रस्ता सुरक्षा जागृतीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा : जिल्हाधिकारी निमा अरोरा


प्रभातमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यक्रम : विद्यार्थ्यांसह चालक वाहकांनी घेतली सुरक्ष
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  13 Jan 2023, 7:18 PM
   

अकोला : सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे पालन आवश्यक आहे. सुरक्षित वाहतुकीसंदर्भात जागृती करण्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा स्वयंसेवक म्हणून पुढे आणण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शाळा प्रशासनाला केले. ३४ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त प्रभात किड्स स्कूल येथे शुक्रवार दि. १३ जानेवारी रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 


    केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत मोन्टेकार्लो आणि प्रभात किड्स स्कूलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला जिल्हाधिकारी निमा अरोरा आणि उपविभागीय परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या होत्या; तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक राकेश जवादे, लॉयन इंजिनिअरिंगचे व्ही. व्ही. कुलकर्णी, मोन्टेकार्लो कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक राकेशकुमार सोनी प्रामुख्याने उपस्थित होते.  तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी भुषविले. यावेळी प्रभातच्या संचालिका सौ. वंदना नारे, प्राचार्य वृषाली वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होत्या. 
    वाहतूक नियमांचे पालन ही सर्वांचीच जबाबदारी असून वाहतुकीच्या नियम पालनातून या जबाबदारीचे पूर्णत: निर्वाहन होत असते. महामार्गावरील वाहतुक आणि शहरांर्तगत वाहतूकीची वेगमर्यादा भिन्न असून याचे भान ठेवावे, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाल्या. रस्ता सुरक्षा ही केवळ सप्ताहापुरती मर्यादीत न राहता, जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याची गरज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचा सत्कार प्रभातच्या संचालिका सौ. वंदना नारे यांनी केला. 
    वाहतूक नियमाचे पालन आपल्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी आहे. वाहतूक सुरक्षेसाठी अकोला जिल्हाला मिळालेल्या पुरस्कारामुळे सर्वांचीच जबाबदारी वाढली असून चालक, वाहक, नागरीक यांच्यासह विद्यार्थ्यांनीही रस्ता सुरक्षेबाबत जागरुक राहण्याचे आवाहन उपविभागीय परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले. 

    विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रभात कटीबद्ध असून प्रभातचे विद्यार्थीदेखील वाहतूक तथा रस्ता सुरक्षा प्रबोधनात स्वयंस्फूर्तीने सहभाग देतील असे प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात नमूद केले. 
    यावेळी प्रभातचे चालक, वाहक आणि विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा संदर्भात शपथ देण्यात आली. यावेळी प्रभात किड्स स्कूल निर्मित रस्ता सुरक्षे संदर्भात माहितीपट दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मो. आशिक यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभागाच्या संजीवनी अठराळे यांनी केले. प्रभातच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांच्या संयोजनात कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाहतूक विभागाच्या कर्मचार्‍यांनी अथक प्रयत्न घेतले. 
उपविभागीय परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांचा हृदय सत्कार 
अकोला जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात उपविभागीय परिवहन विभागाने रस्ता सुरक्षासंदर्भात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल राज्यशासनाकडून सन्मानित जयश्री दुतोंडे यांचा जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते हृदय सत्कार करण्यात आला. 
प्रश्नमंजुषेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग 
उपविभागीय परिवहन विभागाद्वारे विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षेवर प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

    Post Views:  205


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व