कृषी कायद्यांनंतर आता अन्य जादुई पाऊसालाही होईल सुरूवात ..! : संजय एम. देशमुख
Sanjay M. Deshmukh
2021-11-24
भारतीय संस्कृतीतील माणूसपण हरविलेल्या काही लोकांनी माणूसकीची केलेली केविलवाणी दुरावस्था देशातील माणसांच्या अप्रामाणिकतेची साक्ष देणारी ठरत आहे.आज समाजातील जन्मदात्या वृध्दांपासून काही लाभांचे आर्थिक स्त्रोत असतील तर त्यांना घरात वागविले जाते.जर्जर झाली असतील तर अजून जगविले जाते.त्याच्या संपत्तीवरील हक्काचे कायदेशीर सोपस्कार झालेले असतील तर त्यांच्या आयुष्याच्या दोऱ्या क्षणात कापल्याही जातात.म्हणजे गरज सरो,वैद्य मरो...!ह्या झाल्यात सधन आणि गलेलठ्ठ सेवानिवृत्ती वेतनधारक वृध्दांच्या कहाण्या!परंतू सामान्य मध्यवर्गीयांमधील वृध्दांना मात्र संपत्त्या आणि तटपुंजे निवृत्त वेतनही त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देऊ शकत नाहीत.मग आयुष्यभर जेमतेम नोकरी,उद्योग,शेती,मोलमजूरी करणाऱ्या मजुरांच्या जीवनातील केविलवाणा उत्तरार्ध तर लवकर मरणाची सतत मागणी करणारा अत्यंत विदारक असतो.अशा घरबसू,ऐतखाऊ उपाधीने ग्रासलेल्या पिडीतांची रवानगी मग थेट वृध्दाश्रमांमध्येच होत असते. म्हणूनच भारतातील वृध्दाश्रमांची संख्या एव्हाना झपाट्याने वाढत चालली आहे.कारण येथे पशूतुल्य विचारांनी वाटचाल करणाऱ्या मतलबी हैबानी कुपूत्रांची संख्याही तेवढ्याच लक्षणिय प्रमाणात वाढत आहे.ही आहे मानवी जीवनमुल्यांच्या भावभावनांच्या बाजारात दलालांनी निर्माण केलेल्या यातनामय वेदनांची विदारक दलदल...!
या देशाच्या ईतिहासाला बदलविणारे,संस्कृती आणि देशालाही गहाण ठेवू पाहणारे,संविधान आणि लोकशाहीची स्वत:चे वर्चस्व आणि मतलबासाठी मोडतोड करण्यास पुढे आलेले असेच काही कूपूत्र आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही निर्माण झालेले आहेत. हा मानवी समाजाला निर्माण झालेला विनाशकारी धोका आहे.अशा जमातींच्या प्रवाहात राहून नुसत्या माना हलवित घडत असेल ते सगळं मान्य करणाऱ्या आमच्या या मुक्या,बहिऱ्या भावंडांच्या फौजाही गोतास काळ ठरत आहेत.कारण मानवी जीवनमुल्ल्यांपासून फारकत घेतलेल्या ह्या अक्कलनामशुण्य वेताळांच्या वावटळी फक्त स्वत:चं चांगभलं करण्यासाठीच धावत असतात.सामाजिक हितास्तव धावण्यासाठी मात्र अशावेळी मुके,बहिरेपणासोबतच त्यांना नेमकाच लकवाही येत असल्याने ते लंगडेही झालेले असतात. अशा सगळ्या परिस्थितीत आंधळं बिचारं दळतेच दळते आणि कुत्रं मात्र हरामचं पीठच खात राहते.स्वत:ला माणूस म्हणवून घेणाऱ्या माणसांनो कधी बदलणार ही परिस्थिती,काय यासाठीही आभुषणं अलंकारांनी सजविलेल्या देवाच्या अवतारांचीच वाट पाहणार? या नयनरम्य दृश्यांमध्ये अडकवल्या गेल्यानेच तर आम्ही स्वातंत्र्यातही वैचारिक गुलामगीरीच्या परदास्यांच्या शृंखलामध्ये जगत आहोत.आत्मविश्वास हरवून दुर्बलतेचे जीवन जगत आहोत...!
अनैतिकता आणि अविश्वसाच्या धोकेबाज वाटचालीने घराघरातील संकटांचे तसेच प्रवाह देशाच्या राजकारणातही आज स्थिरावले असून यामुळे चिंतातूर जनतेचे जीवन सैरभैर झालेले आहे.एक वर्षाहून जास्त काळ चाललेल्या शेतकरी आंदोलनाला वेळोवेळी दडपण्याच्या प्रयत्नात तब्बल ७०० शेतकऱ्यांचे बळी गेले.यामध्ये बरेच वृध्दही होते.त्यानंतर कुठे माणसांचे बळी जाण्यास कारभूत ठरण्याचा ईतिहास घेऊन चालणाऱ्या पंतप्रधान मोदीजींना या मायबाप शेतकऱ्यांची आणि देशवासियांची भरभरून कदर आली.म्हणूनच शेतकऱ्यांना समजाविण्यात आम्ही कमी पडलोत म्हणून देशवासियांसाठी आम्ही हे कायदे मागे घेत आहोत,अशी उदात्त घोषणा त्यांनी केली.केली नाही तर ती त्यांना करावी लागली.कारण कोणाच्याही भावभावनांची तमा न बाळगता परिनाम,दुष्परिनामांचीही चिंता न करता आपल्याच तोऱ्यात बेधडक निर्णय अकस्मात जाहिर करणारे मोदीजी एकदम माघार कधीच घेणारे नाहीत.ही गोष्ट राष्ट्रवादीचे महाराष्ट्रीतील जेष्ठ नेते व आघाडी सरकारमधील मंत्री ना.जयंत पाटील यांनीही काल मान्य केली.ते म्हणाले कोणतंही होमवर्क केल्याशिवाय माघार घेणाऱ्यापैकी मोदी नाहीत.त्याप्रमाणे खरोखरच ही गोष्ट सुर्यप्रकाशाएवढी स्वच्छ आहे. कारण निवडणूका तोंडावर आहेत,भात्यातील चुनावी जुमल्यांचे प्रभाव नि:ष्प्रभ झालेले आहेत.त्यामुळेच सत्तेच्या राजमार्गाकडे घेऊन जाण्याच्या होमवर्कला यश देणारा उत्तरप्रदेश आणि ईतर राज्यात शेतकऱ्यांच्या यातनांची हाय लागू नये हे मतलबी होमवर्क मोदीजींनी त् पक्के लक्षात घेतले, आणि मेरे भाईओ...और बहनो...माता पिताओ.. म्हणत शेतकरी कायदे मागे घेत असल्याची विश्वास जिंकणारी भिमगर्जना करून टाकली.परंतू ते आणि त्यांचे भाजपमधील सेनापती कसे,कुठून आणि केव्हा माघारी परतून परतीचा प्रवास सुरू करतील याचा विश्वास आज जनतेला मात्र राहिलेला नाही.ईतका भाजप राजवटीचा नखशिखांत अभ्यास मतदारांना झालेला आहे.
कृषी कायद्यांच्या रूपाने सुरवातीला कुणालाही न जुमानता अशा प्रकारे कायदे मागे घेणे ही बाब अत्यंत शंकास्पद असून देशाच्या ईतिहासातील पहिली घटना आहे.मग एवढी देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचीच जर मोदीजींना चिंता होती तर त्यांनी ७०० लोकांचे बळी जाण्यापर्यंत वाट का पाहिली ? एका कायद्याच्या मसूद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होते त्यानंतर ते पारित होतात,आणि अशा कायद्यांना त्यानंतर न्यायालय स्थगीती देते.याचा अर्थ ते पारदर्शक शेतकरी हिताचे नव्हते,बेकायदेशीरच होते हे तेव्हा सिध्द झाल्यासारखेच होते.तरीही अशा तकलादू गोष्टीबध्दल आपल्या बहूमताचा गैरफायदा घेत हेका धरणे ही बाब लोकशाहीतील पंतप्रधान या घटनात्मक पदाला कमीपणा आणणारी आहे.असे विदुषकी विनोद करण्यातही आमचे पंतप्रधान ऐतिहासिकच ठरत आहेत, याचीही नोंद घेतली गेली पाहिजे.परंतू अशा विनोंदांना भिक न घालता,ज्यांनी शब्दशक्तीची सतत प्रतारणाच केलेली आहे,सप्रमाणता कधीच घालवलेली आहे, त्यांच्या घोषणेने शेतकरी हूरळून गेले नाहीत.त्यांनी या घोषणेला सांसदीय मान्यतेशीवाय आणि एम एस पी व ईतर मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकरी आणि त्यांच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
शेतकरी कायद्यानंतर आता आणखी काही नविन घोषणा होण्याचेही संकेत मिळालेले आहेत.म्हणजे पाच वर्ष लोकांच्या वास्तव समस्या, महागाई नियंत्रणाच्या उपाययोजनांवर विचार करण्यांची गरज ठेवायची नाही.तोपर्यंत त्यांना पोटभर अन्न मिळते की उपाशी आहेत हे पाहण्याची,संवेदनशीलता जागविण्याची कधीच आवश्यकता वाटली नाही. आता मात्र एक एक निर्णय जाहिर करीत वर्षानूवर्षापासूनच्या उपाशी पोटांना भरभरून अन्न देऊन ढेकरांचे कृत्रिम आशीर्वाद प्राप्त करण्याची घाई मोदी सरकारला झालेली दिसते. अशातलाच एक भाग म्हणून केन्द्र सरकार इंधनाचा ५० लाख बॅरलचा राखीव साठा मोकळा करून इंधनाचे दर आणखी कमी करण्याच्या प्रयत्नात आहे.त्याचप्रमाणे कोरोना काळातही ज्याची आतापेक्षाही जास्त गरज होती,ती तेव्हा बंद केलेरली घरगूती गॅसवरील सबसिडी सुरू केली जाणार आहे.शेतकरी कायद्यानंतरचे हे आणि निवडणूका पार पडेपर्यंत कीती मन की बाते आणि अच्छे दिनांच्या हवाई सफरी घडतात ह्या जादुंच्या खेळातील ऐतिहासिकता सुध्दा आमच्या एकमेव ऐतिहासिक पंतप्रधांनाच्याच नावे जमा राहणार आहे,हे वास्तव मतदारांनी लक्षात ठेऊन हा आठवणींचा अल्बम हाच आपल्या जीवनातील सर्वोच्च ठेवा आहे हे लक्षात ठेवला पाहिजे.तो योग्य प्रकारे सांभाळत स्मरणपूर्वक हवेत हात फिरवला म्हणजे चुटकीसरशी सगळ्या मुलभूत गरजा भागविण्यारा बोल मेरे आका म्हणत समोर हजर होऊ शकतो,पोटाच्या चिंता कायम मिटविणारी ही जादुई करामत ठरणार आहे...त्यासाठी वेळपरत्वे स्वत:ला बदलावे लागणार आहे.म्हणूनच कृषी कायद्यांनंतर आता नव्या विविध घोषणांचे पाऊस कोसळत राहणार आहेत.नंतर परतीचा प्रवास सुरू होऊन आभाळ कायमचे निरभ्र होत राहणार राहील हेच राजकीय वेधशाळेचे न चुकणारे पक्के अंदाज राहणार आहेत....! हे ज्यांना समजून घेण्याची ईच्छा असणारांनी वेळीच समजून घेण्याचा प्रयत्न करीत रहावा..!तुर्त एवढेच.....!
संजय एम. देशमुख, संपादक
मो. ८७८८६०२६३३
Post Views: 466