आलेल्या केंद्रांचे ४ प्रस्ताव आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ हजार ५०० पेक्षा अधिक मतदार संख्या झाल्याने ७ केंद्रांची, तसेच दोन कि. मी. पेक्षा अधिक अंतर असल्याने ८ केंद्रांची अशी एकूण १५ मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित आहे.

प्रत्यक्ष वाढ झालेली मतदान केंद्रे धरून एकूण १ हजार ७१९ मतदान केंद्रांची  विधानसभा मतदारसंघनिहाय यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या akola.gov.in या संकेतस्थळावर, तसेच मतदार नोंदणी अधिकारी, तहसील कार्यालये येथे दि. २५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.  या केंद्रांच्या प्रारूप मतदान यादीबाबत आक्षेप असल्यास ते दि. १ ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य निवडणूक शाखेत दाखल करता येतील.

 हे बदलाचे प्रस्ताव निवड़णूक आयोगाकडून मंजूर झाल्यास प्रारूप मतदार यादीतही बदल अंमलात येतील. त्याआधारे मतदान केंद्रांची पुनर्रचना व सुसुत्रीकरण अस्तित्वात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

    Post Views:  312


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व