पुणे: गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. पटेल यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. गांधीनगर ही देशाची आर्थिक राजधानी होण्याची कुणी कितीही स्वप्न पाहिली तरी देशाची राजधानी होऊ शकत नाही. मुंबई हीच देशाची आर्थिक राजधानी राहील हे भाजपच्या लोकांना कळले पाहिजे, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री येऊन गेले. गुजरातच्या आनंदीबेन आल्या होत्या. आता पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री आले आहेत. प्रत्येक लोक येतात. परंतु, कधी कटकारस्थान करुन महाराष्ट्राचे उद्योग पळवण्याचे काम कुणी केले नाही, अशी टीका मलिक यांनी केली.
7 वर्षात मोदी सरकार आल्यानंतर उद्योग व आस्थापना मुंबईमध्ये न होता गुजरातच्या गांधीनगरमध्ये कसे होतील? मोदीसाहेबांचे आदेश व देवेंद्र फडणवीस यांचा होकार यामुळे महाराष्ट्राचे बरेच नुकसान झाले आहे. त्यामुळे जे लोक बोट दाखवत आहेत त्याबाबतीत त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा चिमटाही त्यांनी काढला. महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. व्यापार उद्योगासाठी पहिली प्राथमिकता महाराष्ट्राला देत आहेत हेही त्यांनी स्पष्ट केलं.
खोटं बोलण्यात भाजपची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होऊ शकते. इतर लोकं खोटं बोलतात हे भाजपनं म्हणणं हास्यास्पद आहे. खोटं बोला पण रेटून बोला हा भाजपच्या लोकांचा उद्योगच आहे, अशी टीका त्यांनी केली. जे स्वतः खोटं बोलण्याचा उद्योग करतात त्यांना दुसर्यांकडे बोट दाखवण्याचा अधिकार नाही, असंही त्यांनी सुनावले.
ममता बनर्जी मुंबईच्या खासगी दौऱ्यावर असताना शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटल्या. गुजरातचे मुख्यमंत्री येतात, ते भाजपवाल्याना भेटतात तेव्हा आम्ही काही बोलत नाही. आम्ही गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना वेगळी ट्रिटमेंट दिली नाही, असं त्यांनी सांगितलं. फडणवीसांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावं. आजच्या घडीला एनडीएमध्ये कोणी नाही.भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण झालेलं आहे. देशातील सर्व विरोधकांची मोट बांधण्याची जबाबदारी पवारांनी घेतलेली आहे. ममता बॅनर्जी आल्यावर याविषयावर चर्चा झाली. आम्ही काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांनासोबत घेऊन सशक्त आघाडी करून पर्याय देणार आहोत. त्यामुळे भाजपने त्याची चिंता करू नये, असा चिमटा त्यांनी काढला.
Post Views: 237
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay