जिल्हाधिकारी यांनी घेतला लसीकरण मोहिमेचा आढावा कमी लसीकरणाच्या ठिकाणी गती वाढविण्याचे निर्देश
अकोला, दि.1- कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’, ही मोहिम सुरु करण्यात आली असून या मोहिमेमुळे लसीकरणाची गती व प्रमाण वाढले आहे. तथापि काही भागात लसीकरण कमी आहे अशा ठिकाणी लक्षकेंद्रीत करुन गती वाढवा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. यासंदर्भात आज जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत त्यांनी यंत्रणांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे निर्देश दिले.
जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो-पटोकार, नगर प्रशासन अधिकारी सुप्रिया टवलारे, महिलाव बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, मनपा वैद्यकीय अधिकारी विलास मरसाळे, मनपा वैद्यकीय अधिकारी अस्मिता पाठक, तसेच सर्व गटविकास अधिकारी, तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यात लसीकरणाची विशेष मोहिम सुरु झाली असून लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसादामुळे गती वाढली आहे. परंतु काही भागात लसीकरण कमी आहे अशा ठिकाणी लसीकरण केंद्र वाढवावे. लसीकरण प्रमाण वाढविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे, लसीकरणाचे फायदे समजावणे, लोकांना आवाहन करणे, त्यासाठी प्रत्यक्ष कॉल करणे इ. उपाययोजनांसोबतच रेडिओ व अन्य माध्यमांद्वारे जनजागृती करावे. तसेच लसीकरण कमी असलेल्या भागात तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी व स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांनी लक्ष केंद्रीत करुन लसीकरण प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावे,असे निर्देश श्रीमती अरोरा यांनी दिले.
Post Views: 242