10-12 वीचे विद्यार्थी रस्त्यावर; परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी


अकोल्यासह मुंबई, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीडमध्ये आंदोलन
 संजय देशमुख  31 Jan 2022, 6:55 PM
   

मुंबई : दहावी, बारावीची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्या, अशी मागणी करत आज दुपारी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये मुंबईसह नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, सातारा, कराड, अकोला येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.
वर्षभर शाळा व महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले आहे. यामुळे परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावा, अशी मागणी करणारा यूट्यूबर विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलन केल्याचे विद्यार्थ्यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितले. धारावी येथे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर विद्यार्थी एकत्र आले. जोरदार घोषणाबाजी करत ऑनलाइन परीक्षा घेण्याची माहिती दिली. आफॅलाइन परीक्षा घेण्यात येऊ नयेत, तसेच सर्व फी माफ करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देणार आहे, असे हिंदुस्थानी भाऊ याने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. मागण्या मान्य न केल्यास राज्यात सर्वत्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्याने या व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून दिला आहे. सध्या पोलिस या हिंदुस्थानी भाऊचा शोघ घेत आहेत.
शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर घोषणाबाजी
आज शेकडो विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी परीक्षा या ऑफलाइन स्वरूपात घेतल्या जातील, असा निर्णय घेतलेला होता. या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. वर्षभर ऑनलाइन शिकवण्यात आले आणि आता ऑफलाइन परीक्षा का घेण्यात येत आहे? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला असून, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार सुद्धा करावा लागला होता.
बीडमध्ये काढली रॅली
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन न घेता ऑनलाइन घेण्यात याव्यात, अशी  ही मागणी घेऊन बीडमध्ये विद्यार्थ्यांनी रॅली काढत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. राज्यात सुरू असलेल्या एसटी संपामुळे, गावखेड्यातील बस अद्यापही बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिक्षणासाठी येता येत नाही. जर खासगी वाहनांनी यायचे म्हटले तर वाहन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेतल्या तर आमचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. यामुळे बोर्डाने ठरवलेले ऑफलाइन पेपर हे ऑनलाइन घेण्यात यावेत. ही मागणी घेऊन बीडमध्ये विद्यार्थ्यांनी रॅली काढत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.
नागपूरमध्ये आंदोलन
तर 10 वी व 12 वीच्या परीक्षा फक्त ऑनलाइन घ्याव्या अन्यथा पुढे ढकलावल्या मात्र ऑफलाइन परीक्षा घेऊन नये, या मागणीसाठी आज नागपूरमध्ये 10 वी व 12वीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. सर्व विद्यार्थी तुकडोजी पुतळा येथे जमले व त्यानंतर त्यांनी मेडिकल चौकपर्यंत मार्च काढला. काही वेळासाठी हे आंदोलक विद्यार्थी हिंसक देखील झाले. मात्र पोलिसांनी वेळीच पावले उचलत परिस्थिती नियंत्रणात आणली.
हिंदुस्तानी भाऊवर कारवाईची शक्यता...
अगदी काही तासात विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर जमा होत रान पेटवले. परीक्षा ऑनलाइन घ्याव्या या मागणीसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  यांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या उद्रेकाला हिंदुस्तानी भाऊ जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे हिंदुस्तानी भाऊच्या अटकेची शक्यता आहे. या विद्यार्थ्यी आंदोलनाची चौकशी करावी असे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. 
कोण आहे हिंदुस्तानी भाऊ...
रुको जरा, सबर करो... हा डायलॉग तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा ऐकला अथवा पाहिला असेल. या डायलॉगमुळेच हिंदुस्थानी भाऊ प्रसिद्धीझोतात आला. आज सोशल मीडियावरील अनेक व्हिडीओत हिंदुस्थानी भाऊ दिसतोच. सलमान खानच्या बिग बॉस 13 मध्ये हिंदुस्थानी भाऊने सहभाग घेतला होता. हिंदुस्थानी भाऊचे खरे नाव विकास पाठक असे आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहिलाय. दादरमधील शिवाजी पार्कमध्ये गेल्या वर्षी हिंदुस्थानी भाऊ विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करा, परीक्षा शुल्क माफ करा या मागणीसाठी आंदोलनाला बसला होता. त्यावेळी कोरोना नियमांचं उल्लघंन केलं म्हणून पोलिसांनी भाऊला ताब्यात घेतले होते. यूट्यूबवर प्रसिद्ध होण्याआधी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाठक एक पत्रकार होता. विकास पाठक मुंबईमधील एका स्थानिक वर्तमानपत्रात क्राइम रिपोर्टर होता. क्राईम रिपोर्टिंगसाठी 2011 मध्ये विकास पाठकला पुरस्कारही मिळाला आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही : कडू
विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शिक्षणाशी काहीही संबंध नसणारी काही चुकीची माणसे घुसली आहेत. या सर्वाच्या मागे कोण आहे याचा शोध घेऊ आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांची योग्य चौकशी करू, त्यांच्या शालेय जीवनावर कोणताही दुष्पपरिणाम होऊ देणार नाही, तशा सूचना पोलिसांना देऊ, अशी माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. 
सरकार चर्चेसाठी तयार : शिक्षणमंत्री
शाळेतील मुले दोन आघाड्यावर लढत आहेत, एकीकडे कोरोनाची परिस्थिती तर दुसरीकडे दोन वर्षांपासून शिक्षणामध्ये निर्माण झालेली पोकळी. असे असताना आता मुलांना भडकावून त्यांना रस्त्यावर आणू नये, काही सूचना करायची असेल तर ती राज्य सरकारशी करावी, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. दहावी-बारावीच्या मुलांच्या परीक्षेसंबंधी काही सूचना असतील तर त्या शिक्षण विभागाला कराव्यात. सरकार या संबंधी 
चर्चेसाठी तयार आहे, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. 

    Post Views:  317


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व