मतलबासाठी गुरूस्थानालाही धोके देणारे वर्तमानातील दगलबाज ....!


 संजय एम.देशमुख  2022-07-13
   


           काल गुरूपोर्णिमेचा कृतज्ञता आणि वंदन उत्सव देशाच्या कानाकोपऱ्यात पार पडला.मनुष्य जन्माला आल्यावर त्याला हे जग दाखविणारे आई-वडील त्यांचे प्रथम गुरू असतात.भारतीय संस्कृतीमध्ये गुरू शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे.विद्या,ज्ञानदान करणाऱ्या गुरूमुळेच आम्ही जीवनात घडतो,विकसीत होतो,ज्ञानवंत,प्रज्ञावंत होऊन पारिवारीक, सामाजिक, राजकीय आणि देशाच्या विकास प्रक्रियेतील विविध क्षेत्रात अग्रेसर ठरून नावलौकिक प्राप्त करतो.जिथे आपणास दुनियेच्या पटलावर संपूर्ण क्षमतेने उभं राहण्यासाठी ज्ञानाचे बळ मिळाले.आयुष्यात समाजातून आम्हाला ज्यांचेकडून काहीना काही नविन मिळत गेलं. विचार, विद्या, ज्ञान, संस्कार,जाणीवा जागृत करणारे अनुभव मिळाले. त्या सर्वांसमोर हृदयातील कृतज्ञतेच्या विधायक मंगलमय भावनांनी आम्ही नतमस्तक होतो.त्याबदलात दक्षिणा म्हणून उपहार,वस्त्रालंकार हे प्रतिकात्मक असते.परंतू जे मिळालं त्याची जाणीव ठेऊन त्याचा उपयोग समाजातील माणसांच्या कल्याणासाठी करणे ही मानवताच सर्वात मोठी गुरूदक्षिणा आणि मानवी जीवनातील पुरूषार्थही ठरतो....!
                              ‌‌ धर्मशास्त्र,ग्रंथ,आणि संस्कृतीकडून मिळालेल्या उदात्त मानवी भावनांची गुरुशिष्य परंपरेतील या आदर्शांची सामान्य समाजाला चांगल्याप्रकारे जाणीव आहे. परंतू दुर्दैवाने विविध क्षेत्रातील अग्रेसर लोकांना,माणूस म्हणविल्या जाणाऱ्या राजकीय,सामाजिक नेत्यांनाच यांचा विसर पडत आहे.त्यामुळे मनुष्याच्या नैतिक अधोगतीला प्रारंभ झाला असून प्रामाणिकतेने सामाजिक बांधिलकीच्या भावना लोप पावल्या आहेत.याचा कोरोनाप्रमाणेच सर्वात मोठा प्रचंड प्रादुर्भाव सामाजिक आणि जास्तीत जास्त राजकीय क्षेत्रातच झालेला आहे. समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या सामाजिक,राजकीय आणि सर्वच क्षेत्रामध्ये धर्माची मार्गदर्शक तत्वे लागू होतात.तो धर्म उन्मादी,सुडबुध्दीने इतर धर्मांचा व्देष करणारा नसावा‌.तो सहिष्णुता,समतावादी आणि शांतता व विकास 
साधणारा आदर्श हिंदु धर्म अभिप्रेत असावा.त्यामध्येच गुरूपोर्णिमेचे गुरूतत्वही दडलेले आहे.

             मातोश्री.... हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उध्दव ठाकरेंशी एकनिष्ठ असणाऱ्या एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी स्वार्थांध होऊन अनैतिक बंडखोरीचा भूकंप घडविला. राजकारणात आदर्श आणि तत्व चालत नाहीत असे खोटे लाचार लोक बोलत असतात.अर्जूनालाही शत्रूच्या रथाचं चाक फसल्यावर संधी मिळताच कर वार म्हणून सांगणारे भगवान श्रीकृष्ण होते.असे तत्व,नीतिमत्ता ,कृतज्ञतेची वाट विसरून, आणि उदात्त भावनांना गुंडाळून ठेऊन एकनाथ शिंदेंच्या कृतीचं निखालस खोटं व धादांत मतलबी समर्थन करणारेही अनेक जण आहेत.

             गांजाकुट्टे आणि मद्यप्राशकांशी भगवान शंकराचा संबंध जोडणारे लोकही समाजात कार्यरत आहेत.त्याचप्रमाणे अनेक बायका करण्यासाठी निर्लज्जपणे भगवान श्रीकृष्णाचे दाखले देणारे दुर्भावनांनी किती ओतप्रोत भरलेले दुर्व्यवहारीआहेत याचा अंदाज यायला वेळ लागत नाही.आपले जबरदस्तीचे शॉर्टकटस् , उणीवांचा दुरूपयोग आणि लोकशाही आणि संविधानाशी गद्दारी आणि समाजाची फसवणूक करणाऱ्या अशा पांढरपेशा उन्मादी पापी लोकांना भारतवर्षातील कोणतेही गुरू स्विकारणार नाहीत.उलट हेचि फळं काय मम् तपाला म्हणून अपराधी भावनांनी दु:खी होतील.

          ठाकरे घराण्यातील कोणतीही व्यक्ती आतापर्यंत सत्तेत नव्हती.स्वत: उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा स्वार्थ ठेवला नव्हता.त्यांना आग्रहाने स्वाभिमानासह विराजमान करण्यात आले होते.परंतू तरीही त्यांना अडिच वर्षात खाली खेचण्यात आले.ते एवढ्याचसाठी की त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही ही एकनाथ शिंदेंच्या मनातील व्देष आणि जळफळाटाची त्याचवेळी प्रथम पडलेली ठीणगी होती.त्या वणव्यात तेल टाकून भडकविणारे फडणवीस,चंपा आणि भाजपचे इतर लोचट, कळीचे नारद सक्रीय झालेले होते.म्हणूनच घरभेदी शिंदेंच्या भरवशावर सरकार पाडण्याच्या तारखा दिल्या जात होत्या.शेवटी सर्व गुंडाळून ठेऊन अनाचाराने "मी पून्हा येईल" हे सिध्द करून दाखविले ते सुध्दा लोकांना धर्म सांगणारांनीच.याला कर्तृत्व आणि पुरुषार्थ म्हणतात येईल का?

           सत्तांतरासाठी दिलेली कारणांची यादी बेगडी आणि खोटी आहे.त्यामागे ईडीची भिती,त्यासाठी भाजपची गुलामगीरी स्विकारण्याची अगतिकता हे प्रबळ कारण आहे.त्यासाठी सत्तेच्या लोण्यासोबतच खाली पडून ताकही वरपण्यासाठी नेलेले भांडे लपवण्याचा मनाशीच शुध्द बेइमानी करणारा हा बंडखोरांच्या हा प्रयत्न आहे.त्यात पूर्वी बंडखोरांवर आक्रमक बोलणारे, त्यावर प्रहार करणारे बच्चू कडूही सहभागी आहेत याचे आश्चर्य वाटले.फक्त सत्तेच्या मागे पळणारे शिवसैनिक होऊ शकत नाहीत.धर्मासाठी बलिदान देणारे धर्मवीरही कधीही ठरू शकतं नाहीत.ते संधी येताच "घाल घाव कर तुकडे" म्हणणारे क्रूर संधीसाधू असतात.मानवी जीवनमुल्य आणि वैचारिक स्वातंत्र्य हरविलेल्या लाचार लोकांनी धर्माभिमानाच्या गोष्टी करणे म्हणजे मतदारांची शुध्द फसवणूक आहे.पात्रता,दर्जा नसणाऱ्या लोकांनी समाजासमोर ठेवलेले असे मुद्दे हास्यास्पद ठरतात,त्याला किंमत दिली जात नाही.

            ठाकरे घराणे आणि शिवसेनेने खरोखरच सामान्य लोकांना मोठं केलं.एकनाथ शिंदेंना देण्यात तर काहीच कसर सोडली नाही.तरीही शिंदेंची ही बंडखोरी म्हणजे मातोश्री या गुरूगृहाशी आणि तेथील राजकीय, सामाजिक गुरूंच्या अधिष्ठाणाशीच केलेला मोठा द्रोह ठरलेला आहे.हे कौरवी कृत्त्य ऐतिहासिक ठरणार आहे. त्यामुळे जनतेकडून उच्चारला जाणारा गद्दार हा शब्दही त्यांना सतत बोचत राहणार आहे.कारण आयुष्यात जिथं अशी चुक व्हायला नको तशी अक्षम्य गडबड त्यांनी केलेली आहे.त्यामुळे भविष्यात कधीतरी त्यांना ही कबूली द्यावी लागणार आहे. 

          आपले राज्यपालांसारखे सेवक कामाला लावून संविधानिक मोडतोड करून लोकशाहीची प्रतारणा करीत जोरजबरदस्तीने स्थापन केलेल्या सरकारचं बारसं तर आता झालेलं आहे. परंतू आता पुढील मंत्रीमंडळाचं काय?कारण न्यायप्रविष्ट प्रकरण असतांनाच विश्वासदर्शक ठराव आणि अध्यक्ष निवडही उरकण्यात आली.त्यांत कोशारीजींची हूशारी कामात आलीच.आता सर्वोच्च न्यायालयाने मात्र घटनापीठ स्थापन करून यातील अपात्रता आणि सर्व प्रकरणांचा निकाल देण्याचे ठरविले आहे.त्यामुळे आता तरी राज्यपालांनी मंत्रीमंडळाच्या शपथ देण्याच्या कार्यवाहीची घाई करू नये अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे.ते १२ जुलैचे पत्र परंतू त्या व्हायरल झालेल्या पत्रावर राज्यपालांच्या सचिवांना प्राप्त झाल्याची शिक्क्यातील तारीख मात्र २२ जुलै २०२२ आहे. ही बाब संभ्रमित करणारी आहे.

           गुरूतत्व लक्षात घेतांना ज्यांच्यामुळे आपण संपूर्ण क्षमतेने तयार झालो, त्यांच्याशी फितूरी करण्याच्या दुर्भावना मनात आल्यात तर माणसाने आपल्या अंर्तमनाचा कौल घेतला पाहिजे.कारण ज्यावेळी काही मार्ग नसतो त्यावेळी अंर्तमन सुध्दा एक प्रबळ गुरूशक्ती ठरत असते.गुरूतत्वामध्ये विभूतीपूजा हे निमित्त आहे.ते गुरूतत्व चराचरात वसलेलं आहे. त्याचं मार्गदर्शन कुठून कसं मिळावावं याचं कसब प्रत्येक माणूस आपल्या तयारीने साध्य करू शकतो.त्यातून स्वतःचं जीवन समृध्द करीत इतरांनाही उन्नत करू शकतो.परंतू इथे सामाजिक राजकीय क्षेत्रात तत्व,जीवनमुल्ये गुंडाळून ठेवत स्वार्थाच्या अघोरी महत्वाकांक्षेने माणसातली माणसंच हरविलेली आहेत.संस्कृती,परंपरांचा त्यांना विसर पडलेला आहे.त्यामुळे संधी मिळेल तिथे घाव करणाऱ्या विध्वंसक माणसाने अराजकता निर्माण करून समाजाला संकटात आणलेले आहे. म्हणूनच वेळप्रसंगी समाजातील माणसं तर सोडाच मतलबासाठी गुरूंशी आणि अधिष्ठाणाशीही दगलबाजी करणारे वर्तमानात सक्रिय आहेत...! काळ बदललेला आहे.समाजाचं जीवन संकटात येण्याअगोदर जनताच रस्त्यावर उतरली पाहिजे.लूटणारांना धडे शिकविले पाहिजेत.....!!

    Post Views:  428


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व