खाजगी शिकवणी क्षेत्रातील लबाडांना पालकांनीच चपराक दिली पाहिजे! संजय एम. देशमुख मो. ९८८१३०४५४६
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
2022-05-27
महिला आणि मुलींवरील अत्त्याचार आणि विनयभंगाची प्रकरणे ही अशिक्षीत व संस्कारहीन तथा अनेक दृष्टीने मागासलेल्या गुन्हेगारांकडूनच घडतात असा समज गेल्या काही वर्षात मोडीत निघालेला आहे. असे म्हणतात की शिक्षणाने मनुष्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून त्याचा नैतिक स्तर उंचावतो. परंतु खुलेआम स्वैराचाराची वाढ झालेल्या या काळात वैचारिक आणि नैतिक प्रदुषणाच्या भष्मासुराने शिकल्या सवरल्या सुशिक्षितही पथभ्रष्ट केले आहे. म्हणजे या बुद्धीवंतांना (सु) शिक्षीत म्हणावे की अनैतिकतेत प्रशिक्षीत हा आज समाजाला विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
अकोल्यात खाजगी शिकवणी वर्गातून अमाप पैसा कमावणार्या काही संस्थाचालकांना पैशांचा माज आलेला आहे. गुरू शिष्यांच्या नात्याला काळीमा फासून ते वेळ मिळेल तिथे विद्यार्थीनींना आपल्या अत्त्याचाराची शिकार बनविण्याची निर्लज्ज पातळी सुद्धा गाठू शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा प्रत्यय अकोल्यातील वसिम चौधरी प्रकरणाने परत एकदा आला आहे. अकोला शहरात जठारपेठेतील क्लास चालविणार्या एका 51 वर्षे वयाच्या प्राध्यापकाला अकोला न्यायालयातील न्यायमूर्ती सय्यद असद हसन यांनी शिकवणी वर्गातील मुलीच्या विनयभंग प्रकरणी 3 महिन्यांचा साधा कारावास आणि 800 रु. दंडाची शिक्षा सुनावली होती. दि. 30 मे 2011 रोजी आपल्याच शिकवणी वर्गात या प्राध्यापकाने आपल्या मुलीच्या वयाच्या 17 वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केला होता. परीक्षेचा निकाल दाखविण्याच्या बहाण्याने त्याने आतील खोलीत बोलावून दरवाजा बंद करून हा विनयभंग केल्याची तक्रार या विद्यार्थीनीने पोलिसांमध्ये दाखल केली होती. उच्च कुलीन आणि उच्च शिक्षीत व्यक्तीने केलेला हा अनैतिकतेतील कारनामा केवळ त्या मुलीने प्रसंगावधानातून दाखविलेल्या धाडसामुळेच समाजासमोर येऊ शकला होता. असेच निर्लज्ज चाळे वसिम चौधरी सुद्धा विद्यार्थीनींसोबत करीत असल्याचे एका मुलीने दाखविलेल्या धेर्यामुळे पुढे आले आहे. या गोष्टीचे दूरगामी परिणाम वसिमला भोगावे लागणार आहेतच. परंतु प्रकाशझोतात आलेल्या या प्रकारामुळे अनेक मुलींना धैर्य प्राप्त होऊन पालकांनाही आपल्या मुलींना कोणत्या शिकवणी वर्गात पाठवावे याचा निर्णय यापुढे विचारांती शांततेत घ्यावा लागणार आहे. पालकांच्या पैशांवरच उन्मत होऊन विद्यार्थ्यांला मारहाण करणार्या वसीम चौधरी नामक प्राध्यापकाला यापुर्वी अटकही झालेली होती.
राज्याच्या शहरा-शहरातून भुईछत्र्यांप्रमाणे उगवलेले शिकवणी वर्ग आणि अव्वाच्या सव्वा पैशाची आकारणी करून पालकमंडळीला लुबाडणार्या अनेक खाजगी शिकवणी वर्गाच्या संचालकाची अरेरावी, अनैतिक आणि उन्मत्त वर्तवणूकीची अनेक उदाहरणे वेळोवेळी समोर आलेली आहेत. अस्तित्वात असलेल्या या शिकवणीवर्गातील बोटावर मोजण्याऐवढेच वर्ग आपला शैक्षणिक दर्जा सांभाळून आहेत. आणि सारासार विचार करणारे चिकीत्सक विद्यार्थी व सद्विवेकपूर्वक विचार करणारे त्यांचे पालक योग्य विचाराने निवड करुन आपल्या पाल्यांना अशा शिकवणी वर्गामध्ये पाठवतात, असे म्हणताना गफलत झाली हे मान्य करावे लागते. स्त्रिया आणि मुलींवरील अत्त्याचारासंदर्भातील मागील अनेक संपादकीय लेखातच आम्ही उल्लेख केला आहे. अनेक पालकांना आपल्या मुली-मुले कुठे जातात, कोणत्या शिकवणी वर्गात जातात हे पाहण्यासाठीही वेळ नाही, आणि या असंवेदनशीलतेतून निर्माण झालेल्या दुर्लक्षितपणानेच संधी मिळताच विद्यार्थी मार्ग सोडून भरकटतात किंवा या संधीचा समाजातील दुराचारी फायदा उठवतात आणि त्यातून अनेक अनर्थांचा जन्म होतो. जागोजागी फोफावलेले कोणताही शैक्षणिक दर्जा नसलेले अनेक शिकवणी वर्ग आणि त्यांचे अनाचारी उन्मत्त संचालक हे समाजातील अविचारी पालकांनी जोपासलेल्या आणि वाढविलेल्या अपात्र बेजबाबदार घटकांच्या दुकानदार्या आहेत. आता तर ते पूर्व परीक्षा घेऊनच विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. म्हणजे हुशार विद्यार्थ्यांनाच प्रवेश द्यायचा आणि त्यांचेकडून भरमसाठ पैसा उकळून त्यांच्या गुणवत्तेवरच शिकवणी वर्गाच्या जाहिरातींच्या दुकानदार्या करायच्या. असा सगळा दलाली खेळ सुरू आहे. मग जेमतेम बुद्धीमत्तेच्या विद्यार्थ्यांना कोण शिकवणार? अशा विद्यार्थ्यांना पैशे देऊनही शिकविल जात नसेल तर हे शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे समाजशील प्राध्यापक म्हणावेत, की फक्त पैसे कमावणारे मतलबी संधीसाधू? शैक्षणिक क्षेत्रात सुमार बौद्धीक कुवत आणि त्यानुसार सामान्य शैक्षणिक दर्जा घेऊन केवळ खोट्या जाहिरातींच्या भरवशावर अनेक विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करणे सुरू आहे. कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून समाजाच्या फसवणूकीचे हे उद्योग चालू आहेत.
अकोल्यातीलच एका शिकवणीवर्गाच्या संचालकाने केलेले कृत्त्य या क्षेत्रातील खोटेपणा दाखविणारे आहे. एका विद्यार्थीनीने विशिष्ट विषयात गुणवत्ता प्राप्त केल्याचे एका प्राध्यापकाला समजले. तो विषय त्याच्या शिकवणी वर्गात शिकविला नसतांनाही तिला वर्गात इतर विद्यार्थ्थ्यांसोबतच निरोप समारंभात भेट वस्तू देऊन आपल्या वर्गाच्या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या जाहिरातीच्या बोर्डावर तिला फोटोसह झळकवले. वास्तविक तिची या विषयाची ट्युशन दुसर्या क्लासमध्ये होती व काही विषयांचीच या महाशयांकडे होती; परंतु प्राविण्य मिळविले म्हणून ती विद्यार्थीनी माझ्या शिकवणी वर्गाची म्हणून खोटे श्रेय लाटून स्वत:ला मोठे करण्याचा अश्लाघ्य प्रकार शिक्षण क्षेत्रातील या कमालीच्या अप्रामाणिक व्यक्तीने घडवून आणला. परंतु याविरुद्ध आपण बोललो तर पुढे आपलेच नुकसान होणार म्हणून या विद्यार्थीनीने तिच्या आक्रमक वडीलांनाही या संचालकाविरुद्ध जाण्यापासून परावृत्त केले. शिकवणी वर्गाच्या शिक्षकाने तिला प्राविण्य मिळवून देण्याकरीता मेहनत केली त्या बिचार्यावर अन्याय करुन त्यांच्या परिश्रमावर या बेईमान व्यक्तीने पाणी फिरविले.
खाजगी शिकवणीवर्गांच्या या बजबजपूरीत अशा खोट्या जाहिराती, भुलथापा आणि नैतिक स्तर घसरलेल्या संचालकांकडून शिकवणी वर्गातील मुलींना भोगावे लागणारे मनस्ताप या एकंदरीत प्रकारांना आळ घालण्याकरीता पालक आणि विद्यार्थ्यांनी शिकवणी वर्गाची निवड करतांना सद्विवेक बुद्धी जागृत ठेऊन निर्णय घेणे आज आवश्यक झालेले आहे. आजच्या काळात घरातून बाहेर पडून बाहेरच्या जगात वावरणारी मुलगी सुरक्षित नाही असे म्हटले जाते. परंतू शॉर्टकटच्या मार्गाने खोट्या जाहिराती करून पालकांना लुबाडणार्या आणि त्यांच्याच पैशावर उन्मत्त झालेल्या अशा शिकवणी वर्गाच्या मगू्रर संचालकांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीऐवजी त्यांच्या पालकांच्या पैशांशी जवळचे नाते आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने विद्यार्थ्यांना घडविणारे शिकवणी वर्ग फार कमी आहेत. त्यामुळे या प्रदुषित वातावरणाचे परिणाम मुलींसोबतच मुलांनाही भोगावेच लागतात. याकरीता कुठे काही अनुचित वाटल्यास वेळोवेळी पुढे येऊन धाडसाने आक्रमक पावित्रा घेणे क्रमप्राप्त ठरते. म्हणून अशा अपप्रवृत्तीच्या नितीमत्ता हिन, अनैतिक, लबाड, भिकारड्यांना अगोदरच ओळखले पाहिजे, नंतर लक्षात आले तर पालकांनीच समोर येऊन यांना चपराक दिली पाहिजे.
संजय एम. देशमुख
मो. ९८८१३०४५४६
Post Views: 240