एसटी सुरू करण्यासाठी हालचाली; 10 हजार कंत्राटी कामगारांची होणार भरती


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  12 Mar 2022, 7:43 PM
   

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने 10 हजार चालकांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. संपाचा पेच कायम असताना उच्च न्यायालयातून वारंवार तारखा मिळत असल्याने प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. संपकरी कर्मचार्‍यांपैकी 10 मार्च अखेर 30 हजार 112 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने केलेल्या शिफारसीमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल दिला. या अहवालाचा आधार घेऊन परिवहनमंत्री अनिल परब यांनी कारवाई मागे घेण्यास तयार असल्याचे सांगत कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद वाढत असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले. कामावर रुजू होणार्‍यामध्ये प्रशासकीय दर्जाच्या अधिकार्‍यांचा समावेश अधिक आहे. चालक वाहकांची संख्या कमी आहे. टप्याटप्याने 10 हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार असून, यापैकी जवळपास दोन हजार चालकांची भरती झाली आहे. या चालकांच्या मदतीने राज्यात चार हजार गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या असून, त्यांच्या मदतीने 13 हजार फेर्‍या धावल्या आहेत, असा दावा एसटी महामंडळाचा आहे.
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळातील 92 हजाराहून अधिक कर्मचार्‍यांनी संप पुकारला होता. यातील 30 हजार 112 कर्मचारी कामावर रुजू झाले असून, अद्याप 51 हजार 571 कर्मचारी संपावर ठाम आहेत. 11,243 कर्मचारी निलंबित असून 10,249 कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आलेले आहेत. देशातील सर्वांत मोठे प्रवासी महामंडळ असलेल्या एसटी महामंडळात महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी ऑक्टोबर 2021 पासून एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे.
4 मार्चपासून कारवाई बंद...
मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत शिस्तभंगाची कारवाई न करण्याच्या तोंडी सूचना एसटी महामंडळातील अधिकार्‍यांना दिल्या होत्या. मात्र, मंत्री अनिल परब यांच्या मार्गदर्शनानुसार महामंडळाने 4 मार्चपासून कारवाई बंद केलेली आहे. 4 मार्चपर्यंत 11 हजार 433 कर्मचार्‍यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आलेली आहे, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

    Post Views:  223


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व