वक्तृत्व, कर्तृत्वातून जागृती आणि आता सेवानिवृत्तीनंतरही निरपेक्ष ज्ञानदानाचा संकल्प!


सौ. विजयमाला घोलपे यांचा अनुकरणीय आदर्श!
 संजय देशमुख  2022-02-08
   

कोल्हापूर : कर्तव्याला सर्वोच्च स्थान देऊन तत्वबद्ध नैतिक मुल्ये जोपासत कर्तव्यवादी वाटचालीप्रती निष्ठा आणि कामात आनंद शोधणार्‍या व्यक्ती कर्तव्याची तुलना कधी आर्थिक मोबदल्यासोबत करीत नसतात. कोणत्याही क्षेत्रात कामाप्रती आवड जोपासणारी अशी व्यक्तीमत्वं वयाची किंवा सेवानिवृत्तीची बंधनं झुगारून त्यापलिकडेही आपले सामाजिक दायित्व पार पाडण्यासाठी निरंतर कार्यरत राहतात. अशाच प्रकारचा एक विधायक आदर्श गारगोटी, कोल्हापूर येथील सौ. विजयमाला विजयराव घोलपे यांच्या रुपाने दृष्टीक्षेपात आला. शिक्षणक्षेत्रात शिक्षकीपेशातून ज्ञानदानाचं सेवाकार्य करीत आता सेवानिवृत्तीनंतरही कोणताही मोबदला न घेता शैक्षणिक कार्य निरंतर करत राहण्याचा संकल्प सौ. विजयमाला घोलपे यांनी आपल्या सेवानिवृत्तीप्रित्यर्थ घेतलेल्या निरोप समारंभात व्यक्त केला आहे. त्यानिमित्त त्यांच्या लहानपणापासूनच सुरू असलेल्या मानवी जीवनमुल्यांच्या वाटचालीचा, आणि शिक्षण प्रबोधन तथा जागृतीच्या कार्याचा उलगडा झाला.
सौ. विजयमाला विजयराव घोलपे ह्या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या! त्यांच्या सेवानिवृत्ती आणि जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांना त्यांचे मार्गदर्शक पद्मश्री, शिक्षणमहर्षी डॉ. डी.वाय. पाटील (माजी राज्यपाल) यांनी सुद्धा फोनद्वारे शुभेच्छा व्यक्त केल्यात. त्या कोल्हापुरच्या डी.वाय. पाटील प्रतिष्ठानच्या गारगोटी येथील वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. लहानपणात 10 व्या वर्षी माईक हातात घेऊन त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यक्रमांचे सुत्रसंचालन आणि अनिष्ठ प्रथांविरूद्ध जनजागृतीचे व्यापक कार्य केलेले आहे. घरात पुरोगामी विचारांचे अधिष्ठाण असल्याने त्यांना विवाहापूर्वीच 35 वर्षापूर्वी महाविद्यालयीन नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सामाजिक कार्यासाठी घरातूनच प्रोत्साहन आणि पोषक वातावरण मिळत गेल्याने त्यांनी तरुण वयात त्याकाळी चालणार्‍या मुलींचे केस अर्पण करण्याच्या जटाप्रथेविरूद्ध आवाज उठविला. त्यामुळे अंधश्रद्धेविरूद्ध जनजागृती कार्य करणारी कॉलेज कन्या म्हणून आपला परिचय सिद्ध केला होता.
महाराष्ट्रात मोठ मोठे मानधनं घेऊन महापुरूषांच्या जीवनावर व्याख्यानं देणारे पोपट असताना सौ. विजयमाला घोलपे यांनी महिला सबलीकरण संस्कारक्षम वाटचालीचे महत्व, लेक वाचवा इंग्रजी फारच सोपी भाषा या विषयांवर एक पैसाही मानधन न घेता पदरमोड करून उद्बोधक व्याख्याने देऊन मार्गदर्शनाचे बहूमोल कार्य केलेले आहे.  लहान वयात हातात घेतलेला माईक हाच त्यांचा श्वास आणि ध्यास ठरल्याने वक्तृत्व आणि नेतृत्व क्षमतेच्या बळावरच त्या कॉलेजमधून व समाजात जनमानसावर छाप पाडणारी रणरागीणी म्हणून गडहिंग्लज शहरात 35 वर्षापासूनच परिचित आहेत. हायस्कूलमधील विद्यार्थीनीमध्ये तर त्यांच्या मातृत्व, प्रेम आणि स्नेहपूर्ण संवादामुळे विद्यार्थीनींची दुसरी आई हा त्यांचा परिचय आहे. त्यांच्यातील माया, ममता, आपुलकी व आत्मियता ह्या त्यांच्या विद्यार्थीनीसाठी अविस्मरणीय स्वभावपैलू ठरलेले आहेत. या आनंदी, अभ्यासू आणि सकारात्मक विचारसरणी अंगिकारणार्‍या झानाधिष्ठीत, विद्यार्थीनिष्ठ शिक्षिकेला आईवडीलांकडून संस्कार आणि विचारांचा वारसा तर मिळालाच, परंतू लग्नानंतर गारगोटी विद्यापीठात कार्यरत त्यांचे पती विजयराव घोलपे यांच्या खंबीर पाठिंबा आणि सहकार्याने त्यांनी आपल्या ध्येयपूर्तीची वाटचाल समर्थपणे सुरू ठेवली. पती तेथे संचालक असताना कामातून कोणती सवलत घेण्याचा गैरफायदा त्यांनी कधी घेतला नाही. त्यांच्या शाळेतून बाहेर पडणार्‍या विद्यार्थीनी ह्या सुविद्य, सुशिक्षततेच्या प्रमाणपत्रासोबतच सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न व कर्तव्यदक्ष नागरिकत्वाचे आदर्श धारण केलेल्या ठराव्यात याबाबत त्यांचा कटाक्ष राहिला. पती विजयराव घोलपे यांच्या सहकार्याने त्या मुक्तपणे शिक्षण अध्यापन व समाजसेवेचे कार्य करू शकल्या. त्यामुळेच तालुक्यात काम करताना त्या अनेक कर्तृत्ववान महिलांच्या रुपात विद्यार्थीनींना दिसून आल्या. नुकताच त्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. त्यावेळी त्या कार्यक्रमात आपल्या लेकीच्या कर्तृत्वाबद्दल अनेकांचे अभिप्राय ऐकण्यासाठी त्यांच्या मातोश्री सुद्धा उपस्थित होत्या. या कार्यक्रमात स्वतःला शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात झोकून देणार्‍या सेवानिवृत्त शिक्षीका सौ. विजयमाला घोलपे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार निवृत्त सहाय्यक शिक्षण संचालक श्री संपतराव गायकवाड यांनी काढले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्राचार्या डी. डी. देवाळे होत्या. याप्रसंगी  जि.प. सदस्या रेश्मा देसाई, संजय जाधव, विजयराव घोलपे, गटशिक्षणाधिकारी दिपक मेंगाणे, प्राचार्या आर. आर. पोफळे, प्रा. बी. एस. नागरगोजे, मिलींद पांगीरेकर, मधू घोलपे प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थीनी आकांक्षा मोरे, मिताली माने यांनी यावेळी आपल्या अंतरंगातील भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला विजयालक्ष्मी आंबिटकर, प्राचार्य प्रवीण जाधव, मुख्याध्यापक के. एन. देसाई, एन. जी. कांबळे, श्री. वळांवडे, मनोहर घोलपे, अरविंद पालंगे, प्रा. संजय प्रभावळे, मुरलीधर कांबळे, डॉ. सुरज घोलपे, श्रीमती शांताबाई कांबळे, एस. एम. खेगंडे, बी. एस. माने उपस्थित होते. 
वयाच्या 10 व्या वर्षापासून समाजसेवा करीत नंतर शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदान करणार्‍या अशा ह्या महिला शिक्षिका सौ. विजयमाला घोलपे ह्या शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त झाल्यात! परंतू यानंतरही त्यांनी आपल्या शैक्षणिक साधनेच्या सेवाकार्याला पूर्णविराम देण्याचा विचार मात्र मनात आणलेला नाही. म्हणून भावी काळात मोबदला न घेता शैक्षणिक कार्य करण्याचा संकल्प त्यांनी केला. समाजात शैक्षणिक क्षेत्राच्या सशक्तीकरणातून राष्ट्राचे भावी आधारस्तंभ घडविण्याकरीता अशा शिक्षकांची खरी गरज आहे. सौ. विजयमाला घोलपे यांच्या सेवाभावी कार्य कौतुकास पात्र आणि तेवढेच अभिमानास्पदच आहे! 
संजय एम. देशमुख (संपादक)
संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष 
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ (रजि.अ.भा.)

    Post Views:  475


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व