सारस बियाणे कंपनीकडून अनेक कास्तकारांची फसवणूक
कास्तकार अनंत देशमुख यांची कृषी अधिकार्यांकडे तक्रार
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
26 Jul 2023, 7:12 PM
अकोला ः सारस या बियाणे कंपनीचे सोयाबीन बिज पेरणीनंतर उगवलेच नसल्याने हजारो शेतकर्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कास्तकाराने त्या कंपनीकडे तक्रार केली. परंतू कंपनी व्यवस्थापकांनी कोणताही दिलासा न देता उडवाउडवीचे उत्तरे दिल्यामुळे याप्रकरणाची तक्रार सांगळुद येथील कास्तकार अनंत दिगांबर देशमुख यांनी तालुका कृषी अधिकारी, अकोला यांचेकडे केली आहे.
याबाबत सविस्तर वृतांत असा की, सांगळुद येथील तक्रारकर्त्या कास्तकारांनी दि. 13 जुलै रोजी जेएस 335 चे 11 बॅग सारस कंपनीचे सोयाबिन संजय झामरे यांच्या संजय कृषी सेवा केंद्रातून बिज विकत घेतले. परंतु त्या वाणात उगवण शक्तीच नसल्याने त्यांच्यासह असंख्य कास्तकारांची पेरणी वाया गेली. यामुळे कास्तकारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊन दुबार पेरण्या कराव्या लागल्या. याबाबत अनंत दिगांबर देशमुख यांनी सर्व कास्तकारांच्या वतीने सारस कंपनीचे व्यवस्थापक श्री. मनिष ताथोड यांचेकडे फोनद्वारे प्रथम तक्रार केली. त्यांनी याबाबत कोणताही समाधानकारक खुलासा न केल्याने शेवटी कंपनी मालक श्री. विनोद राठोड यांना फोन केला. परंतु त्यांनीही याबाबतची तक्रार मंजूर न करता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांनी शेवटी तालुका कृषी अधिकार्यांकडे तक्रार करून दाद मागीतली आहे. शेतकर्यांना बोगस बियाणे पुरवून त्यांना आर्थिक संकटात टाकणार्या कंपनीविरूद्ध कारवाई करून त्यामुळे शेतकर्यांच्या बियाण्याची किंमत आणि या फसवणुकीमुळे होणार्या संभाव्य नुकसानाची भरपाई कंपनीकडून देण्यात यावी, अशी फसवणुक झालेल्या सर्व कास्तकारांची मागणी आहे.
Post Views: 160