सत्तारुढ झालेले सरकार बेकायदेशीर
राज्यपालांसह शिंदे, फडणवीसांवर खा. संजय राऊत यांचे ताशेरे
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
14 Jul 2022, 7:46 PM
नागपूर : महाराष्ट्रातील नवीन सरकार मागील सरकारचे निर्णय बदलत आहे. हा फक्त विरोधासाठी विरोध केला जात आहे, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये केला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावरही निशाणा साधला.
राज्यातील हे सरकार बेकायदेशीर आहे. 16 आमदारांवर अपात्रतेची तलवार असताना त्यांच्याबद्दल निर्णय झालेला नसताना, मुख्यमंत्री यांनी शपथ घेतली आहे. त्यांच्याबद्दल अपात्रतेचा निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे राज्यपालाने त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे 19 तारखेला मंत्र्यांना शपथ देणे हे ही बेकादेशीर राहील, असे टीकास्त्र संजय राऊतांनी सोडले.
फक्त दोघांचे कॅबिनेट काम करत आहे. महाराष्ट्रात अद्याप सरकार अस्तित्वात आलेले नाही. फक्त दोघेच कॅबिनेटमध्ये आहेत. अजून सरकार का अस्तित्वात आले नाही? मंत्रिमंडळाचा शपथविधी का होत नाही? हा प्रश्न आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय. ते आज नागपूर दौर्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी टीकास्त्र सोडले. आता बंड विसरून जा. मी आता उपमुख्यमंत्र्याच्या शहरात आलो आहे. कालपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या शहरात येत होतो. मी पक्ष आणि संघटनेच्या कामासाठी आलो आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी सर्व जागच्या जागी आहे. महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती म्हणजे भास आहे. हे सर्व तात्पुरते आहे. शिवसेना अशा परिस्थितीतून अनेक वेळेला बाहेर पडली आहे. गेले 56 वर्ष अनेक संकटं, अनेक वादळं आम्ही पाहिली आहेत. शिवसेना विदर्भात काम करत आहे, हळूहळू चित्र स्पष्ट होईल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला नागपुरात शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी पाठवले आहे. सर्व कार्यकर्ते जागच्या जागी आहेत, त्यामुळे चिंता नसावी. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. ही चांगली गोष्ट आहे. लोकांना दिलासा मिळत असेल तर ते स्वागत आहे, असे राऊत म्हणाले.
राज्यपाल कुठे आहेत?
सुप्रीम कोर्टात अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. अपात्र असताना मंत्रीपदाची शपथ देणे हे घटनाबाह्य आहे, हे शिवसेनेने राज्यपालांना कळवले आहे. राज्यपाल कालपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत होते. आता राज्यपाल कुठे आहेत? असा टोला संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लगावला आहे. सुप्रीम कोर्टाचे घटनापीठ या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. ज्या सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यांना मंत्रीपद देऊ नये. असे झाले तर ते नियमबाह्य आहे. राज्यपाल 12 दिवस गप्प का? राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी राज्यपालांनी राजभवनातून बाहेर पडले पाहिजे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
मुर्मूंना पाठिंबा देण्यामागे राजकारण नाही
द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यामागे कुठलाही राजकीय हेतू अथवा नफा तोट्याचे गणित नाही. अत्यंत मागास भागातून आदिवासी समाजातून येणार्या महिलेला नेतृत्व मिळत असेल तर त्याचे समर्थन करण्यासाठी शिवसेनेने हा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, नेते आदिवासी भागात काम करतात. त्यांच्या भावना समजून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यामागे राजकारण नाही. आम्ही एनडीएचा भाग नाही असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.
Post Views: 233