कर्नाटकात हिजाब वाद चिघळला; तिरंग्याच्या जागी भगवा फडकवला
जय श्रीरामचा नारा कलम 144 लागू!
बंगळुरू : शाळेत हिजाब घालण्यावरून सुरू झालेला वाद कर्नाटकात आता सर्वदूर पसरला आहे आणि चांगलाच चिघळला आहे. रस्त्यावरून हिजाब घालून जाणार्या विद्यार्थिनीला जय श्रीराम असे म्हणत काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आव्हान दिले. तिनेही त्यावर अल्लाहू अकबरचा नारा देत उत्तर दिले. हे असे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता कर्नाटकातले वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य सरकारने पुढचे तीन दिवस माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यात हिजाबवरून राजकीय वातावरण तापून वाद निर्माण झाला आहे. महाविद्यालयात तरुणींना हिजाब परिधान करण्यास मनाई करण्यात आली आहे. हे प्रकरण इतके तापले की हा वाद आता थेट न्यायालयात पोहोचला आहे. कर्नाटकातील विद्यार्थिनींना हिजाब परिधान करून महाविद्यालयात प्रवेश नाकारला. त्यानंतर हा वाद सुरू झाला. याप्रकरणी काही मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात या विरोधात आवाज उठवला. एकीकडे या निर्णयाच्या विरोधात मुस्लिम मुली आक्रमक झाल्या आहेत तर दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटना, विद्यार्थी भगवा गमचा, भगव्या शाली, उपरणी आणि झेंडे नाचवणारी तरुण आणि दुसर्या बाजूला त्यांना विरोध करणार्या हिजाबधारी तरुणी असे तणावग्रस्त चित्र एका व्हिडीओतून समोर आले. शिवमोगा जिल्ह्यातल्या सागरा कॉलेज कॅम्पसमधली ही दृश्य असल्याचे समजते. आता ही सगळी दृश्य सोशल मीडियावरून व्हायरल होऊ लागल्याने प्रशासनाने सावध भूमिका घेत शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक आणि जनतेने शांतता राखावी, सौहार्द टिकवून ठेवावे, असं आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे. सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
हिजाबचा वाद काय आहे?
साधारण 23 दिवसांपूर्वी कर्नाटकातील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हिजाब घालण्यावरून वाद सुरू झाला. हा वाद सुरू होण्यापूर्वी या महाविद्यालयात येणार्या मुली हिजाब घालत नव्हत्या. हिजाब घातल्यानंतर संबंधित महाविद्यालयाने त्यांना प्रवेश नाकारला. याविरोधात मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम्ही केवळ हिजाब घातला म्हणून महाविद्यालय प्रशासनाने आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारलाय. आमच्या धार्मिक आणि मूलभूत हक्कांमध्ये हस्तक्षेप केला जाऊ नये, अशी याचिका त्यांनी केली आहे.
Post Views: 186