वाझेंच्या नियुक्तीसाठी सीएमचा दबाव; परमबीर सिंहांचा पुन्हा गौप्यस्फोट
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सचिन वाझेला पुन्हा मुंबई पोलिस दलात नियुक्त करण्यासाठी दबाव होता, असा जबाव ईडीला दिला आहे. यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सूचना दिली होती, असा जबाब परमबीर सिंहांनी ईडीला दिला असल्याने सचिन वाझे आणि अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
त्याशिवाय बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परब स्वत: घेऊन येत असल्याचेही परमबीर सिंह यांनी म्हटले. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवला होता. सचिन वाझे याला पुन्हा पोलिस दलात रुजू करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना परमबीर यांनी धक्कादायक माहिती दिली. सचिन वाझे याला जून 2020 मध्ये पुन्हा पोलिस दलाच्या सेवेत रुजू करण्यात आले होते. निलंबित पोलिस अधिकार्यांना पोलिस दलात रुजू करून घेण्याच्या निर्णयासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पोलिस आयुक्त, सहआयुक्त आणि काही अधिकारी होते. हे सर्वजण संबंधित समितीचे सदस्य होते.
या बैठकीच्या दरम्यान सचिन वाझे यांची नियुक्ती करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. त्याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची थेट सूचना होती, असेही परमबीर यांनी ईडीला सांगितले.
वाझेच्या पोस्टिंगसाठीही सूचना
सचिन वाझे याची पोलिस दलात पुनर्नियुक्ती केल्यानंतर त्याला गुन्हे शाखेत पोस्टिंग देण्याबाबतची सूचना करण्यात आली होती. त्याशिवाय काही महत्त्वाची जबाबदारी देण्यास सांगितले होते. त्याशिवाय सचिन वाझेला सीआययूची जबाबदारी देण्यात आली होती. काही महत्त्वपूर्ण प्रकरणांचा तपास सीआययूकडून करण्यात येत होता. हा तपास वाझेंकडे देण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सांगितले होते, असे परमबीर सिंह यांनी ईडीला सांगितले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री थेट सचिन वाझेला बोलावून या महत्त्वाच्या प्रकरणांची माहिती घेत होते.
Post Views: 188