निष्पर्णाच्या डहाळीवर शेती - मातीतून फुललेली कविता..! : ऍड. अनंत खेळकर
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
27 Oct 2023, 7:24 PM
कविता ही कवीच्या मनाचं लेणं असते, तसेच ती ईश्वरी देणंही असते . जीवनानुभवाचे चित्रण तर कवितेत असतेच, शिवाय आपल्या अवती भोवतीच्या कल्लोळांना शब्दरूप देण्यासही कविता सार्थक ठरते. देवलाल सोमाजी तायडे यांची कविता शेती - मातीतून उगवली आहे . शेतीमध्ये कष्ट करून त्यांनी आपली प्रतिभा फुलवली आहे , असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकार , कवी ऍड. अनंत खेळकर यांनी देवलाल तायडे यांच्या निष्पर्णाच्या डहाळीवर या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्षपदावरून बोलतांना केले .
नुकतेच या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले . यावेळेस सुनील हुशे , सहाय्यक ग्रंथालय संचालक , छ. संभाजीनगर , ज्येष्ठ कथाकार , कवी सुरेश पाचकवडे , कवी डॉ. विनय दांदळे , श्यामराव वाहूरवाघ, अध्यक्ष ,अमरावती विभाग ग्रंथालय संघ, सौ . सुषमाताई कावरे , सौ. कोकिळाताई वाहूरवाघ , महेश पागृत प्रमुख अतिथी विचारपीठावर उपस्थित होते .
सुनील हुशे यांनी देवलाल तायडे यांच्या प्रतिभेचं कौतुक केलं. सुरेश पाचकवडे यांनी आंतरिक स्पंदनाचा हा आविष्कार आहे असे नमूद केले . श्यामराव वाहूरवाघ यांनी तायडे यांची कविता घामाची फुले आहेत असे म्हटले . डॉ . विनय दांदळे यांनी विशद केले की , कविता केवळ सुचून चालत नाही तर ती विचारपूर्वक ठाकठीक करावी लागते , या कवीचा हा चिंतनशील प्रवास आहे , असे भाष्य केले .
उमरीतील श्री संत नरहरी महाराज सभागृहात संपन्न झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला संदीप देशमुख ,अजय पागृत , धनंजय मुरूमकार , राजेंद्र वानखडे , विनोद इंगळे , कैलास मुरूमकार ,दीपक पाटील , विजय शेगोकार , गोपाल मुरूमकार यांचेसह अनेक रसिक उपस्थित होते . या कार्यक्रमाचे बहारदार संचालन प्रा.मिलिंद वानखडे यांनी केले .
Post Views: 91