असंवेदनशील सरकारच्या बेफिकीरीने रणरणत्या उन्हाचे १४ बळी...!
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
20 Apr 2023, 11:46 AM
माणसांच्या जीवनापेक्षाही राजकारण जेव्हा श्रेष्ठ व्हायला लागते तेव्हा त्या राजकारणाच्या व्यसनांमध्ये लिप्त झालेल्या नेत्यांच्या डोक्यांचा ताबा तोडातोडी फोडाफोडीच्या राजकीय किड्यांनीच घेतल्याने सामान्न्य माणसांचे नाहक बळी जात राहतात.या राजकीय सारीपाटात बेधुंद झालेल्या निष्क्रिय नेत्यांमुळे निरपराध लोकांचे किड्या माकोड्यासारखे कसे बळी जातात,याचे मरणनाट्यम् आप्पासाहेब धर्माधिकारी या बड्या माणसाला दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्रभूषण कार्यक्रमात खारघर मैदानावर घडलेले आहे.नेत्यांच्या बडेजावासाठी,त्यांच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाण्यासाठी गर्दी जमविल्या जाते.परंतू त्या गर्दीचे नियोजन आणि लोकांच्या जीवांच्या संरक्षणाच्या कामात लक्ष घालण्यास या नेत्यांना वेळ नसतो.ही अक्षम्य हेळसांड सामाजिक कर्तव्यातली भयानक दिरंगाई ठरते.
जनतेच्या पैशांवर बडेजाव करणाऱ्या नेत्यांच्या संरक्षणार्थ कोट्यावधी रूपये खर्च केले जातात .मात्र तापत्या कडक उन्हात बसलेल्या लोकांसाठी साधी शेडचीही व्यवस्था न करणारे सरकार किती कठोर आहे याचा आँखो देखा हाल साऱ्या महाराष्ट्राने पाहिला.स्वत:च्या सत्तेच्या गणितासाठी विशिष्ट गटाची या महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी लाखोंची गर्दी जमविल्या गेली.उन्हात बसलेल्या या लोकांचे हे स्वत:ला उन्हात तापवून घेण्याचे त्यांना पराक्रम वाटले.आप्पासाहेबांवर असलेल्या निष्ठेमुळे कडक ऊन्हातही कुणी जागेवरुन हलत नाही म्हणून व्यासपीठावर सावलीत बसलेले अमित शहा मुख्यमंत्री,आणि उपमुख्यमंत्री या लोकांवर कोरड्या कौतुकाचे वर्षाव करीत होते.परंतू लोकं तापत आहेत आणि वरून डोक्यावर सावली नाही. म्हणून आपल्या राजकीय दुकानदाऱ्यांची भुलथापा देणारी भाषणं जरा आवरती घ्यावी एवढीही दयामाया या नेत्यांमध्ये नव्हती.
हा महाराष्ट्र भूषणचा बाजार मांडणाऱ्या कठोर पाषाणहृदयी वागणूकीने महाराष्ट्रदुषण ठरलेल्या या लोकांचा हा राजकीय आखाडा होता. गेलेले जीव परत येणार नाहीत.म्हणून साप गेल्यावर फरकांड्यावर रट्टे मारणाऱ्या सरकारने सर्व झालं गेल्यावर आता दुपारी १२ ते ५ या वेळेतील सभा आणि रॅलींना बंदी घालणारा निर्णय जाहिर केला. हे उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल.परंतू त्यापूर्वी उन्हाच्या कडाक्यात २० लाखांच्या आसपास श्री परिवाराचे लोकं जमणार, तिथे व्यवस्थेचे नियोजन कसे करावे,किंवा व्यवस्था जमत नसेल तर हा कार्यक्रम सायंकाळी घेण्याचा समंजसपणा सरकारने वेळीच का बाळगला नाही.आपल्याच दुर्लक्षितपणाने हे घडले असतांनाही बेपर्वाही कोठे झाली नाही,अशी स्पष्टीकरणे देऊन ,त्याचे राजकारण करू नका अशी आवाहने सरकारातील निगरगठ्ठ लोकांसह पुरस्कारार्थी आप्पासाहेबही करीत आहेत.मग आपल्याच कार्यक्रमात असे घडले म्हणून मी हा पुरकारच परत करण्याचा मनाचा मोठेपणा ते दाखवून शकतील का ? आप्पासाहेबांसारख्या माणसाने मिळालेले २५ लाख रूपये सरकारला परत करणे ही फार मोठी गोष्ट ठरत नाही.परंतू जेथे मेलेल्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी फक्त ५ लाख देऊन सरकार त्यांची बोळवण करते याला काय म्हणावे?शेवटी माणूसकीच इथे ओशाळली असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
१४ लोकं बिचारी मेली,नाहक जीवानं गेलीत.त्यांची कुटूंबं उध्वस्त झालीत.काही चेंगराचेंगरीत जखमी पण झालीत.परंतू त्यांच्या जाण्यामुळे आणि झालेल्या जखमींमुळे वेदना तरी झाल्या पाहिजेत.पण दुसऱ्यांच्या जखमांच्या वेदना अशा लोकांना कुठून होणार? कार्यक्रम घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे सारे लक्ष "अजित दादा गेले आणि अजितदादा आले",व नव्या संभाव्य शपथविधीकडे लागलेले होते.त्यामुळे घडलेल्या मृत्यूनाट्याची धग किती मोठी आहे.मृत्यू गेलेल्यांची किती हानी झालेली आहे.याचे साधे मोजमापही मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला करता आले नाही.राजकारणातून ईतरत्र लक्ष द्यायला जास्त वेळ नाही, म्हणूनच अत्यंत घाईगर्दीत मृत्यू पावलेल्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ५ लाख रूपये जाहिर करून त्यांची सांत्वना करण्याचे प्रयत्न केले गेले.गेलेल्या जीवाची किंमत भरून निघत नसते.मदत ही जखमेवरची तात्पूरती मलम पट्टीच असते.म्हणून ती जखम तात्पूरती शमविली जावी अशा व्यवस्थित पध्दतीने बांधता तरी आली पाहिजे.परंतू सरकारच्या नियोजनशुन्य आणि कमालीच्या असंवेदनशीलतेचे बळी ठरलेल्या त्या दूर्दैवी कुटूंबांना फक्त ५ लाख रूपये देणे हे सहानुभूतीच्या कोणत्या चौकटीत बसते हे सरकारने स्पष्ट केलं पाहिजे.झालेल्या घटनेची काटेकोर चौकशी होऊन या ढिसाळ नियोजनामध्ये दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंदविले गेले पाहिजेत. त्याचे बळी नेहमी यंत्रणेतील खालील लोकच ठरत असतात.परंतू जबाबदार पदाधिकारी असलेले मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि सरकारच यातील प्रथम दोषी असतात.त्यांनी नियोजनाचे आदेश देऊन ते काम व्यवस्थित झालं किंवा नाही याची पडताळणी आपल्या कुरघोड्यांच्या उपद्व्यापातून वेळ काढून, थोडं लक्ष देऊन जातीने वेळीच करून घेतली पाहिजे. नाहीतर नेहमीच असे बळी जाण्याच्या दुर्दैवी घटना घडत असतात,यापूर्वीही घडलेल्या आहेत.
राजकीय नेत्यांना जसे संरक्षण पाहिजे असते तेव्हा त्यांच्या राजकीय स्टंटसाठी जमविलेल्या गर्दीला सुरक्षा देण्याची,सर्वबाजूंनी संरक्षित करण्याची जबाबदारी कुणाची? जे घडू नये ते हे सगळं घडलं. सामान्य लोकांच्या जीवनाबद्दल संवेदनशील असणारा सगळा महाराष्ट्र या घटनेने हळहळला.जे घडलं ते घडायला नको होतं.म्हणून त्याबध्दल,त्यातील नियोजनाच्या दिरंगाई बद्दल,कडक रणरणत्या उन्हात लोकांना तापविण्याच्या असमंजस अक्षम्य पागलपणाबध्दल बोलणारांनाच फटकारल्या गेलं.चुकांची उजळणी करणारांना या घटनेचे राजकारण करू नका म्हणणाऱ्यांनी काही विचार केला पाहिजे.आपण खरोखरच चुकलो यांची अंतर्मनातून प्रामाणिकतेने कबूली दिली पाहिजे. या घटनेची शरम काही तरी खंत वाटली पाहिजे.आपलीच डोकी राजकारणात किती पागल झाली आहेत हे अगोदर मान्य करावं .स्वतःच्या मतलबी राजकारणामुळेच आपण लोकांना किड्या मुंग्या प्रमाणे समजतो.आपल्याकडे त्यांच्या जीवाची किंमत त्यापलिकडे अधिक नाही हेच अशा घटनांमधून दिसते आहे. सरकारच्या चुकांबाबत कोणी बोलले म्हणजे त्याला राजकारणाचे नाव देऊन मोकळे व्हायचे,प्रेताचे खच पडले तरी चालतील आम्ही आमचे महाराष्ट्र भूषण सारखे महाराष्ट्र दुषनी सोहळे चुकीच्या नियोजनात चालवत राहणार. याला माणूसकी ,मानवता म्हणायचे का? लोकांचे जीव सत्ताधाऱ्यांना एवढे स्वस्त वाटतात का? त्या गेलेल्या जीवांची प्रत्येकी ५ लाख रूपये किंमत ठरवून परत आपल्या जीवाभावाच्या महत्वाच्या राजकीय घडामोडीत गर्क होणार.अशा लोकांना स्वतःला माणसं म्हणतांना काही तरी वैषम्य वाटलं पाहिजे.अपराधीपणाची भावना निर्माण झाली पाहिजे.याला कारणीभूत आपण आहोत हे लक्षात घेऊन त्यांनी चुकीची कबूली म्हणून स्वाभिमानाने आपल्या पदांचे राजीनामे देण्याची प्रामाणिकता दाखवावी. तिचं विश्वसनियता पाहण्याची जनतेला आंस आहे. जे राजीनामे आपण ईतरांना किरकोळ प्रकरणातही नेहमी मागत असतो तोच निर्णय स्वत:बाबतित घ्यायला काय हरकत आहे ? तोच न्याय स्वतः साठीही लागू करावा.तिच त्या त्या गेलेल्या निरपराध आत्म्यांना दिलेली खरी श्रध्दांजली ठरेल....!
संजय एम. देशमुख
मो. ९८८१३०४५४६
Post Views: 289