बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील अनावश्य अटी शिथील कराव्यात
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
23 Jan 2023, 7:34 PM
अकोला ः स्व. बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतून पत्रकारांना निवृत्तीपश्चात मानधन देऊन त्यांचा सन्मान करण्याच्या उद्धिष्टाला हरताळ फासून त्याऐवजी दिल्या जाणार्या यातना आणि हेलपाट्यांमधून पत्रकारांचा एक प्रकारे सन्मानाऐवजी अवमान केला जात आहे. मानधनावर आणि कमिशन तत्वावर काम करणारे पत्रकार छायाचित्रकारां सारख्या वृत्तपत्र क्षेत्रातील लोकांना पगारपत्रके अन्य विचीत्र अटी आणि 40 वर्षापूर्वीचे पुरावे मागून त्यांच्या यातनांमध्ये भर घालण्याचे काम शासनाकडून होत आहे. म्हणून यातील अनेक क्लिष्ट अटी रद्द करून सुधारीत योजना पत्रकारांसाठी लागू करावी, अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख (निंबेकर) यांनी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेन्द्र फडणवीस यांचेकडे केली आहे. प्रथम मेलद्वारे आणि मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट न होऊ शकल्याने त्यांच्या जावक कक्षातून सुद्धा या संदर्भातल्या मागण्यांची पत्रं प्रत्यक्ष मंत्रालयात देण्यात आलेली आहेत.
आयुष्यभर तुटपुंज्या वेतनात काम करून लोकशाही संवर्धन, सामाजिक विकास, जागृती तथा शासकीय योजना लोकाभिमुख करण्यासाठी आपले आयुष्य खर्च करणार्या पत्रकारांना या योजनेचा सुलभरितीने लाभ देऊन उत्तरार्धात तरी त्यांचा उचित सन्मान झाला पाहिजे. परंतु सन्मानयोजनेच्या मानधनाची आतुरतेने वाट पाहणार्या अनेक पत्रकारांच्या पदरी यातनांशिवाय काही पडले नाही. ह्या कथा आणि व्यथा सांगतानाच अनेक पत्रकारांनी या जगाचे निरोपही घेतलेले आहेत. पत्रकारांच्या शासनासोबतच्या सदिच्छा वृद्धींगत होण्यासाठी या योजनेचा अभ्यास करून नवी सुधारीत योजना पत्रकारांसाठी सुरू करावी, अशी मागणी संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी या पत्रातून केलेली आहे. याबाबतच्या मेलची पोचही मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेली आहे.
Post Views: 201