ठाकरे सरकारचा पराजय नव्हे ही लोकशाहीची शोकांतिका! : संजय एम. देशमुख


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  30 Jun 2022, 2:40 PM
   

बळी तो कानपिळी या विघातक मार्गाचा अवलंब व मतदारांचा अनादर आणि लोकशाहीला ग्रहण लाऊन शेवटी एका संवेदनशील संयमशील मुख्यमंत्र्यांच्या आणि आघाडी सरकारच्या लोककल्याणकारी प्रवासाला झुंडशाही ने मध्येच थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या अनीतिमध्ये कौरवांचा विजय झाला.अशा घटना कधी कधी घडत असतात,स्वार्थाप्रेरित अति महत्वाकांक्षी विकृत विचारसरणीच्या व्यक्ती जंग जंग पछाडून त्या घडवुनही आणत असतात. त्या पूर्वी कधी कधी घडत होत्या परंतू वर्तमानात हा अनिष्ठ प्रवाह नियमित झाल्याने देशातील लोकशाहीच संपुष्टात येते की काय अशी चिंता निर्माण झाली आहे.पण काही का असेना मावळते मुख्यमंत्री उध्दवजींना आणि नव्याने स्थापन होणार्‍या भाजपच्या सरकारला, तथा मुख्यमंत्रीपदावर आरूढ होण्याचे स्वप्न पूर्ण करणार्‍या  देवेन्द्रजी फडणविस यांना हार्दिक शुभेच्छा...!
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर  विराजमान होण्याची इच्छा नसतांनाही शिवसेनाप्रमुख उध्दवजी ठाकरे यांना सहकारी नेत्यांच्या आग्रहास्तव ती जबाबदारी स्विकारावी लागली.ती त्यांनी कशाप्रकारे आणि किती जबाबदारीने पार पाडली यांचे मुल्यमापन नैसर्गिक आपत्ती, कोरोना नियंत्रण, आणि शासकीय,प्रशासकीय वाटचालीतून झालेले आहे. फक्त व्देषासाठी व्देष करण्याची सवय आणि  प्रदुषित विचारसरणीतून घाणेरड्या राजकारणाच्या कर्करोगाची बाधा ज्यांना झालेली आहे त्यांनी मात्र मनाचा मोठेपणा ठेवलेला नाही. त्यांच्या समाजशील कार्याची सुसंस्कृत परिपक्व विचार आणि भावनाप्रधान सामाजिक संवेदनशीलतेची महाराष्ट्रातील जनतेने भरभरून प्रशंसा केलेली आहे. त्यांना प्रेमभावनेने प्रतिसाद देऊन त्यांच्या समाजवत्सल भावनांची योग्य ती दखल घेतलेली आहे.जाता जाता त्यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा व काही महत्वाचे निर्णय घेऊन  स्व. बाळासाहेबांचे  स्वप्न पूर्ण केले आहे.
महाराष्ट्राचे असे एक मुख्यमंत्री जे आपल्याऐवजी दुसर्‍याला मुख्यमंत्री पदावर बसवायला सहज तयार होतात.सत्तेला चिपकून बसण्याची आपली  गोचीडी वंशावळी नाही हे दाखवून देतात.प्रथम मातोश्री सोडून वर्षांमध्ये रहायला लवकर जात नाहीत , आणि वातावरण विरोधी  झाल्याबरोबर वर्षामधून तात्काळ  आपल्या  मुळ निवासस्थानात निघून जातात.नंतर सर्वोच्च न्यालयायाच्या निर्णयाचा आदर ठेऊन नुसता मुख्यमंत्री पदाचाच नव्हे तर विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देऊन मोकळे होतात..याचा अर्थ नेहमी सत्ता येते आणि जाते म्हणणार्‍या उध्दवजींना जीवनातील वास्तव सत्त्याचे आकलन झालेले  आहे. समृध्द विचारांच्या वारशाने सुसंस्कारीत परिपक्व विचारांची अनुकूल दिशा मिळाल्याने विचारांच्या स्थिरतेतून  सहज,सर्वांगसुंदर उदात्त  जीवनाचं एक कसब आत्मसात झालेलं आहे.अशी व्यक्तिमत्व अपवादाने तयार होत असतात. ती सामाजिक राजकीय क्षेत्राची मोठी उपलब्धी असते.म्हणून अल्पावधितच महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात स्थान मिळविणारे ते हिंदूहृदयसम्राटांचे खरे पुत्र ठरले.परंतू स्वार्थ आणि अनैतिक मालमत्तेच्या अनाचाराने भयभित झालेल्या बंडखोरांना या खर्‍या वाघाचे महत्व समजले नाही.म्हणून ते खोट्या हिन्दुत्वाचे व इतर बनवावाबनवीचे आधार घेऊन स्वत:च्या ,कुटूंबाचे जीवन आणि आपली पापाची मालमत्ता सुरक्षित करण्यासाठी  सुपर पॉवर कागदी वाघांच्या मागे लागून महाराष्ट्रद्रोही ठरले. ही गोष्ट नाकारण्यासारखी नाही.
सरकार कोणतेही यावे परंतू ते सामाजिक बांधिलकी जपणारे  विधायक विचारांचे लोककल्याणकारी सरकार असले पाहिजे. ते संविधानिक लोकशाही मार्गानेच सत्तेत आले पाहिजे.ते दबंगगीरी,घोडेबाजार, आणि लोकशाहीची मोडतोड करण्याचे शॉर्टकट वापरून बळजोरीच्या झुंडशाहीने सत्तेत येत असेल तर देशातले चिंतनिय संकट ठरणार आहे.त्याची झळ सर्वसामान्न्यांनाही बसू शकते. सध्याचा घटनाक्रम पाहता ज्या इतर कोणासाठी होऊ शकणार नाहीत इतक्या  झालेल्या जलद हालचाली म्हणजे लोकशाहीवर आक्रमण होत असलेल्या संकटाची चाहूल आहे.तो सत्तांतुर भाजपचा सरकारे पाडणे आणि ती राज्ये ताब्यात घेण्याचा घाणेरड्या राजकारणाच्या महत्वाकांक्षी खेळ होऊन बसलेला आहे.
उपसभापतींनी 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावणे.बंडखोर गटाने रविवारच्या सायंकाळी राज्यातलं उच्चन्यायालय  सोडून सरळ दिल्लीश्वरांमार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे.त्या याचिकेला 12 जूनपर्यंत  प्रलंबित ठेऊन विरोधकांना अनुकूल वातावरण निर्माण होणे.त्यानंतर आजच्या बहूमत सिध्द करण्याच्याविरोधातील कालच्या याचिकेवर मात्र ताबडतोब निर्णय देणे.ही अतिशिघ्रता म्हणजे न्यायव्यवस्थेच्या गतिशील  पारदर्शक न्यायादानाची सुधारलेली स्थिती म्हणावी का? विरोधकांना तात्काळ संधी देऊन आघाडी सरकारच्या कायदेशीर वाटा मात्र  बंद होणे,आणि नंतर  बहूमत चाचणी ढकलता येणार नाही म्हणून निर्णय झाल्याने बंडखोर गटाच्या सत्तांतराची मोहिम अधिक सुलभ झाली. म्हणजे या घटनाक्रमातून  पोहर्‍यासह विहीरीत पडणाराचा दोरच  मध्ये कापण्यासारखी परिस्थिती का वाटू नये? 
ज्या लोकांना आणि ज्या नेत्यांना देशातील   शेतकरी,बेरोजगार,छोटे उद्योजक,व मध्यमवर्गीयांचा  विकास व्हावा,त्यांच्या जीवनात क्रांतीचा सुर्य उगवावा,त्यासाठी  धर्म,जातीपातीच्या भेदभावापलिकडील सर्वधर्म समभावाच्या प्रगतीला सहाय्यभूत ठरणारी शांततामय निरोगी समाजव्यवस्था निर्माण व्हावी असे मनोमन वाटते, त्यांना उध्दव ठाकरे हवे होते. त्यांच्या अपेक्षांची परीपूर्तीची दिशा ठरवून चालणारे मुख्यमंत्री म्हणून ते जनतेच्या मनात विराजमान झाले होते.परंतू अशी वाटचाल विद्रोही भाजपेयींना बरी दिसली नाही. म्हणून त्यांनी अडीच वर्षांपासून शिवसेना फोडण्याची मोहिम हाती घेतली होती.त्याच आधारे सरकार पाडण्याची बिना पंचागांची भाकीते सुरू होती.शेवटी त्याच फोडाफोडीच्या या राजकारणातून व स्वायत्त संस्थांचा गैरवापर  तथा ईडीसारख्यात तपासयंत्रणाच्या  दडपणांचा आधार घेऊन लोकशाहीची मोडतोड  झाली.पाशवी शक्तीप्रदर्शनाने महाराष्ट्राची सत्ता ताब्यात घेण्याचा मूहूर्त निश्चित झाला..
पाकिस्तानाल लष्करशहांचे सत्ता उलथविण्यासाठी  झालेल्या बंडाचे ईतिहास आहेत.त्यांचीच मिनी आवृत्ती या सुसंस्कृत म्हणविल्या जाणार्‍या  महाराष्ट्रातील शिवसेनेच्या  (अ) निष्ठावंत   बेगडी हिंदुत्ववादी बंडखोरांनी घडवून आणली आहे. नेहमी स्थिर सरकारची भाषा वापरणार्‍या भाजपने आघाडी सरकार अस्थिर करून आपली अपूर्ण  महत्वाकांक्षा पूर्ण केली आहे.परंतू तरीही असंख्य महाराष्ट्रीयनांनी सोशलमिडीयातून  मुख्यमंत्र्यांच्या स्टेटस् व्दारे प्रेम व्यक्त करून त्यांना उत्कृष्ट कारभाराची प्रमाणपत्रे दिली आहेत.हेच त्यांच्या गुणवैशिष्ट्ये आणि कर्तृत्वाची अविस्मरणीय साक्ष ठरणार आहे! 
आता पुढील राजकीय घडामोडी कशा होणार, न्याय आणि स्वायत्त संस्था महाराष्ट्राला कशा प्रकारचा न्याय देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.कारण या प्रकरणात जाणवलेल्या अनेक संशयास्पद पावित्र्याने  जनतेच्या मनात रोष निर्माण झालेला आहे.या वातावरणाचा उद्रेक होऊन न्यायसंस्थेच्या आदराला धक्का लागू नये ही यथार्थ अपेक्षा ठेवणे  गैर नाही.न्यायव्यवस्थेला जसा निर्णय देण्याचा अधिकार आहे, तसाच स्वातंत्र्योत्तर भारतातील जनतेचाही उचित अपेक्षा ठेवण्याचा हक्क आहे.त्याचा योग्य समतोल राखण्याचं काम व्यवस्थित पार पडत राहीलं तरच जनतेचा न्यायव्यवस्था व लोकशाहीवरील विश्वास बळकट होण्यास मदत होईल. उध्दजींना आणि शिवसेना तथा आघाडी सरकारला भावी काळातील यशस्वी घोडदौडीसाठी तथा स्थापन  होणार्‍या नव्या सरकारलाही हार्दिक शुभेच्छा...!

    Post Views:  415


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व