अलिकडेच माझ्या वाचनात आलेलं पुस्तक मुसाफिर म्हणजे लेखक अच्युत गोडबोले यांची आत्मकथा आहे. मुसाफिर वाचताना पदोपदी लेखकाची चिकाटी आणि ज्ञानार्जनासाठी असलेली तहान प्रत्ययास येते. एखादी गोष्ट माहीत नसल्यास किंवा न समजल्यास रात्र रात्र जागून, कुणाचाही विद्यार्थी बनून जराही न लाजता ती विचारणं व नंतर दुसऱ्यांना ती सोप्पी करून समजावण्याचा लेखकास ध्यास होता.
लेखक अच्युत गोडबोले यांचा जन्म अमळनेर येथे झाला व जडणघडण सोलापूर येथे झाली त्यामुळे सोलापूरकरांच्याप्रती एक वेगळीच आत्मीयता वाचताना जाणवते. यशाचं हिमालय सर केलेल्या गोडबोले यांनी आपल्या जीवनात अपयशाची अनेक कठीण शिखरंसुद्धा सर केली आहेत. कामानिमित्त विदेशात पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणारे गोडबोले एकेकाळी बेरोजगारी आल्यावर मुंबईच्या भल्यामोठ्या झोपडपट्टीतसुद्धा राहिले. त्यामुळेच धारावीसारख्या झोपडपट्टीतील लोकांचं विदारक जीवन, तसंच कामाठीपुरासारख्या वेश्याव्यवसायाकरीता कुप्रसिद्ध असलेल्या लोकांच्या कथा वाचताना वाचकांना जीवनाचं सार सांगून जातात.
नोकरीसाठी धडपडत असताना अनेक गोष्टी शिकण्याची ऊर्मी लेखकास विविधांगी विषयांवर लेखन करण्यास प्रवृत्त करत होती. यातूनच मग अर्थशास्त्रावरील अर्थात, मानसशास्त्रावरील मनात, संगीतावरील नादवेध, संगणकावरील संगणकयुग, विज्ञान संशोधनावरील किमयागार, व्यवस्थापनावरील बोर्डरूम, नॅनोटेक्नॉलॉजीवरील नॅनोदय, गुलामगिरीवरील गुलाम, चंगळवादावरील चंगळवाद आणि आयटी क्षेत्रातील ब-याच संकल्पना स्पष्ट करणा-या अभ्यासासाठी उपयुक्त ठरणा-या पुस्तकांचं यशस्वी लेखन त्यांनी केलं. छोट्या छोट्या आयटी कंपन्यांमध्ये काम करत, त्यातून बरंच काही शिकत पटणीसारख्या उच्च कंपनीत काम करण्याची संधी मिळणं म्हणजे त्यांच्या आयुष्यात आलेली कलाटणी होय. यापुढे त्यांचा मार्ग म्हणजे एल अँड टी, इन्फोटेक अश्या मोठमोठ्या आयटी कंपन्यांच्या उच्च पदांचा कार्यभार त्यांनी स्वीकारला. अशा सुंदर भविष्याचा वेध घेत असताना त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा खुप काही शिकवून जातात.
सरतेशेवटी लेखकाच्या मुलाला झालेला ऑटिसम हा आजार आणि त्यासाठी त्यांनी पत्नीसह खाल्लेल्या खस्ता एका नवीन वळणाचा प्रारंभ करतो. यातून सुद्धा वाट काढत पुढे जात इतर पालकांच्या सहाय्यानं या विशेष मुलांसाठी एक संस्था अस्तित्वात येऊन लेखकानं त्याचा कार्यभाग वाहिला. केवळ नारेबाजी किंवा सल्ला मसलत न करता प्रत्यक्षात कार्यरत राहून लोकजीवनाच्या उन्नतीत सहभागी होणं याचं गमक म्हणजे अच्युत गोडबोले यांच्या जीवनाची कहाणी. आयुष्याचा अर्थ कळतो मागं वळून पाहताना आणि ते जगावं मात्र लागतं पुढे जाताना! या गोष्टीची जाणीव नेहमी उराशी बाळगत, जीवनाचा मार्ग नुसताच सोयीस्कर नव्हे तर सुखकारक बनवणा-या एका भन्नाट सफरीची आणि विलक्षण मुसाफिरीची ही आत्मकथा.
या आत्मकथेचा पृष्ठभाग म्हणजे लेखकाचं अतिशय निरामय स्मितहास्य असलेलं छायाचित्रं. या विलोभनीय हास्यामागं अतिशय बिकट परिस्थितीतून वाट काढत एका अद्वितीय शिखरावर पोहचल्याचा हर्ष जाणवतो. सतत हेलकावणी देणारं जीवनही अद्भुतरीत्या जगत त्यातील चढ उतार तितक्याच आनंदानं स्वीकारत त्याचं पारिपत्य करून मिळवलेलं सुख म्हणजे पुस्तकाच्या पृष्ठभागावरील गोडबोले सरांचं स्मितहास्य. अशा त्यांच्या अनोख्या अनुभूतींनी व्यापलेल्या अन् एका सुंदर मुक्कामास आणून सोडणा-या मुसाफिराची ही अनोखी सफर.
स्मिता दळवी
खारघर, नवी मुंबई
९८३३८६४८८४
Post Views: 281