झूठ कहते है लोग की,
शराब गमों को हलका कर देती है,
मैने अक्सर देखा है लोगो को
नशे में रोते हुए...
समाजात दारु पिणार्यांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळेच दारु विक्रीत तीन पट वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कराची रक्कम कमी केली की कराचे उत्पन्न वाढते, हा आचार्य चाणक्य यांनी तत्कालीन महाराजांना दिलेला सल्ला व सूत्र या काळातले महाराजे म्हणजेच सरकारने वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आयात केलेल्या मद्यावरील (विदेशी दारुवरील) उत्पादन शुल्क पन्नास टक्के कमी करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या पावणे दोन वर्षात विदेशी दारुची विक्री तिप्पट झाली असून त्यामुळे राज्याच्या महसुलातही भर पडल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.
देशात कोवीड नंतर दारुची विक्री वाढलेली आहे. १२५ कोटी लोकसंख्येच्या भारत देशात वर्षाला ३५० कोटी लीटर दारु पिल्या गेली आहे. या बाबतचा अहवाल कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक ब्रुव्हरीज कंपनीज या संस्थेने प्रसिध्द केला आहे. भारतातील १२ हजार ५१८ दारु दुकानातून ही विक्री झाली असून दारुमध्ये ६३ टक्के व्हिस्कीची सर्वाधिक विक्री होते, असे म्हटले आहे. त्यातही भारतातील गुजरात (७० वर्षांपासून) नागालँड (३० वर्षांपासून), मिझोरम (पूर्वी १९९७ नंतर ३१ मार्च २०१९ पासून) तर बिहार (२०१६ पासून) या चार राज्यात व लक्षव्दिप या केंद्रशासीत प्रदेशात दारुबंदी आहे. विशेष म्हणजे लक्षव्दिपमध्ये बहुसंख्य मुस्लीम असल्याने दारुबंदी झाली व विरोध झाला नाही. कारण मुस्लीमांमध्ये दारु पिण्याचे प्रमाण नाहीसारखे आहे. तर बिहार राज्याने दारुमुळे गुन्हेगारी वाढते व बेकारी वाढते, असे म्हणत दारुबंदी केलेली आहे.
महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर गेल्या वर्षभरात देशीदारु ३७ कोटी ९९ लाख म्हणजेच सुमारे ३८ कोटी लिटर विक्री झाली तर विदेशी दारु २७ कोटी ५० लाख लिटर अशी साडे पासष्ट कोटी लिटर दारुची विक्री झाली आहे. बियर पिणार्या तरुण-तरुणींची संख्याही वाढत असून राज्यात ३२ कोटी लिटर बियरची विक्री झाली आहे. बियर पिणे ही दारु पिण्याची पहिली पायरी आहे, असे म्हणतात. म्हणजेच आगामी काळात दारु पिणारे आणखी वाढणारच आहेत. त्यातही राज्यातील वर्धा, गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी आहे. सर्व प्रकारच्या मद्य विक्रीतून महाराष्ट्र राज्य सरकारला गेल्या वर्षी २१ हजार ५५० कोटी रुपये महसूल मिळाला असून विक्री करातून सुमारे १६ हजार कोटीची भर पडत आहे. यंदा एप्रिल २३ ते जून २३ या तीन महिन्यात ७ हजार ७०० कोटीचा महसूल मद्य विक्रीतून जमा झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे गावठी व अवैध दारुचे प्रमाणही प्रामुख्याने ग्रामीणमध्ये भरपूर असून हप्ते वसुलीचे जाळे घट्ट विणल्या गेले आहे. दारुमुळे सर्वाधीक उत्पन्न उत्तरप्रदेशचे ४१ हजार २५० कोटी असून त्यानंतर कर्नाटक व महाराष्ट्र आहे.
समाजात दारु पिणार्यांची संख्या त्यातही तरुणी, महिलांची संख्या वाढणे हे काही समाजाच्या प्रगतीचे लक्षण नाही. दारुचे दुष्परिणाम खूप आहेत. कौटुंबिक हिंसाचारात वाढ, गुन्हेगारीत वाढ, आरोग्याचा तक्रारीत वाढ, आर्थिक टंचाई, अमानवीय वागणूक, संसार उद्ध्वस्त होणे, आदी अनेक प्रकार वाढत आहेत. मात्र राज्याचे व देशाचे आर्थिकचक्र दारुच्या टॅक्समुळे फिरते अशी काहीशी स्थिती झाल्याने भरपूर दारु प्या-टॅक्स द्या - आणि मरा असे अघोषित धोरण सरकार राबवित आहे. अवैध दारु, डुप्लीकेट दारु याची समांतर अवैध व्यवस्था आणि हप्ते वसुली चालते, तो भाग वेगळाच, त्यातून कार्यकर्ते, काडीकर्ते व अनेक कामांचे खर्च पोसले जातात आणि अशा अवैध दारुचेही पिणार्यांवर शारीरिक व इतर दुष्परिणाम होतात, हे जाहीर आहे. तर अर्थकारण मजबूत असल्याने दारुबंदीचे आंदोलने अयशस्वी ठरतात. आंदोलनामध्ये काही आंदोलन फक्त अवैध दारुबंदी करावी एवढ्याच मागणी असतात, जणू काही वैध दारु हे अमृतच आहे. जेव्हा दारुचे दुष्परिणाम आहेतच तेव्हा वैध काय किंवा अवैध काय? दारु बंदच पाहिजे. मात्र वैध दारुची विक्री वाढावी म्हणून अवैध दारुचा विरोध, अशी सोईची भूमिका यामागे असते. वास्तविक दारुमुळे गरिबांचे मृत्यू हे तर वैध काय आणि अवैध काय? दारु पिल्याने मरणार, हे ठरलेलेच.
दारुचे व्यसन सोडविणार्यांच्या जाहिराती वाढल्या आहेत. व्यसनमुक्तीचे, ताण-तणाव मुक्तीचे, नैराश्यातून बाहेर काढणार्यांचे दुकानही चालत आहेत. मात्र फारसा उपयोग होतांना दिसत नाही. एकूणच दारु पिणार्यांची संख्या वाढणे ही गंभीर राष्ट्रीय समस्या झाली आहे. समाज, कुटुंब व्यवस्था प्रभावीत होत आहे. मात्र सरकारच्या फायद्याच्या या समस्येला गांभिर्याने कोण घेणार? हा प्रश्नच आहे.
शेवटी दारु पिणे घातक असल्याचे माहिती असतांनाही पिणार्यांसाठी एक शेर आठवतो...
कुछ तो शराफत सीख ले
इश्क शराब से
बोतल पे लिखा तो होता है,
मै जानलेवा हूँ।
राजेश राजोरे
मो.नं. : ९८२२५९३९०३
rajeshrajore@gmail.com
खामगाव, जि. बुलडाणा.
(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Post Views: 186