गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न


श्रीखंडाचे डबे घेऊन विरोधक आक्रमक
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  22 Dec 2022, 12:21 PM
   

नागपूर  -  घेतले खोके, भूखंड ओके... दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे... राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव... धिक्कार असो, धिक्कार असो, मिंधे सरकारचा धिक्कार असो... बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे... राजीनामा द्या, राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या... महापुरुषांचा अपमान करणार्‍या भाजप सरकारचा धिक्कार असो... भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या सरकारचा धिक्कार असो... अशा घोषणांनी नागपूर विधानभवन परिसर आज सकाळी दणाणून गेला. विरोधकांनी सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरलं असून सर्वपक्षीय विरोधक एकत्र येत राज्य सरकारविरुद्ध आक्रमक झाल्याचं दिसून आलं. 

भूखंडाचा श्रीखंड खाल्ला कुणी, मुख्यमंत्री मुख्यमंत्री... गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न अशा जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर आजही दणाणून सोडला. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी, काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षातील सर्वच दिग्गज आमदार आणि नेते हजर असल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीच्या आमदारांनी भूखंडाचा श्रीखंड वाटून मिंधे सरकारचा निषेध केला. दिल्लीचे मिंधे एकनाथ शिंदे.. ५० खोके भूखंड ओके.. अशी घोषणाबाजी करत हातात श्रीखंडाचे डबे घेऊन विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. 

विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू असून आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला सकाळीच विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. सोलापुरातील भूखंड घोटाळा, राज्यातील उद्योग, महापुरुषांचा अवमान, राज्यपाल हटाव, मिंधे सरकार, कर्नाटक-बेळगाव सीमावाद या मुद्द्यांवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. 

    Post Views:  164


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व