प्रभातच्या तीन विज्ञान प्रकल्पांची विभाग स्तरावर निवड


राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद: जिल्हास्तरीय स्पर्धेत पर्यावरणपूरक विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  25 Nov 2022, 3:29 PM
   

 अकोला: राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेची जिल्हास्तरीय स्पर्धा नुकतीच ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. या स्पर्धेत प्रभात किड्स स्कूलच्या तीन विज्ञान प्रकल्पांची विभागीय स्तरासाठी निवड झाली असून प्रभातचे बाल वैज्ञानिक प्राथमिक व माध्यमिक गटांतून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.  
        विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिचा विकास व्हावा तसेच त्यांना विज्ञानाच्या पद्धती वापरुन स्थानिक पातळीवर समस्यांचे निराकरण करण्यास प्रोत्साहीत करावे या हेतुने भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन केले जाते. या अंतर्गत प्रथम जिल्हास्तरावर स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांच्या विज्ञान चमूंनी सहभाग घेतला.  या स्पर्धेसाठी मुख्य विषयवस्तू आरोग्य आणि मानवी कल्याणामध्ये पर्यावरण परिसंस्थेचे महत्त्व  हा होता.        
     ऑनलाईन पद्धतीने संपन्न झालेल्या स्पर्धेत प्रभातच्या तीन गटांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये इयत्ता सातवीतील आर्या राठी व मधुरा वाघ यांच्या चारकोलचा घरातील वायू अभिसरणासाठी वापर या पर्यावरण पूरक प्रकल्पाची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच इयत्ता नववीतील भक्ती शर्मा आणि आशी गोयंका यांनी सादर केलेला  कांद्याचे साठवणूक काळ वाढवण्यासाठी डेसिकंट्सचा वापर प्रकल्प; इयत्ता नववीतील स्वयम अवचार व यश राठोड यांनी परिसरातून गोळा केलेला कचरा आणि रद्दी कागदापासून बहुउद्देशीय कार्ड बोर्ड तयार करण्याच्या प्रकल्पाची देखील निवड विभागस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.      
       या स्पर्धेसाठी विज्ञान विभाग प्रमुख  वैशाली जोशी यांच्या संयोजनात एन.सी.एस.सी. जिल्हा समन्वयक स्नेहल पाटील आणि मार्गदर्शक शिक्षक अर्चना राठी व अमित जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.  प्रभातच्या प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी, समन्वयक मो. असिफ यांच्यासह शिक्षकांनी विभागस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


    Post Views:  188


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व