अकोला : अकोला शहरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र खदान पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत 11 घरफोडींचा छडा लावत तब्बल 14.32 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करीत
मोठे यश मिळविले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गुरुवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना दिली.
उत्तम कामगिरी करणार्या तपास पथकाला 25 हजारांचा रिवार्डही त्यांनी यावेळी जाहीर केला. 24 जून 2025 रोजी यज्ञेश माहेन जोशी (32) रा. केशवनगर, अकोला) यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ते काही दिवस बाहेरगावी गेले होते, परत आल्यावर त्यांनी घरात सर्व साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले. एकूण 47 हजार 200 रुपयांची चोरी झाल्याचे त्यांनी नमूद केले. यावरून गुन्हा क्र. 434/2025 कलम 311(4), 305 बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान खुफिया माहितीच्या आधारे खदान पोलिसांनी शेख अहमद शेख ऊर्फ आरीफ (46) रा. भगतवाडी गल्ली नं. 3, डाबकी रोड) आणि तेजस कैलास खोब्रागडे (32) रा. जुना तारफाईल, लेबर कॉलनी या दोघांना ताब्यात घेतले. कठोर चौकशीनंतर दोघांनी खदान पोलीस ठाणे हद्दीत तब्बल 11 घरफोड्यांची कबुली दिली. त्यामध्ये पोलिसांनी सोने 113 ग्रॅम (मूल्य: 10 लक्ष17 हजार) चांदी 2.910 किलो (मूल्य: 2 लक्ष61 हजार)गुन्ह्यात वापरलेले दोन मोटारसायकल्स (मूल्य: 1 लक्ष50 हजार) इतर साहित्य (मूल्य: 500)एकूण जप्त मुद्देमाल: 14 लक्ष 32 हजार500 जप्त करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक केली असून, कोणत्या अधिक गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. शहरातील इतर घरफोड्यांचे धागेदोरे या टोळीपर्यंत पोहोचत असल्याची शक्यता आहे. या कारवाईनंतर खदान परिसरातील नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वास वाढला असून,
शहर पोलिसांकडून सतत गस्त आणि उपाययोजना वाढविण्याची मागणी नागरिक करीत आहेत. अकोला पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारीवर
नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे. पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात पोलीस निरीक्षक मनोज केदारे आणि त्यांचे सहकारी पो.हे.काँ. अमित दुबे, नीलेश खंडारे, अभिमन्यु सदांशिव, वैभव कस्तुरे यांचा मोलाचा सहभाग होता. सराफांकडून केला मुद्देमाल जप्त खदान पोलिसांनी दोन सराईत घरफोड्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 11 गुन्ह्यांची कबुली मिळाली असून, त्यामध्ये मोठा मुद्देमाल त्यांनी लंपास केला होता. शहरातील तीन सराफांकडे या मुद्देमालाची विल्हेवाट या चोरट्यांनी लावली होती. पोलिसांनी तीन सराफाकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यापैकी दोन सराफा व्यवसायिकांना साक्षीदार बनविण्यात आले आहे. सर्वसाधारण व्यक्तीकडून सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करताना नाना प्रकारच्या चौकशी करणार्या सराफा व्यवसायिकांनी या चोरट्यांकडून एवढा मोठा मुद्देमाल कसा खरेदी केला, हा प्रश्न येथे अनुत्तरीत आहे.
Post Views: 68