खान्देश म्हटलं की,कविता... केळी आणि कापूस ह्या तिन क ची आठवण येते. परंतु चौथा क देखील त्याला जोडावा लागतो. ते आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले अश्या कलम कारांची जोड आपल्याला खानदेशात दिसून येते. त्यात स्व. देवकीनंदन नारायण,स्व.ब्रिजलाल भाऊ पाटील,स्व. नानासाहेब नेहेते,स्व.भागवत राव चौधरी,स्व.दादासाहेब पोतनीस,स्व. भाई मदाने,स्व.कांतीलालजी गुजराथी,स्व.महिपत्सिंगजी राजपूत, स्व.विठ्ठल सिंग राजपूत,स्व.अतुल जोशी,स्व.वा.ना.फडणीस,स्व. द्वारकादास पालीवाल हे बाबुजी व द्वारका मास्तर म्हणून सर्वत्र परिचित होते. ह्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावाच लागेल.आज स्व. द्वारकादास पालीवाल यांची विसावा पुण्य स्मृती दिनाच्या निमित्त त्यांना समर्पित ही शब्द सुमनांजली.....
द्वारका मास्तर स्व. पोपटसा बाबांच्या परिवारातील पांच भावांडामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे बंधू. वडील कट्टर काँग्रेसी देश भक्त,स्वाभिमानी,स्व. लोकमान्य टिळक यांच्या दै. केसरी चे वार्ताहर, दलालीचा व्यवसाय,लासूर ता. चोपडा येथील अनेक समाजसेवी कार्यात सहभागी व्यक्तिमत्त्व. परंतु मास्तर यांच्यावर संघ विचारांचा प्रभाव होता. वयाच्या चौदाव्या वर्षी स्वातंत्र्य आंदोलने व भुभिगत सेवेत उडी घेतली एकोणाविसाशे बेचाळीस चे आंदोलनात सक्रिय सहभागी असलेल्या बाबुजी यांना कमी वयाचे असल्याने समज देऊन सोडून दिले.स्व. दादासाहेब सीताराम संपत पाटील, तापिराम रावजी, डॉ. विठ्ठल राव पाटील,स्व.मोतीलालकाका गुजराथी, आदींच्या माध्यमातून त्यांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्याच वेळी त्यांनी वार्ताहर म्हणून दैनिक त्रिकाळ, दैनिक मराठा, दैनिक नवशक्ती, तरून भारत, यांच्या सेवेत उडी घेतली.त्याकाळच्या पत्रकारिता संदर्भात बाबुजी यांचेशी आम्ही अनेकदा चर्चा केली. त्यांनी सांगितलेले अनेक किस्से ऐकल्यावर अंगावर शहारे येतात. स्वातंत्र्य पूर्व कालीन पत्रकारिता म्हणजे सतीच वाण अन् सेवेचं दान म्हटलं जात होतं.
बाबुजी यांना प्राथ.शिक्षकाची नोकरी मिळाली, पण संघ विचारांचा प्रभाव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. नेहमीच काही तरी समाजसेवी उपक्रम राबविने, ह्यात ते नेहमीच अग्रभागी रहात. संघ विचारांनी घर सांभाळून घेत परिवाराची जबाबदारी देखील ते समर्थपणे पार पाडीत असत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर म्हणून,सतत काळी टोपी धारण करणारे म्हणून,व संघ कार्यात सहभागी होऊन समर्पित कार्यकर्ता म्हणून त्यांना सर्व तालुका ओळखत असत. गणेश सांस्कृतिक मंडळ, चोपडा रिटेल किराणा व्यापारी संघ, रॉकेल विक्रेता संघ, तालुका पत्रकार संघ, ज्येष्ठ नागरिक संघटना, चोपडा आदी अनेक संघटनेचे ते संस्थापक व सदस्य होते.
स्व.बाबूजींच्या परिवारातील चौथी पिढी आजही पत्रकारितेत असताना आपल्या परीने तालुक्याची व महाराष्ट्राची सेवा करीत आहे.
जून पंच्याहत्तर च्यां आणीबाणी प्रसंगी स्व. बाबुजी हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्था प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यांनी राजकीय जीवनात जनसंघ, भाजप चे निस्वार्थ कार्य केले. कोणतेही काम करण्याची तयारी, असलेल्या बाबूजींनी कधीही तिरस्कार केला नाही. आज पत्रकारितेत सध्या वस्तुनिष्ठ पणा दिसत नाही, कॉपी पेस्ट पत्रकारिता आघाडीवर दिसून येते.
स्व. नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्या निकटवर्तीय पैकी बाबुजी एक होते, परंतु मास्तरकीची नोकरीवर तुलसिपत्र ठेवूनही मी संघ व देशासाठी नोकरी सोडली, असे ठामपणे सांगणारे बाबुजी सारखे विरले व्यक्तिमत्त्व आजच्या काळात मिळणे कठीण आहे.
बाबुजी परिवाराला पत्रकारिता विरासत म्हणून मिळाली, असेच काही त्यांच्या परिवारातील चौथ्या पिढीस कार्यरत असताना पाहिल्यावर दिसून येते.बाबूजींच्या परिवारातील सदस्य त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत.तो लेखाचा विस्तार पाहता स्वतंत्र विषय होऊ शकतो. असो.
द्वारका मास्तर म्हणून त्यांनी राजकीय जीवनात व पत्रकारितेत अनेकांना आपल्या मार्ग दर्शनाच्या माध्यमातून घडवलं, परंतू कोणताही बडेजाव पणा केला नाही.
बाबूजींच्या निधनाचे वृत्त समजताच तत्कालीन महाराष्ट्र विधान सभा सभापती यांनी वाहिलेल्या श्रद्धांजली पर मनोगतातून बाबूजींना चोपड्या चे बाळ शास्त्री जांभेकर गेलेत, अश्या शब्दातून बाबूजींच्या कार्याबद्दल स्तुती केली होती., आमच्या सारख्या अनेक नवोदित पत्रकारांनाही बाबुजी उर्फ द्वारका मास्तर यांचे सतत मार्ग दर्शनाच्या लाभानी प्रभावित केले आहे. त्यांच्या विसाव्या पुण्य स्मृती दिनाच्या निमित्ताने आम्ही नतमस्तक होत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कार्य स्मृति वर्तमानकाळातील पत्रकारांना सतत प्रेरणा देणारे आहे. ओम् शांती.
लेखक...रविकुमार पवार, नंदुरबार
Post Views: 78