वसीम चौधरीला 26 पर्यंत पीसीआर, मोबाईलची होणार तपासणी
अल्पवयिन विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे; सायबर पोलिसांकडे तपास
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
23 May 2022, 8:19 PM
अकोला :चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी यांच्याविरुद्ध रविवारी अल्पवयिन विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने वसीम चौधरीला २६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
शहरातील वसीम चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी यांच्या विरुद्ध रविवारी सायंकाळी सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये एका अल्पवयिन विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार वसीम चौधरी यांनी मुलीसोबत मोबाईलवरून अश्लिल चॅटिंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला खोलीवर बोलावून तिच्यासोबत अश्लिल चाळे केल्याचेही तक्रारीत नमुद आहे. घाबरलेल्या मुलीने हीबाब पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांसोबत थेट सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन गाठून वसीम चौधरी विरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली. पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून रविवारी रात्री गुन्हा नोंदविला होता.
तपास सायबर पोलिसांकडे
वसीम चौधरीविरुद्ध आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांकडे देण्यात आला आहे. चौधरी यांच्या क्लासला रविवारीच सील करण्यात आले होते. त्यांचा मोबाईल व लॅपटॅप जप्त करण्यात आला असून, सायबर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 227