युतीसाठी फोन कुणी करायचा? शिवसेना-भाजपात रंगलं मानापमान नाट्य


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  14 Jul 2022, 10:32 AM
   

मुंबई - राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला तो स्वागतार्ह आहे. एका आदिवासी समाजातील महिलेला पुढे आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. भारतीय संस्कृतीशी त्यांना पूर्ण माहिती आहे. उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतला तो बाळासाहेबांची जी परंपरा आहे त्याला अनुसरून घेतलेला आहे अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

दीपक केसरकर म्हणाले की, शिवसेना हे कुटुंब आहे. आम्हाला २-३ लाख लोकं निवडून देतात. बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर आधारित आमचा विचार आहे. आपल्याला ते हिंदुत्व घेऊन पुढे जायचं आहे. बाळासाहेबांनी कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली नसती. उद्धव ठाकरे यांना नाईलाजास्तव महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांनी आपल्याला जे सांगितले ते ऐकायचं की पवारांचे ऐकायचं हे शिवसैनिकांनी ठरवावं असं त्यांनी सांगितले. 

तसेच बाळासाहेबांच्या वाटेने आपल्याला जायचं आहे याचा आग्रह जो शिवसैनिक धरेल त्यानं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना गुरुदक्षिणा दिल्यासारखं होईल. शिवसेना-भाजपात मानापमान नाट्य आहे. कुठेतरी मनं दुखावली गेली आहेत. ही मनं जुळली तर महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त होईल. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा पर्याय उद्धव ठाकरेंनी पुढे आणला होता. परंतु यात बदल शरद पवारांनी केला. अनेकजण माझ्यावर वैयक्तिक टीका करतात. मला जागा देऊन कुणी उपकार केले नाहीत. दोनदा राष्ट्रवादीचा उमेदवार पराभव झाला तेव्हा मला जागा दिली. मी २५ हजार मतांनी जिंकलो. शिवसेनेत आलो ४५ हजार मतांनी जिंकलो. आमचं लोकांमध्ये काम असतं म्हणून निवडून येतो असा टोला दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी नेत्यांना लगावला. 

त्याचसोबत भूतकाळात वावरू नको. शरद पवारांना पुन्हा सत्तेत यायचं आहे. शिवसेनेने पवारांच्या पालखीचे भोई होऊ नये. शिवसेना चार वेळा फुटली ती शरद पवारांमुळेच आहे. जे घडलं ते सांगण्यात कुठे पाप आहे का? मराठी माणसाला ताठ मानाने जगायला बाळासाहेबांनी शिकवलं. आज, उद्या आम्ही शिवसैनिक आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाऊ. कुणी कुणाला फोन आधी करायचा हे त्यांनी ठरवावं. कलम ३७०, राम मंदिर हे बाळासाहेबांचे विचार होते ते पूर्ण करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केले. मानापमान नाट्यात महाराष्ट्राचं हित जोपासलं जावं असं दीपक केसरकर यांनी सांगितले. 

    Post Views:  159


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व