अकोला - मनपा निवडणुकीवर डोळा ठेवत सत्ताधार्यांनी विषय घेतले. गत पाच वर्षात सत्ताधार्यांना हे कधीही सुचले नाही, नेमके आताच बरे सुचले असा थेट आरोप सेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने सभागृहात करीत भाजपला अंगावर घेतले. निवडणुकीपुर्वी जनतेला लुभावण्यासाठी जाणुनबुजुन काही विषय घेण्यात आले, असे अनेक प्रश्न विरोधकांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केले. आयुक्त कविता द्विवेदी याविषयी काय भूमिका घेतात याकडे विरोधकांचे लक्ष लागले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना, रमाबाई आंबेडकर घरकुल योजना, एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधार योजना या योजनेतंर्गत बांधकाम करण्यात आलेल्या घरकुलांचा 2022-23 व 23-24 या दोन वर्षाचा मालमत्ता कर पुर्णतः माफ करण्यात आला आहे. यावर आक्षेप घेत सेनेने भाजपला अंगावर घेतले. इलेक्शनच्या तोंडावर सत्ताधार्यांनी हा विषय आणल्याचा आरोप सेना गटनेता राजेश मिश्रा यांनी केला. गत पाच वर्षात कधीही एवढा पुळका भाजपला आला नाही. नेमका आताच कसा आला, नागरिकांना चुचकारण्यासाठी हे भाजपकडुन करण्यात येत आहे, असा मुद्दा विरोधकांनी मांडला.
चर्चा न करताच महापौर यांनी इतिवृत्त मंजुर केले व त्यानंतर अमृत योजनेच्या कामावर सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जलवाहीनी अंथरण्याचे काम आटोपुनही शहरात दररोज पाणी पुरवठा केला जात नसल्याचा मुद्दा विरोधकांनी लावुन धरला. तरीही आयुक्त यांनी बोअरींग व सबमर्सीबल पंपाची दुरुस्ती थांबवली कशी असा सवाल विरोधी पक्षनेता डॉ. जिशान हुसैन, राजेश मिश्रा, पराग कांबळे, मो. इरफान यांनी उपस्थित केला. रोज पाणी देण्यात येईल, असे भ्रमीत करण्याचे काम भाजपने केले असुन नागरिकांकडुन अवाच्या सवा पाणीपट्टी वसुल केली जात असल्याचा मुद्दा सेना गटनेता मिश्रा यांनी उपस्थित केला. जलप्रदायचे कनिष्ठ अभियंता कामाच्या ठिकाणी हजर नसतात, निमरोड नामक अभियंता कामावर येत नाही, नगरसेवकांना त्रास देण्याची अधिकार्यांनी सुपारी घेतली आहे का? असे अनेक प्रश्न कांबळे, मिश्रा, गजानन चव्हाण, ढगे, रहीम पेंटर, मो. इरफान यांनी सभागृहात मांडले.
अनधिकृत नळ जोडण्या देण्याचा सपाटा काही कर्मचार्यांनी लावला असल्याचा आरोप गजानन चव्हाण, राजेश मिश्रा, अश्विनी नवले व माजी महापौर अग्रवाल यांनी केला. शिवसेना वसाहत, सोनटक्के प्लॉट, खिडकीपुरा येथे अनधिकृत नळ जोडण्या दिल्याच्या तक्रारी केल्या असुन काहीही झाले नाही. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. नोंद घेतली असुन तपासणी केली जाईल असे आयुक्तांनी सांगितले.
मनपा क्षेत्रातील अनधिकृत व अतिक्रमीत बांधकामे या कार्यवाहीसाठी अभिकर्ता नियुक्त करण्यात येणार आहे. हा विषय मंजुर झाला असला तरी महापालिकेकडे यंत्रणा असताना हा खटाटोप कशासाठी, कर्मचारी काम करीत नाहीत का, अधिकारी काय करतात असे एक ना अनेक प्रश्न डॉ. जिशान हुसैन, राजेश मिश्रा, मो. इरफान , रहीम पेंटर उपस्थित केले. अभिकर्ता नियुक्तीमुळे उलट भ्रष्टाचार वाढीस लागणार असल्याचा मुद्दा डॉ. जिशान यांनी मांडला.
Post Views: 259
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay