आर्थिक विषमतेने पोळलेला शेतकरी,श्रमिक राजकारण्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही...!
संजय एम.देशमुख
2023-01-11
लोकशाहीमध्ये सर्वांना सारखा न्याय,शासनाच्या समान धोरणाच्या सुशासनातून समता प्रस्थापित करून सर्व घटकांचा समान आर्थिक विकास ही संविधानाची मार्गदर्शक तत्वे असतांना या देशातील सत्ताधारी मतलबाचे पापी राजकारण करून शेतकरी,श्रमिक आणि मध्यमवर्गीयांचे जीवन अधिक क्लेशदायक होईल अशाप्रकारची पक्षपाती आणि विषमतावादी वाटचाल करीत आहेत. देश आणि राज्याराज्यातील आर्थिक विषमतेने परमोच्च बिंदू गाठलेला असून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची कुटूबं,उपाशीपोटी राहणारे श्रमिक आणि महागाईच्या वणव्यात चिंताग्रस्त दाहक जीवन जगणाऱ्या मध्यमवर्गीयांची कुटूंबं या सरकारांना सदिच्छा आणि आशीर्वाद देत नाहीत. तर दररोज त्यांच्या क्लेशदायी अंतर्मनातून शिव्या शापांचा जप करीत असतात.तरीही अमर्याद सत्ता,अघोरी महत्वाकांक्षा आणि अधिकारांच्या गैरवापराने दिवसेंदिवस सराईत झालेले राजकीय नेते आणि त्यांच्या वरदहस्ताने उन्मत्त झालेले प्रशासनातील अनेक भ्रष्ट,पापी,मुजोरी अधिकारी कर्मचारी अनेकांच्या समस्याग्रस्त जीवनाला कारणीभूत ठरत आहेत.आत्महत्त्याग्रस्त विदर्भाचा आणि मराठवाड्याचा विचार करून करून डोकी सुन्न झाली आहेत.परंतू अनाचाराच्या मायेने वैभवाचे जीवन जगणाऱ्या राजकारण्यांच्या ह्रृदयाला माणुसकीचा पाझर फुटताना कधीच दिसला नाही.
विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यात कर्जबाजारीपणा, महागाई आणि कुटूंबाच्या यातना न पाहवल्याने दर १० तासाला एक शेतकरी आत्महत्त्या करीत आहे.३६५ दिवसात ३२१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.त्याच्यातील ८२ प्रकरणे मदती अभावी प्रलंबित आहेत.म्हणजे शेतकऱ्याला आणि कुटूंबाना मेल्यावरही न्याय आणि हक्क मिळेल या गोष्टीचीही शाश्वती येथे शिल्लक राहीलेली नाही. हा परिपाठ गेल्या एक दोन वर्षांतील नाही. तर २२ वर्षांपासून सुरू असलेल्या या आत्महत्त्यांच्या सत्रामुळे, संपूर्ण विदर्भ ,मराठवाडा आणि इतरत्र निर्माण झालेल्या या भयानक विदारकतेने समाज मने अक्षरस: हेलावून गेली आहेत.तरीही पुण्य पुरूष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांच्या विदर्भातील तथा महाराष्ट्राच्या संतभूमीतील स्वतःला माणसं म्हणविणारी राजकीय माणसंच येथून सत्तेत आहेत.तरीही या पाषाणहृदयी माणसांना या आपल्याच माणसांच्या आयुष्याचं काहीच मोल वाटत नाही.हा येथील लोकशाहीचा दैवदुर्विलास आहे.अमानूषतेचा कलंकी कळस आहे...!
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार भरमसाठ वाढतात.आताही वाढलेत आणि राज्य सरकारच्या तिजोरीवर २४० कोटींचा नवा बोजा निर्माण झाला.या निर्णयाला विरोध नाही.परंतू या गोष्टीला काही मर्यादा असाव्यात असं या सरकारांना का वाटू नये ? नुसत्या नोकरशाही आणि भांडवलदाराचेच लाड करतांना,त्यांच्या मागण्या मान्य करतांना, शेतकरी आणि सर्वसामान्यांचेही प्रश्न सुटले पाहिजेत.त्यांनाही बायका,मुलं कुटूंबं,त्यांचे उदरनिर्वाह आणि सामान्य गरजाही आहेत. मग एकीकडे सुखांची बरसात करतांना दुसरीकडे गडद दु:खाचा काळोख कायम ठेवणे हे सर्वसमावेशक,न्यायाचे समतावादी धोरण आहे का ? ज्यांच्या मतांच्या भीकेवर तुम्ही राजे बनलात त्यांच्याशी प्रतारणा,कर्तव्याशी बेइमानी करणे हा समाजधर्म ,प्रजाधर्म आहे का ? पगारवाढीप्रमाणेच आमदार खासदारांच्या भत्ते आणि सोईसुविधांमध्ये भरमसाठ वाढीची लुटमार.निवृत्त झाल्यावरही यांना आणि कुटूंबांना पोसत राहण्याची राजकीय ठेकेदारी निर्माण करतांना थोडेही वैषम्य का वाटत नाही ? अशावेळी यांच्याच अन्याय आणि अमानुष पापांमुळेच मरणारे गरीब आणि शेतकऱ्यांबध्दल थोड्या तरी भावना यांच्या अंतर्मनात शिल्लक असतात का?
राजा आणि त्यांच्या मर्जीतील माणसे खाती तुपाशी आणि ईतर मात्र उपाशी अशी या विषमतावादी सरकारची ही अन्याय्य वाटचाल...! या असंवेदनशीलतेमुळेच असंख्य शेतकरी,श्रमिक आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यांचे आजपर्यंत लिलाव झालेले आहेत. दिल्लीच्या आणि अनेक आंदोलनात अनेक निरपराध शेतकऱ्यांचे बळी गेलेले आहेत.आपल्याच माणसांना संपविणाऱ्या माणसा माणसा कधि होशील रे माणूस तू ? सर्वसामान्न्य जनतेचे, शेतकरी आणि श्रमिकांच्या जीवनमानाचे प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची किंवा त्यात काही तरी बदल होण्यास सुरूवात होईल अशा ईच्छाशक्तीने कृतिशील कार्यक्रम राबविण्याची गरज शासन आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींना वाटत नाही,वाटली नाही.उलट दररोज दिवस निघाल्यावर "यांचे पापाचे घडे भरले, हे जाणार,ते जेलमध्ये जाणार,हे आमदार फुटणार, ते येणार, हे जाणार," अशा स्वत:च्या राजकीय कुरघोड्यां आणि क्रूर षड्यंत्रांशिवाय येथील सत्ताधारी आणि विरोधी राजकारण्यांना कुठले समाजहिताचे काम उरलेले नाही.ज्यांच्या भरवशावर सत्तेची संधी मिळाली त्यांच्याशीच दररोज बेइमानी करतांना या अमानुषांच्या कळपातील अनेक स्वैराचाऱ्यांना थोडेही वैषम्य वाटत नाही.म्हणजे हा माणसांचा समुह आहे की नाही, हा विचार करण्याची निश्चित वेळ आता आलेली आहे.त्यावर सर्वसामान्यांनी अंतर्मुख होऊन गंभीरतेने विचार केला पाहिजे.आपल्या अंधनिष्ठ वाटचालीत बदल केला पाहिजे.प्रत्येक निवडणूकीत आपणास फसवणाऱ्या राजकारण्यांच्या गावागावांतील दलालांना हाकलून आपले अधिकार स्वतंत्रपणे वापरले पाहिजेत.स्वत:ची ऊखळं पांढरी करून घेण्यासाठी राजकारण्यासाठी आपल्याच लोकांना फसवीणारे हे दलाल म्हणजे कूऱ्हाडीचेच दांडे गोताला काळ ठरलेले आहेत.पापी राजकारण्यांच्या आश्रयाने ते सुखात जगतात. इतरांची आयुष्ये मात्र वर्षानुवर्षे दु:खाच्या महासागरात गटांगळ्या खाताना अघोरी आनंदाने पाहत राहणारी हे अप्रामाणिक परजीवी असतात.त्यांच्याच मदतीने वैभवाच्या राजमार्गाने धावणाऱ्या अशा निर्लज्ज राजकारण्यांच्या ह्या बंड्या आता कायम ऊलार केल्या पाहिजेत.
स्वत:चे भत्ते आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढविणे,कर्जबूडव्यांना गब्बर करणे,म्हणजे हे जनतेच्या तिजोरिचे अनभिषिक्त कुबेर आहेत का? एकीकडे शेतकऱ्याला देशोधडीला लावतानाच त्यांच्याच कर्जबाजारी प्रेतांना साक्ष ठेवत कर्जबूडव्या उद्योगपतींची कोट्यवधीची कर्जे माफ करण्याचा निगरगठ्ठपणा करणारी ही राजकीय नेत्यांची जमात या देशाला कुठे नेऊन ठेवणार आहे? याचे संकेत आता सुस्पष्टच होत आहेत.विसंगत वाटचाल करून भुलथापांनी जनतेला फसविण्याचा, या विषमतेच्या अन्याय्य कटकारस्थानांचा आता कडेलोट झाला असून येणारा काळ हा संतप्त जनतेच्या उद्रेकाचा,हिंसक वणव्याचाच राहणार आहे. हे राजकारण्यांनी जर अजूनही ओळखून आपली वाटचाल बदलली नाही,तर आगामी काळात येथील अन्यायाची धग आणि उपाशी पोटातून निर्माण झालेली वणव्याची काहूरं नियंत्रणात ठेवणे ही गोष्ट अशक्यप्राय ठरणार आहे...! खरी समाजनिष्ठ माणसं म्हणून जगण्याची इच्छा असेल तर अशा राजकीय नेत्यांनी मृतप्राय मानवता जीवंत करून आपला समाजधर्म जागवीण्यास सुरूवात केली पाहिजे.ही उपरति होणे क्रमप्राप्त आहे.अन्यथा संतप्त मना मनाच्या उद्रेकातुन बाहेर पडणाऱ्या ज्वाळा भविष्यात कोणा कोणाला आणि कशाला गिळंकृत करतील याची कल्पनाही करता येणार नाही.म्हणून वेळ जाण्यापूर्वीच थोडं थोडं शहाणं होत जाणं हेच बचावासाठी भावनिक साद देणारं माणूसपणाचं लक्षण ठरणार आहे.निर्माण होणाऱ्या समता,बंधूत्वाच्या अंतर्मनातून न्याय देणाऱ्या भावना,आणि उदात्त मानवताच या संकटावरील इलाज ठरणार आहे. हेच चिरंतन सत्त्य आहे....!
Post Views: 291