मोबाईलचा नाद सोडा ; पुस्तकाशी नाते जोडा - लोककवी डॉ.विठ्ठल वाघ


हाँगकाँगवरून संध्या जाणे यांनी केली वीस हजार रुपयांची मदत
 पंकज देशमुख  24 Dec 2021, 4:30 PM
   

टाकळी (छबिले)  : मोबाईलचा नाद सोडा आणि पुस्तकांशी नाते जोडा, असे आवाहन करीत जीवनात प्रगती करावयाची असेल तर भरभरून वाचन करा, असे प्रतिपादन लोककवी डॉ.विठ्ठल वाघ यांनी केले.टाकळी (छबिले) येथील जिल्हा परिषद शाळेत साने गुरुजी वाचनालयाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

हाँगकाँग येथील एका प्रतिष्ठित कंपनीच्या संचालिका तथा सातत्याने सामाजिक जाणीवा जपत मायभूमीवर प्रेम व्यक्त करणाऱ्या श्रीमती संध्या जाणे यांनी वीस हजार रुपयांचे साहित्य तथा पुस्तके पाठवून सहकार्य केले आहे. तसेच डॉ.विठ्ठल वाघ यांनीदेखील ११,००० रुपयांची पुस्तके वाचनालयाला भेट म्हणून दिली. अशाप्रकारे अद्ययावत वाचनालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश पाटील छबिले होते तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, साधनव्यक्ती गणेश राठोड, गायकवाड सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रविण छबिले, उपाध्यक्ष माधुरी छबिले, सदस्य नागेश चोटमल, अविनाश छबिले, अंबादास छबिले, उपसरपंच उमेश छबिले, नागोराव छबिले, सुरेखा छबिले यावेळी उपस्थित होते. वाचनसंस्कृतीची जोपासना करणाऱ्या ह्या उपक्रमाची तसेच शाळेतील विविध गुणवत्तापूरक उपक्रमांची सर्व मान्यवरांनी प्रशंसा केली.

गाडगेबाबांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. डॉ.विठ्ठल वाघ यांनी वाचनालयाचे लोकार्पण करताना देवकीनंदन गोपालाचा गजर करीत लोकसंस्कृतीचा गौरव करणाऱ्या कविता सादर करीत तासभर विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. कवितेचे झाड या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. टाकळी (छ.) शाळेच्या वाटचालीचा आम्हाला अभिमान वाटतो, अशी भावना व्यक्त करीत गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी आपल्या मनोगतातून डॉ.विठ्ठल वाघ यांच्या साहित्याबद्दलचा आदरभाव व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी मुख्याध्यापक किशोर बळी यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका कु.शारदा माहोरे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

    Post Views:  360


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व