काकांच्या उतारवयातील निर्णयांनी घडविलेली राजकीय महाभारतं...!
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
07 Jul 2023, 10:47 AM
बापाची चप्पल वडीलांच्या पायात झाली की मुलगा सज्ञान झाला असं म्हणतात. मग वयात आणि व्यवहारात आलेल्या मुलांना स्वतंत्र निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्यावं परंतू या नवख्या गोऱ्यांना व्यसन घालून त्याची दोरी आपल्या हातात ठेवावी. परंतू वेसन किती ताणावं याच्या मर्यादा ठरविल्या जाणंही महत्वाचं असतं. हे शहाणपण सुध्दा काही वडीलांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत सांभाळलेले असते.तर काही त्यात सपशेल नापास असतात.मुलगा असो की पुतण्या, की घरातली बायको ती जास्त स्वतंत्र वागावी असं त्या बाप,काका आणि नवऱ्यांना अंतर्मनातून पाहिजे तेवढं मान्य नसतेच.त्यामुळे हातातली दोरी कधी कधी घट्ट आवळण्याची ईच्छा या म्हाताऱ्यांना होत असते.मग त्यात त्यांच्या त्या मुलांना, पुतण्यांना आणि बायकांना वेदना होत असतात.परंतू समजदारीचा आव आणत मन मारून म्हणा की कसंही म्हणा, तडजोडीचे गुण अधिक समृध्द करीत सोशिकता वाढवली जाते. महाभारतं घडू द्यायची नसतात.घर संसारं टिकवायची असतात.ही कथा झाली घरसंसारांची....!
झाले गेले सारे विसरत वडीलधाऱ्यांचा आदर ठेवत कुटूंबे टिकवली जातात.परंतू तिथेही संपत्तीचे आणि अस्तित्वाचे वाद जास्तच समोर आले म्हणजे त्या घरांच्या ठिकऱ्या उडायलाही वेळ लागत नाही.कारण सबसे बडा रूपय्याने आपले सापाच्या वेटोळ्यासारखे मोहजालअमर्याद पसरविलेले असते. त्यामुळे होत्याचे नव्हते घडवून आणणारे हे एक महाकाल मायाजाल असते. परंतू सद्वविवेकबुध्दीने दुरदृष्टी ठेऊन,प्रसंगी लवचिक होऊन तडजोडीचे धोरण स्वीकारले तर त्यांची वर्तमान आणि भविष्यातील फळे ही मधूर होऊ शकतात.परंतू काही अति महत्वाकांक्षी लोकांना परिनामांची चिंता नसते.ते उतरत्या वयात जास्तीत जास्त दुराग्रही राहून आपल्याच उध्दिष्टांवर ठाम राहतात...आणि मग घरातल्या असे पुरूष आणि अशा स्त्रिया ह्याच महाभारताच्या उत्पत्तीला कारणीभूत मुख्य पात्र ठरत असतात.
अशीच महाभारतं सध्या महाराष्ट्रातल्या राजकीय घराण्यांमध्ये घडलेली आणि घडतांना आज दिसत आहेत.याचे धक्के समाजजीवनाला बसत असून त्यामुळे याला आज हताशपणे गलिच्छ राजकारण म्हटले जात आहे.यामुळे राजकीय नेत्यांना जनतेचे रोष,संतप्त प्रतिक्रिया आणि खालच्या पातळीवरील वाईट अभिप्राय निर्लज्जपणे सहन करण्याची वेळ आलेली आहे.विभूतीपूजेला महत्व म्हणजे अंध:पतनाला सुरूवात असते.कोणत्याही व्यक्तीपेक्षा पक्ष आणि संघटना ही कधीही मोठी असते.लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी त्या पक्षाला त्या संघटनेला प्राधान्न्य दिलं पाहिजे.परंतू हे उदात्त सत्त्य लक्षात न घेता दुराग्रहाने घेतलेले निर्णय चुकीचे की बरोबर हा विचार न करता ते घेतले जातात.नेमके ते चुकीचे ठरतात.मग त्यांचे परिनाम काय होतात हे महाराष्ट्रातील काका पुतण्यांच्या तिन घराण्यातील राजकीय वादातून आतापर्यंत समोर आलेले आहे.
सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षालाही शिवसेनेप्रमाणेच मोठ्या राजकीय वादळाचा फटका बसला आहे.त्यामुळे सध्या हे पक्ष समदु:खी आहेत. यातील भुकंपाने पवार घराण्याला दुंभंगवणारे तडे गेलेले आहेत.काकांनी योग्य स्थान न दिल्यामुळे आणि पूत्रप्रेमाला झुकते माप दिल्याने शिवसेना दुभंगून नवनिर्माण सेनेचा उदय झाला होता.उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे वेगळे झाले.त्याचप्रमाणे काकांवर नाराज झाल्याने गोपीनाथ मुंडेपासून वेगळे होऊन धनंजय मुंडे राष्ट्रवादीत येऊन दाखल झाले.तशीच वाताहत आता राष्ट्रवादीची झाली असून शरद पवारांना हा उतार वयातील मोठा धक्का मानला जात आहे.अजित पवारांवर सतत अन्याय झाला,त्यांना अनेक अपमान सहन करावे लागले असे त्यांच्या डेऱ्यातील धनंजय मुंडेंसारखे त्यांचे सहकारी बोलायला लागले आहेत.परंतू खरोखरच ही बंडखोरी आहे का? की काका पुतण्यांचा राजकीय गेम आहे अशाही शंका शरद पवारांच्या अख्ख्या हयातीचा अभ्यास करणारे व्यक्त करायला लागले आहेत. नेमकं काय बीजगणित आहे त्याचं चित्र आगामी काळात स्पष्ट व्हायला सुरूवात होईल. एकनाथ शिंदेंवर अपात्रतेची टांगती तलवार असल्यामुळे आपले सरकार स्थिर ठेवण्यासाठी फडविसांनी आपली व्यवस्था अगोदरच करून ठेवली हा मुत्सद्दीपणा त्यामागे असू शकतो.
अजित पवारांकडे हजरजबाबबीपणा,संघटन आणि मिश्किल टीकाटिपणीचे योग्य कौशल्य,वक्तृत्व,आणि नेर्तृत्वक्षमता असतांना पवार त्यांना सातत्त्याने का डावलत आले, हे राज एवढ्या वर्षातही गुलदस्त्यात आहे. सुप्रिया सुळेंना कन्या म्हणून कार्याध्यक्ष केलं. परंतू अजित पवार ज्या क्षमतेने पक्षबांधणी करू शकतात तशा पध्दतीने त्या करू शकतील का ? या प्रश्नांचे उत्तर त्यांना पडणाऱ्या अनेक मर्यादांमुळे होकारार्थी देण्याचे धाडस कोणी करू शकणार नाही. तसे महाराष्ट्रातील सरकारांची पाडापाडी,बंडखोरी आणि फुटाफुटीचे जनक कोण ? असा प्रश्न जर विचारला गेला तर त्याचे उत्तर सुपर पॉवर शरदराव हेच येते.मग त्यांनीच महाराष्ट्रात या अनिष्ठ पायंड्यांची सुरूवात केली.म्हणूनच देशातील एकामागोमाग सरकारे पाडणारे मोदी त्यांना आपले राजकीय गुरू मानत असावेत. परंतू त्यांनी घडविलेल्या महाभारताची कथानकं उतारवयात त्यांच्यावरच बुमरॅंग झाली आहेत.याला नियतीचे सिध्द होणारे महात्म्य जर मानले, तर या अशा वाटचालीच्या यापेक्षाही दुर्धर शिक्षा भाजपालाही एकदिवस भोगाव्या लागणार आहेत.हे चिरंतन सत्त्य शरद पवार घराण्याच्या पुढे आलेल्या सत्त्य कथानकातून अधोरेखित होऊ शकते.आज उद्धवजी आणि राज ठाकरेंनी एकत्र यावे असे कडव्या निष्ठावंत शिवसैनिकांना अंतर्मनातून वाटते.परंतू कोणी पुढे यायचं आणि कोणी मागे जायचं, हे ठरविण्याची कुणाचीच तयारी नाही.मग अशाच दुराग्रहांनी आणि चुकलेल्या निर्णयांनी घडणाऱ्या महाभारताच्या परिनामांना कोणी थांबवू शकलं नाही.
काही का असेना अजित पवारांची बंडखोरी जर खरी खरीच असेल,म्हणजे ती सकाळच्या शपथविधीसारखी नसेल, तर याला शरद पवारांच्या चुकलेल्या निर्णयांचे परिनाम समजावं लागेल. ती स्व.वसंतदादा पाटील यांच्या आत्म्याला खरी शांती देणारी ठरली असं शालीनीताई पाटील म्हणत आहेत.तर मग खरीच बंडखोरी आहे असं समजण्यास काही हरकत नाही.परंतू पक्षांच्या महत्वापेक्षा पूत्र पौत्री प्रेमाला प्राधान्न्य आणि इतरांचे विचार ऐकून घेण्याची तयारी न दाखवता ठेवलेल्या कायम दुराग्रहाचे हे परिनाम म्हणावे लागतील.त्यातून नि:पक्षता आणि कर्तव्यनिष्ठेला फाटा दिल्याचे परिनाम काय होतात या सत्त्याला दृष्टीक्षेपात आणणारी ही घडलेली वर्तमानातील मोठी महाभारतं म्हणावी लागतील. ...!
संजय एम. देशमुख, निंबेकर
मुख्य संपादक मोबा क्र.९८८१३०४५४६
Post Views: 301