अकोला - महाराष्ट्रातील सर्वात मोठया विश्वास करंडक बाल नाटय महोत्सवाचा शुभारंभ १३ डिसेंबर २०२२ पासून अकोला नगरीत होत आहे. १३ ते १५ डिसेंबर अशी ३ दिवस चालणारा हा महोत्सव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होईल अशी माहिती महोत्सव आयोजन समितीचे प्रमुख प्रा. मधु जाधव यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे निमंत्रक प्रशांत गावंडे व प्रसिध्दी प्रमुख प्रदीप खाडे या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. स्थानिक जे. आर. डी. टाटा स्कुल अॅन्ड एडयुलॅब तर्फे २०१७ पासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. २०१७ साली झालेल्या स्पर्धेचा प्रथम पुरस्कार जवाहर नवोदय विद्यालय यांनी, २०१८ च्या स्पर्धेचा प्रथम पुरस्कार आर. डी. जी. पब्लीक स्कुल अकोला यांनी तर २०१९ चा प्रथम पुरस्कार समर्थ पब्लीक स्कुल अकोला यांनी पटकाविला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२० व २०२१ ची स्पर्धा घेण्यात आली नाही. ती आता २०२२ साली होत आहे. १३ डिसेंबर २०२२ पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत अकोला जिल्हयातील विविध ३१ शाळा सहभागी झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील बाल नाटय क्षेत्रातील ही एक प्रतिष्ठीत व सर्वात मोठी स्पर्धा म्हणून गणल्या जाते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी एक नविन व्यासपीठ मिळाले असून शिक्षक सुध्दा लिहीते झाले आहेत. या स्पर्धेत अतीशय दर्जेदार नाटकांचे सादरीकरण होत असून मुकबधीर व दिव्यांग मुलांचा सुध्दा या स्पर्धेत सहभाग असतो. शिवाय या स्पर्धेमुळे मुलांचे भावविश्व समृध्द होण्यासाठी सुध्दा चांगली मदत होत आहे. या महोत्सवाचे वैशिष्टय म्हणजे मागील वर्षाच्या स्पर्धेत उत्कृष्ठ अभिनयाचा प्रथम पुरस्कार मिळालेल्या विद्यार्थ्याच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येत असते. या वर्षीच्या उद्घाटनाचा सन्मान समर्थ पब्लीक अकोलाच्या विद्यार्थ्यास मिळतो आहे. सदर स्पर्धेकरीता एकुण ६० हजार रूपयांचे पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. या वर्षी पासून समिक्षणासाठी एक विशेष पुरस्कार ठेवण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. महोत्सवाची आयोजक असलेली जे. आर. डी. टाटा स्कुल स्पर्धेत भाग घेईल परंतु ती कोणत्याही बक्षीसाकरीता पात्र असणार नाही असे महोत्सवाचे निमंत्रक प्रशांत गावंडे यांनी या प्रसंगी आवर्जुन सांगितले. नाटयरसीक व विद्यार्थ्यांनी या महोत्सवाकरीता उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Post Views: 170
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay