औरंगाबाद: शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यात आली असून काँग्रेसची भलामण करण्यात आली आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांचे नेतेच बदलल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच राऊत यांचे तीन नेते कोण यांची नावंही फडणवीसांनी सांगितली आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांना जोरदार कोपरखळ्या लगावल्या आहेत. सामना आणि सामनाच्या संपादकाचे केद्र बिंदू बदलले आहेत. त्यांचे नेते अलिकडच्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी झाले आहेत. मला वाटतं तिच प्रचिती त्यांच्या अग्रलेखातून दिसत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
यावेळी त्यांनी एसटीच्या संपारवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. एसटीचा संप मिटावा म्हणून विरोधी पक्ष म्हणून आम्ही भरपूर सहाकार्य केलं. आता सरकारने दोन पावलं पुढे यायला हवं. पण सरकार कामगारांसाठी दोन पावलं पुढं यायला तयार नाही. काल उपोषणकर्त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचं कळलं. मला वाटतं सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत. असंवेदनशीलतेचा हा कळस आहे. अजूनही वेळ गेली नाही. मेस्मा लागण्याआधी चर्चेतून मार्ग काढा, असं आवाहन फडणवीस यांनी केलं.
नायर रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरणावरूनही त्यांनी सरकारला फटकारले. या घटना सातत्याने घडत आहेत. पण त्यावर सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. दुर्देवाने नायरमध्ये कोणी बघायलाही गेले नाही. आमच्या नगरसेवक आणि आमदारांनी मुद्दा मांडल्यावर त्यांना जाग आली. सत्तेच्या अहंकारात एवढे मदमस्त झालेले राज्यकर्ते कधीच पाहिले नाही, जनता यांना कधीच माफ करणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसला वगळून कोणताही फ्रंट तयार होऊ शकत नसल्याचं आज स्पष्ट केलं. यूपीएचं अस्तित्व नाही ही गोष्ट सत्य आहे. ममता बॅनर्जींच्या म्हणण्यात दमही आहे. पण काँग्रेसला दूर ठेवून कोणताही फ्रंट बनू शकत नाही. काँग्रेसला दूर ठेवून फ्रंट बनवणं योग्य नाही. मध्यप्रदेशात, राजस्थान, हरयाणा, महाराष्ट्र आणि इतर राज्यातही काँग्रेस आहे. काही राज्यात काँग्रेस कमजोर आहे. पण काँग्रेसचं अस्तित्व संपलेलं नाही. काँग्रेसला इतिहास आहे. त्यामुळे काँग्रेससोबत मिळून काम केलं तर चांगला फ्रंट तयार होईल, असं राऊत म्हणाले.
Post Views: 207
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay