जागतिक महिला दिवस... सखी... घे उत्तुंग भरारी!!


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  08 Mar 2022, 12:56 PM
   

अपार शक्ती भारी तुझ्यात, आहेस तू सबला नारी!
घे अशी उत्तुंग भरारी, पाहिल मग दुनिया सारी!!
प्रिय सख्यांनो, आज बहुतेक सर्व महिला वर्गात एकच चर्चेचा विषय ठरलेला असतो, तो म्हणजे मला कसं बारीक व्हायचंय, सुंदर दिसायचंय, चारचौघीत नटायचंय, मुरडायचंय आणि हो... शरीर, बांधासुद्धा सुंदर सुडौल ठेवायचा आहे बरं!!   अगं, हो! हो! सखी, अगदीच मान्य आहे बरं तुझं म्हणणं, पण तुझा देह सुंदर ठेवण्याच्या नादात देवानं तुला घडवताना अजून एक महत्वाचा आणि तितकाच सुंदर अवयव दिला आहे ज्याचा तुला पूर्ण विसर पडलेला दिसतोय आणि तो अवयव म्हणजे लाखमोलाचा तुझा मेंदू, ज्याची ताकद तू आजवर कधी आजमावली आहेस का?  तू किती बुद्धीवान व हुशार आहेस तुला माहित आहे का?  सखी, तू दाखवून दे ना सा-या जगाला तुझ्यातील कलागुणांनी, हुशारीनं तुझ्या मेंदूचं सौंदर्य!  कारण आपल्या देहाचं सौंदर्य क्षणिक असतं गं! पण तुझ्यातल्या मेंदूचं सौंदर्य मात्र कायम अबाधितच राहील बघ!! 
सखी, तू दिसायला कशी दिसतेस ते इतरांसाठी महत्वाचं असेलही कदाचित, पण आता शरीरासोबतच तुला तुझ्या मेंदूची ताकद व चमकसुद्धा इतरांना दाखवून द्यायची आहे बरं!!  तुझ्या आयुष्यात तुलाच ठरवायचं आहे की यशाचं कोणतं शिखर तुला गाठायचं आहे किंवा तू ते गाठणार आहेस. 
सखी, तुला कुणासारखं तरी सुंदर दिसायचं आहे किंवा त्या एका नामांकित स्त्रीनं जसा वेश परिधान केला तसाच तुला सुद्धा परिधान करायचा आहे, तसंच शरीरानं सुंदर सुडौल व्हायचंय, असाच विचार तू करतेस, हो ना?  पण मग तुझं मन आणि तुझ्या बुद्धीचं काय गं?  कधी विचार केला आहेस का तू त्याचा?  मग हा असा फक्त शरीर सजवण्याचाच अट्टाहास कशासाठी बरं, तुझा?  ती वेशभूषा त्या स्त्रीवर शोभतेय पण तुला ती शोभेलच असं नाही? कारण सखी तू ती नाहीस आणि तिच्या चेहऱ्यावर जे तेज आलं आहे ना ते केवळ तिच्यातल्या कर्तृत्ववानं, आत्मविश्वासानं आणि ते तसं तेज आणि आत्मविश्वास हा फक्त आणि फक्त तुला स्वतः प्रयत्नशील राहून, स्वकष्टानंच मिळवावा लागले बरं, खरं की नाही?  सखी, तुझं अस्तित्व वेगळं आहे जे तुला स्वतःच तुझ्या बुद्धीच्या जोरावर सिद्ध करायचं आहे आणि ते तू एकदा का जगासमोर भक्कमपणे सिद्ध केलंस की तुला जराही वेळ मिळणार नाही इकडे तिकडे पहायला बघ, की कुणी काय आणि कोणते कपडे परिधान करतंय किंवा कोण किती सुंदर दिसतंय!!  कारण तुझं तू स्वत:चं असं वेगळं विश्व निर्माण केलेलं असशील तुझ्या बुद्धीच्या जोरावर आणि मग तुला जाणवेल तुझ्या दिसण्यात नाही तुझ्या कर्तृत्वात आणि भक्कमपणे असण्यात तुझं खरं सौंदर्य दडलेलं होतं किंबहुना ते त्यातच आहे, खरं की नाही? आणि हो सखी, मग तुझं आणि तुझ्यासारख्या अनेक सखींच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा करत खरोखरच म्हणावं लागेल बरं एकच दिवस अस्तित्वाचा हिच्या का बरं साजरा होई?  करावा प्रत्येक दिवस साजरा हिच्याच कर्तृत्वाचा बाई?.
स्मिता दळवी
खारघर, नवी मुंबई
९८३३८६४८८४

    Post Views:  345


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व