शिंदे-भाजप सरकारचे खाते वाटप जाहीर
फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ खाते
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
14 Aug 2022, 10:07 PM
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्याचे खाते वाटपाकडे लक्ष लागले होते. अखेर आज, (14 ऑगस्ट) खाते वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर आज स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
सर्वाधिक खाती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असली तरी संपूर्ण खाते वाटपाच्या यादीवर देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचा वरचष्मा असल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडीच्या काळात राष्ट्रवादीकडे असलेली महत्त्वाची खाती एकट्या देवेंद्र फडणवीसांकडे आली आहेत. त्यात गृह, अर्थ, जलसंपदा या खात्यांचा समावेश आहे. इतकेच नाही तर काँग्रेसकडे असलेले ऊर्जामंत्रीपदही फडणवीसांकडे गेले आहे. फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले गिरीश महाजन, काँग्रेसमधून भाजपात आलेले राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण यांना महत्त्वाची खाती मिळालेली आहेत. तर चंद्रकांत दादा पाटील आणि सुधार मुनगंटीवार या ज्येष्ठ मंत्र्यांना तुलनेने कमी महत्त्वाची खाती मिळाली आहेत. तर शिंदे गटातही अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांच्या पारड्यात चांगली खाती गेली आहेत.
दरम्यान, शिंदे मंत्रिमंडळात 9 ऑगस्ट रोजी भाजपच्या कोट्यातील 9 आणि शिंदे गटातील 9 अशा एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. महाराष्ट्र मंत्रिपरिषदेची सदस्य संख्या 20 आहे. शिंदे मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला मंत्री करण्यात आलेले नाही. ज्याप्रकारे शिंदे सरकारचे खाते वाटप झाले आहे. त्यावरून या युती सरकारमध्ये भाजपच मोठा भाऊ ठरल्याचे दिसत आहे.
शिंदे गटाच्या तोंडाला पाने पुसली : राष्ट्रवादी
शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला पाने पुसली, असे म्हणत राष्ट्रवादीने शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी याबाबत टीका केली आहे. गृह, अर्थ, महसूल, वने, ग्रामविकास, सहकार, जलसंपदा व सर्व महत्त्वाची खाती भाजपाने आपल्याकडेच ठेवून शिंदे गटाला दुय्यम स्थान दिले आहे. शिंदे गटातील मंत्र्यांना मविआ सरकारमधे असलेला सन्मान आता कमी झाला, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.
18 मंत्र्यांना मिळालेली खाती
सुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय.
चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य
डॉ. विजयकुमार गावित : आदिवासी विकास
गिरीश महाजन : ग्रामविकास, पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण.
गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता
दादा भुसे : बंदरे व खनिकर्म
संजय राठोड : अन्न व औषध प्रशासन
सुरेश खाडे : कामगार
संदीपान भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत : उद्योग
तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र चव्हाण : सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
अब्दुल सत्तार : कृषी
दीपक केसरकर : शालेय शिक्षण व मराठी भाषा
अतुल सावे : सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज देसाई : राज्य उत्पादन शुल्क
मंगलप्रभात लोढा : पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास.
Post Views: 305