तिसर्या महायुद्धाची नांदी रशिया-युक्रेन युद्ध पेटले
असंख्य नागरिक बेघर, शेकडो जखमी
मॉस्को : युक्रेन नाटो संघटनेचा सदस्य होऊ इच्छित आहे. मात्र रशियाचा याला विरोध होत असून, यावरूनच दोन्ही देश आमनेसामने उभे ठाकले आहेत. रशिया-युक्रेन वादाची ठिणगी युद्धात परावर्तीत झाली असून, एकीकडे रशिया आणि दुसरीकडे युक्रेनच्या बाजूने नाटो संघटनेचे सदस्य असलेले देश एक झाल्याने तिसर्या महायुद्धाची ठिणगी पडल्याचे जग अनुभवत आहे. गुरुवार, 24 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात 10 नागरिकांसह 40 युक्रेनियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आता अधिकच चिघळला आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. एवढेच नाही, तर युक्रेन-रशिया युद्ध आता टाळता येणार नाही, असेही पुतीन यांनी म्हटले आहे. रशियाने लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये बॉम्ब स्फोटांमुळे जीव वाचविणार्या नागरिकांचा टाहो जग पाहत आहे. युक्रेनची राजधानी कीववर क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. याचबरोबर लष्करी कारवाईची घोषणा करत पुतिन यांनी या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप करू नये, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकीही दिली.
रशियन सैन्याने लष्करी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईला युक्रेन लष्कराकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. रशियाचे रणगाडे युक्रेनमध्ये पोहोचले आहेत. लाखो युक्रेन नागरिक देश सोडून निघाले आहेत. युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. रशियाच्या आक्रमणाला युक्रेनकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.
नाटोचे सदस्य असलेल्या देशांनी रशियाला लष्करी कारवाई थांबवण्याचे आवाहन केले आहे. कारवाई सुरू ठेवल्यास परिणाम भोगण्याचा इशारा अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांनी रशियाला दिला आहे. मात्र, रशिया माघार घेण्याच्या तयारीत नाही. युक्रेन नाटो संघटनेचा सदस्य होऊ इच्छित आहे. मात्र रशियाचा याला विरोध आहे. यावरूनच दोन्ही देश आमनेसामने आले आहेत.
रशिया-युक्रेनमध्ये संघर्ष पेटला असताना दोन्ही देशांच्या लष्करी सामर्थ्याची चर्चादेखील सुरू झाली आहे. लष्करी क्षमतेत रशिया युक्रेनपेक्षा कितीतरी पुढे आहे. रशियाकडे फादर ऑफ ऑल बॉम्ब आहे. हा बॉम्बमध्ये आण्विक सामर्थ्याचा वापर करण्यात आलेला नाही. मात्र तो अतिशय शक्तिशाली आहे. गरज पडल्यास युक्रेनमध्ये याचा वापर करण्यात यावा, अशा सूचना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी लष्कराला दिल्या आहेत. अध्यक्ष पुतीन यांनी फादर ऑफ ऑल बॉम्बच्या वापराचे आदेश दिले आहेत, असे वृत्त ब्रिटिश वृत्तपत्र मिररने दिले आहे. फादर ऑफ ऑल बॉम्बचा वापर झटका देण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी केला जाऊ शकतो. यात आण्विक शक्तीचा वापर झालेला नसला तरीही त्याचे परिणाम असतात. रशियाकडे असलेला बॉम्ब थर्मोबेरिक बॉम्ब आहे. 300 मीटर परिसरात या बॉम्बमुळे नुकसान होऊ शकते. 2007 मध्ये रशियाने हा बॉम्ब विकसित केला. त्यावेळी हा बॉम्ब अमेरिकेकडे असलेल्या बॉम्बपेक्षा चौपट शक्तिशाली होता.
आमच्या मातृभूमीचे रक्षण करू : युक्रेनची गर्जना
रशियन सैन्य युक्रेनच्या दिशेने चाल करून येत असताना, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. आम्ही आमच्या मातृभूमीचे रक्षण करू आणि हे युद्ध जिंकू, असे युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमिट्रो कुलेबा म्हणाले.
युक्रेन सैनिकांना शरण येण्याचे रशियाचे आवाहन
युक्रेनच्या कीव आणि खारकीव या दोन शहरांवर रशियाने मिसाइल स्ट्राइक केला आहे. गुरुवारी केलेल्या संबोधनात व्लादिमिर पुतिन यांनी सैन्याला आक्रमणाचे आदेश दिले आहेत. रशिया आणि युक्रेनच्या फौजांमध्ये संघर्ष अटळ असल्याचं पुतिन यांनी म्हटले आहे. त्यांनी युक्रेनच्या सैन्याला शस्त्र खाली ठेवण्याचे आव्हान केले आहे. युक्रेनची लष्करीशक्ती संपवणे हा लष्करी कारवाईमागे उद्देश असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.
Post Views: 344