होळी म्हणजे अमंगल, वाईट गोष्टींचे, असुरी वृत्तींचे दहन. मनामध्ये नवचैतन्य निर्माण करून उदात्त विचारांनी वसंत ऋतूच्या स्वागताचा काळ! विविध रंगांच्या रंगछटांमध्ये आनंदाची लयलूट करण्याची एक पर्वणी! समाज संघटन आणि मानवतावादाचा संदेश देणारा हा आनंदोत्सव भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वापार चालत आलेला आहे. परंपरांची कांस धरून अनेक सण सामूहिक रितीने मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. श्रीमंत गरीबी, जात-पात-धर्म-पंथ-जेष्ठता, कनिष्ठता यापलिकडे भेदातित, सामूहिक आनंदाचे जीवन जगण्याचा एक अनोखा संदेश सर्व सण देत असतात. त्यामागे समाजात संघटन निर्माण व्हावे हा उदात्त हेतु अभिप्रेत आहे. आनंदाने सण साजरे करून त्यामागे असलेल्या मुलभूत उद्देशांची, विशाल दृष्टीकोणाची जोपासना व्हावी. या विचारांना तिलांजली देऊन अनेक अनुचीत प्रकार आज मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यामुळे विधायक, मंगल विचारांच्या आदान प्रदानातून जीवन विकास साधण्याऐवजी वाढत्या अपप्रवृत्तींच्या अतिरेकाने समाज जीवनात शांततेऐवजी, क्लेश आणि अशांतता निर्माण होत आहे.
आनंदाच्या परमोच्च, क्षणापर्यंत घेऊन जाणार्या विविध सणांमध्ये माणूसकीचा ओलावा आणि परस्पर विश्वासाचे गुंफन असावे याकरीता, अनेक अनिष्ट प्रथांवर कडाडून प्रहार व्हावेत. सण साजरे करण्यामागील उदात्त उद्देश आणि त्यातून एकोपा निर्माण करून, वैयक्तिक आणि सामाजिक प्रगती कशी साधावी, स्वतः आनंदात, सुखासमाधानात जीवन जगून, तो आनंद ते सुख इतरांच्या जीवनात कसे निर्माण करावे, हे विदर्भाच्या भूमीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांसारख्या अनेक संतांनी मानवाच्या गळी उतरविण्याचे प्रयत्न केले. “माणूस द्या मज माणूस द्या” अशी हाक देत खर्या खुर्या अर्थाने हृदयातून विकसीत झालेला, परिपक्व, मंगल विचारांनी परिपूर्ण मानव घडविण्याची मानव जागृतीची अखंड साधना त्यांनी आयुष्यभर आरंभिली होती. त्यांच्या प्रबोधनातील त्या विचारांचे स्मरण करून आणि प्रत्येक सण-महोत्सवाकडे, प्रासंगिक क्षणांकडे पाहण्याचा तसा विशाल दृष्टीकोण ठेऊनच सामाजिक आनंद निर्माण करता येईल. त्यातूनच आम्ही सर्वांगीण समृध्द समाजनिर्मिती करू शकतो. या सत्त्याचा उद्बोध संत, थोर पुरूष नेहमी करीत राहिले. म्हणून विडंबन थांबवून चेतना जागृत करून, या नाविण्याचा स्वतःपासून शुभारंभ आणि नंतर समाजातील वैचारिक परिवर्तनाकरीता सिध्द होणे हे आमचे कर्तव्य आहे.
अनेक सणांप्रमाणेच होळी हा सुध्दा भारतीय संस्कृतीत एक पवित्र सण आहे. पूर्वी होळीच्या निमित्ताने जमिनीवर पडलेला पालापाचोळा एकत्र करण्यासाठी संपूर्ण गाव सामूहिक श्रमदानाकरीता सिध्द होत असे. त्यामुळे सर्व परिसर आपोआपच स्वच्छ होत असे. म्हणजे होळीच्या निमित्ताने कचरा साफ करून गावात स्वच्छता निर्माण केली जाई. त्यातून आपसूकच संघटन निर्माण होऊन मोकळ्या विचारांनी एकत्र येणे होते. अमंगल विचारांची जळमटं दुर होऊन, हृदयातील आंतरिक परिवर्तन झाल्याने एक वेगळे चैतन्य, ओसंडून वाहणारा आनंद मना-मनामध्ये निर्माण होत असे. हा गोळा केलेला केरकचरा, पालापाचोळा एका ठिकाणी ठेऊन सर्व गावाची सामूहिक विशाल होळी पेटविली जाई, याला ‘होलिकादहन’ म्हणत.
होळी आणि धूलिवंदनामागील मुख्य उद्देशाचे आज संपूर्ण स्वरूपच बदललेले आहे. आज केरकचरा गोळा करून स्वच्छता साधावी आणि त्यातून होळी पेटवावी या विचारांची जागा अनुचित, अतिरेकी विचारांनी घेतली आहे, एकोपा संघटन आणि त्यातून वैचारिक परिवर्तन, या मूल्यांचे ठिकठिकाणी विडंबन होत आहे. होळी पेटविण्याकरीता चोरून लाकडे आणून कुरापती काढण्याचे आणि त्यातून भांडणे निर्माण करण्याचे, विकृत उद्योग आजची तरूण पिढी करीत असते. कारण आज त्यांना मार्गदर्शन करून कर्तव्याचे धडे देऊन संस्कारीत, सक्षम करण्याकरीता समाजामध्ये कोणी योग्य मार्गदर्शक दिसत नाहीत. तथाकथीत विद्वान ज्यांच्याकडे समाजाने मोठ्या आशेने प्रबोधक म्हणून पाहावे, त्यांचेच आजचे बदललेले स्वरूप पाहून समाज आणि त्या समाजातील युवावर्गही संभ्रमित झालेला आहे. महाराष्ट्राच्या दुष्काळात तीव्र पाणी टंचाई असतांना लाखो लीटर पाण्याची होळी केली जाते. पर्यावणाचा विचार न करता झाडे तोडून होळीत टाकली जातात. जो निसर्ग आपले पालन पोषण करतो त्यालाच आपल्या अघोरी आनंदाचे बळी ठरविल्या जाते. अशा असंवेदनशील वाटचालीने मनुष्य आनंदापासून दूर जाऊन त्याला क्लेष, दुःख आणि समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याला संपूर्णपणे तो स्वतः जाबाबदार आहे. निसर्गावरील आघातांमुळे सृष्टीच्या ऋतूचक्रामध्ये बाधा येऊन मनुष्यजीवनाची अपरिमित हानी होत आहे. तरीही समाजातील मनुष्य विपरीत वाटचाल करीत राहिला तर होळीसारख्या सणांचा मनसोबत आनंद लुटण्याऐवजी अनेकांच्या जीवनाचीच होळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून सावधपणाचे, शहाणपणाचे जीवन जगून इतरांनाही आनंदी सुखी ठेवण्याची समाजसाधना प्रत्येकाने अंगीकारणे हाच मानवी हिताचा उदात्त मानवतावादी विचार आहे.
सर्वांना होळीच्या मनःस्वी शुभेच्छा!
संजय एम. देशमुख
संपादक - विश्व प्रभात
मो. ९८८१३०४५४६
Post Views: 328