सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार


अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, आयएनएस विक्रांत प्रकरण अंगलट
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  11 Apr 2022, 8:15 PM
   

मुंबई : किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. सोमय्या यांचे वकील पावनी चढ्ढा यांनी याबाबतची माहिती दिली. आयएनएस विक्रांत बचावसाठी गोळा केलेल्या मदत निधीत घोटाळा केल्याचा पिता- पुत्रांवर आरोप आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्यामुळे अटकेची टांगती तलवार त्यांच्यावर कायम आहे. 
किरीट सोमय्या यांना अटकेपासून संरक्षण मागितले होते. मात्र त्यांना कोणतेही संरक्षण मिळाले नाही. सोमय्यांनी जो पैसा गोळा केला त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण न दिल्याने जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलावर आहे. किरीट सोमय्या यांच्याबाबत आज सकाळी युक्तिवाद झाला. त्यांनी जी कागदपत्रे सादर केली त्याद्वारे गुन्हा कबूल केल्यासरखे आहे, अशी प्रतिक्रिया या प्रकरणावर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. त्यामुळे ही नेमकी कोणती कागदपत्रे आहेत, याच्याही चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत फाइल्स उघडत, अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदत निधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 11 एप्रिल म्हणजेच, आज सुनावणी पार पडली. कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. 
सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली. संजय राऊतांनी याप्रकरणातील कागदपत्र समोर आणल्यानेतर सोमय्यांविरोधात नवी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, याव्यतिरिक्त किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या आणि इतर यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधातील फसवणुकीचा गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. 
संजय राऊतांनी केले आरोप... 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदत निधीत घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी हा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले होते. आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबतही माहिती मागवली होती. मात्र, राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने दिली असल्याचे राऊत यांनी म्हटले होते.

    Post Views:  185


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व