डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय इतिहासातील एक तेजस्वी क्रांतिसूर्य !
समाजाला आलेली ग्लानी, मरगळ झटकून् त्या समाजात प्रबोधनातून जागृती आणि कर्तृत्वातून जीवनातील आदर्शांचे धडे देऊन नवचैतन्य निर्माण करण्याकरीता अनेक प्रखर कर्तृत्ववान महापुरुष या देशात जन्माला आले, आणि प्रकाश देऊन अंधारात अद़ृश्य झाले. त्यापैकीच आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या उन्नतीसाठी, वंचितांचा आधार होऊन समाजासाठी, आणि रचनात्मक राज्यव्यवस्था साकारीत करण्याकरीता राज्यघटना लिहण्याच्या कर्तृत्वाने ओळखला जाणारा एक ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपाने या देशात दि.१४ एप्रिल रोजी प्रकाशामान झाला होता; त्यांनी प्रचंड आत्मविश्वासाने आयुष्यभर सामाजिक उत्कर्षाकरीता केलेला संघर्ष भारतीय इतिहासात अजरामर झालेला आहे.
मध्य प्रदेशातील महू या गांवी 14 एप्रिल १८९१ रोजी डॉ. भीमराव आंबेडकरांचा जन्म झाला. त्यांचे मूळगांव रत्नागिरी जिल्ह्यात अंबावडे हे होते. पाच वर्षाचे असतांनाच मातृछत्र हरवले, बालपणातच ममत्व, वात्सल्यापासून वंचीत राहिलेल्या भीमरावांना या बाल्यावस्थेतच गुरे राखण्याचे आणि लोकांची लाकडे फोडून देण्याची कामे करावी लागली. हसण्या-खेळण्याचे वय परिश्रमात गेले, परंतु मुळात त्यांच्या वडीलांनाच शिक्षणाची आवड असल्याने ते भीमरावांना शिकविण्याकरीता नेहमी प्रयत्नशील राहिले, मुंबईत येऊन ते मराठा हायस्कूलमध्ये शिकू लागले. घरची परिस्थिती हलाखीची असल्यावरही भीमरावांमधील वाचनाची विलक्षण आवड ओळखून त्यांना पाहिजे ती चांगली पुस्तके वडील आणून देत. “घरातील भांडीकुंडी विका, काहीही करा पण बापहो मुलांना अगोदर शिकवा” हे विदर्भाच्या भुमित महान समाजसुधारक संत गाडगे महाराजांनीही जीवनाच्या अखेरपर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. असाच प्रयत्न डॉ. आंबेडकरांच्या वडीलांनी केल्यामुळेच या वंशादिपाने नुसते कूळच नव्हे तर सर्व समाजाचा आपल्या ज्ञान आणि कर्तृत्वाच्या प्रकाशाने उद्धार केला.
लहानपणापासून त्यांना समाजातील उच्च, निच्चता, भेदभाव, अस्पृश्यता मनात खूप बोचत असे, त्यांचा सतत परिणाम होऊन तेव्हापासून त्यांनी समाजात समता निर्माण करण्याचा ध्यास घेतला होता. प्राथमिक शाळेपासूनच कुशाग्र बुद्धीमत्तेमुळे ते शिक्षकांचे आवडते होते, आणि त्या शिक्षकांनीच त्यांचे ‘अंबावडेकर’ हे आडनाव बदलून त्यांना ‘आंबेडकर’ केले व तेच पुढे रुढ झाले. वयाच्या सतराव्या वर्षी मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचे रमाबाईसोबत लग्न झाले; आणि नंतर बी.ए. ची पदवी घेऊन व त्यांनी बडोद्याच्या महाराजांकडे नोकरी पत्करली. पुढे महाराजांनीच त्यांना उच्च शिक्षणाकरीता अमेरिकेला पाठविले, ही घटना अधिक ज्ञानसाधनेकरीता त्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण टप्पा ठरली. पुढे अनेक विद्वत्ताप्रचुर शोधनिबंधांचे लिखाण, एम्.ए.पदवी, पी.एच.डी आणि अमेरिकेतच त्यांनी राजनीतिशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र व अर्थशास्त्र, या विषयांचा सखोल असा अभ्यास केला. सन १९२२ मध्ये बॅरिस्टर होऊन ते भारतात परतले.
समान अधिकारांकरीता लढत राहण्यासाठी त्यांनी एक वैचारिक व्यासपीठ म्हणून ‘मूकनायक’ नावाचे वर्तमानपत्र चालू केले. पुढील काळात त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ हे साप्ताहिकही चालविले. महाड येथील ‘चवदार तळ्याचे’ पाणी चाखण्याचा त्यांचा सत्त्याग्रह इतिहासात अत्यंत लक्षवेधी ठरलेला आहे. सन १९२३ ते १९३७ पर्यंत सिडनहॅम कॉलेजचे प्राध्यापक आणि लॉ. कॉलेजचे प्राचार्य म्हणून सेवारत राहून सन १९३७ नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. अस्पृशांना आपल्या मानवी हक्कांची जाणीव व्हावी आणि ते हक्क प्राप्त करण्याकरीता त्यांच्यात चेतना निर्माण व्हावी म्हणून त्याकाळात मंदिरांमध्ये सर्व हिंदूंना प्रवेश, विधानसभेत अस्पृश्यांचे अधिक प्रतिनिधी आणि त्यांना सैन्य व पोलिसात अधिक प्रमाणात भरतीची संधी मिळावी, असे त्यांच्या योजनेमधील काही ठळक मुद्दे त्यांनी मांडले होते. त्या काळात भारतातील प्रश्न सोडविण्याकरीता भारतीय नेत्यांना ब्रिटीश सरकार लंडनला विचारविनिमयाकरीता बोलवित असे. त्या आयोजीत ‘गोलमेज परिषदेत’ त्यांची उपस्थिती असे. या समाजातील धर्माचे ठेकेदार समाजाचे शोषण करीत, लोकांना गुलामगिरीत ठेऊन त्यांना पशुवत वागणूक देत होते या विरुद्ध त्यांनी जागृती केली. 15 ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी स्वतंत्र भारताचे ते प्रथम कायदामंत्री होते. आता स्वातंत्र्य तर मिळाले, पुढे देशाचे शासन चालविण्याकरीता उपयुक्त कायदे करुन आणि त्यानुसार भारताची राज्यघटना बनविली, त्यात अंतर्भूत अस्पश्यता निवारणासंबंधीचा संविधानातील भाग सरकारकडून स्वीकारण्यात आला, हे त्यांच्या संघर्षातून मिळालेले एक अविस्मरणीय यश आहे. १९५१ मध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यापूर्वी १९५० ला ते सिलोनमध्ये बौद्ध संमेलनात सहभागी झाले. बौद्ध धर्माचे अधिष्ठान हे मानवकल्याण साधण्याकरीता उपयुक्त असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
भारतातील सर्व दलीत, दु:खी, आर्थिक आणि सामाजिक द़ृष्टिने पिडीत असलेल्यांनी व त्यांचे बाबतीत सहानुभूती बाळगणारांनी काम करण्याकरीता एकत्र यावे, म्हणून त्यांनी रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. पिपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन करुन, सिद्धार्थ कॉलेज आणि त्यानंतर औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज चालू केले. ‘कोणतीही गोष्टी मी सांगतो म्हणून सत्य मानू नका, ती तुमच्या बुद्धीला, विचाराला पटत असेल तरच स्वीकारा’ असे नेहमी सांगणार्या बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक माणसाला त्यांचे स्वतंत्र अस्तित्व जागृत करण्याचा संदेश शेवटपर्यंत दिला. सामाजिक आणि वैचारिक परिवर्तनाकरीता अनेक पुस्तकांच्या माध्यमातून त्यांचे विपुल साहित्य आज उपलब्ध आहे. आजारपणातही त्यांनी त्यांचे काम कधी थांबविले नाही, यातच त्यांची प्रकृती खालावत गेली आणि दि. ६ डिसेंबर १९५६ रोजी या क्रांतीसूर्याने देशाचा, या समाजाचा अखेरचा निरोप घेतला! त्यांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष आकाराला येण्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या पक्षाची बैठक व्यापक होण्याऐवजी पुढे अत्यंत संकुचीत होत गेली. जीवनात अखेरच्या श्वासापर्यंत न्याय, मानवता आणि समानता या तत्वांसाठी लढा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रखर उल्लेखनीय कार्याने भारतीय इतिहासातील एक थोर महापुरुष ठरले. तेजस्वी क्रांतिसूर्य ठरले!
Post Views: 272