पालघर जिल्ह्यातील चार पंचायत समितीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस तर एका पंचायत समितीवर भाजपा व शिंदे गट
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
12 Nov 2022, 10:43 AM
पालघर : (संतोष घरत ) - पालघर जिल्ह्यातील पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापतींच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्राबल्य राखले आहे. जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांपैकी चार पंचायत समित्या या दोन्ही पक्षाने ताब्यात घेतल्या आहेत. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने प्रत्येकी एक पंचायत समिती मिळविली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, विक्रमगड, वाडा या चार पंचायत समित्यांवर विजय मिळविला आहे आहे. भारतीय जनता पक्षाने जव्हार पंचायत समितीवर एकहाती सत्ता राखली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तलासरी पंचायत समितीवर वर्चस्व राखले आहे. वसई पंचायत समितीवर बहुजन विकास आघाडीने ताबा मिळविला आहे.
महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष-शिंदे गटाच्या युतीला डहाणू पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीत दोन्ही बाजूला समान मते मिळाली होती. अखेर ईश्वरी चिठ्ठी टाकून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात शिवसेना-राष्ट्रवादीने बाजी मारली आहे, त्यामुळे डहाणू पंचायत समितीची जबाबदारी असलेले डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे गटाने मोखाडा पंचायत समितीच्या ताब्यात गेली आहे.
वाडा पंचायत समितीच्या सभापतीपदी अस्मिता लहांगे
वाडा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची शुक्रवारी बिनविरोध निवड पार पडली. सभापतीपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अस्मिता लहांगे यांची; तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला.पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत शिवसेनेकडून सभापतिपदासाठी अस्मिता लहांगे यांनी; तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वाडा पंचायत समितीत शिवसेना पाच, राष्ट्रवादी काँग्रेस चार, भाजप दोन व अपक्ष एक असे एकूण बारा संख्याबळ असून महाविकास आघाडीची सत्ता आहे. सत्ता स्थापन होताना ठरलेल्या वाटाघाटीनुसार तत्कालीन सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानुसार आज झालेल्या निवडणुकीसाठी विशेष सभेचे अध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी भवानजी आगे पाटील यांनी काम पाहिले होते.
Post Views: 198