मनोज जरांगे यांच्या नाकातून आले रक्त; प्रकृती खालावली पण उपचार घेण्यास स्पष्ट नकार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  14 Feb 2024, 1:27 PM
   

वडीगोद्री ( जालना) : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती खालावली असून आज सकाळी नाकातून रक्त आले. जरांगे यांना या उपोषणात त्रास वाढत असल्याची परिस्थिती आहे. प्रकृती खालवली असली तरी जरांगे यांनी वैद्यकीय अधिकारी यांना तपासणी करण्यास नकार दिला आहे.  मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्याने मराठा बांधव व महिला या उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. सर्वांनी पाणी व उपचार घेण्याची विनवणी केली, माञ जरांगे पाटील यांनी स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे उपस्थित महिला व बांधव भावूक झाले आहेत. अंतरवाली सराटीत समाजबांधवांचा ओघ वाढत चालला असून त्यांच्या प्रकृती बद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

जरांगे यांच्या नाकातून आले रक्त
जरांगे यांच्या नाकातून रक्त आल्याने पुन्हा आरोग्य पथकातील सिव्हील सर्जन डॉ. पाटील यांनी तपासणी करण्यास विनंती केली. मात्र जरांगे यांनी हातवारे करून नकार दिला आहे. नाका  रक्त येणे हि चिंतेची बाब असून तपासणी करून उपचार घेण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे.

माझा जीव गेल्यावर सरकार राहील का?
माझा जीव गेल्यावर महाराष्ट्रात सरकार राहील का ? महाराष्ट्रात दुसरी श्रीलंका दिसेल, असा इशारा देत सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे-पाटील यांनी घेतली आहे. अध्यादेशाची अंमलबजावणी करणे सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकमेकांवर ढकलत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही देणे-घेणे नाही. ते भुजबळांना बळ देतायत. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेणार नाही. माझा जीव गेल्यावर सरकार महाराष्ट्रात राहील का? आमदार, खासदार, मंत्र्यांच्या घरी लोकं जातील. पंतप्रधानांची एकही सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये  मराठा समाज आक्रमक 
दरम्यान, जरांगे यांची प्रकृती खालावली असली तरी शासन स्तरावर काही हालचाल दिसत नाही. यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात मराठा समाजाने सरकार विरोधात आज सकाळी निदर्शने केली.


    Post Views:  240


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व